येथे रोजगार मिळतो : स्टेट बॅंकेमध्ये मेगाभरती! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SBI Recruitment

येथे रोजगार मिळतो : स्टेट बॅंकेमध्ये मेगाभरती!

स्टेट बँक ऑफ इंडिया ज्युनिअर असोसिएट भरती परीक्षा जाहीर झाली असून, जे उमेदवार सध्या पदवीधर आहेत किंवा पदवीच्या अंतिम वर्षाला बसलेले आहेत अशा युवक-युवतींना ही एक सुवर्णसंधी आहे. ही बँक देशात २२ हजार शाखांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या बँकिंग सेवा सुविधा उपलब्ध करून देत आहे. बँकेच्या विविध राज्यांतील विविध शाखांमध्ये कस्टमर सपोर्ट ॲण्ड सेल्स या विभागाकरिता ज्युनिअर असोसिएट या पदाकरिता एकूण ५ हजार २३७ जागांसाठी भरती परीक्षा घेण्यात येणार आहे. यामध्ये अनुसूचित जातीसाठी ७२६, अनुसूचित जमातीसाठी ४४०, इतर मागास वर्गासाठी १ हजार १९५, आर्थिक मागास प्रवर्गासाठी ४८८ व सर्वसाधारण प्रवर्गांसाठी २ हजार १५२ जागा, तसेच पूर्वीच्या अनुशेषाच्या २३७ जागांसाठी भरती केली जाणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत १७ मे २०२१ आहे.

शैक्षणिक पात्रता - या पदभरती करिता कोणत्याही शाखेचा पदवीधर तसेच जे विद्यार्थी सध्या पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहेत व त्यांचे पदवीचे निकाल १६ ऑगस्ट २०२१ पर्यंत प्राप्त होऊ शकतात अशा उमेदवारांना देखील या परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे थोडक्यात पदवीधर पदवीच्या शेवटच्या वर्षात असणाऱ्या कोणत्याही शाखेमध्ये शिक्षण घेत असलेल्या उमेदवाराला या भरती परीक्षेसाठी अर्ज करता येईल.

वयोमर्यादा - पदांसाठी अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयाची अट किमान वीस वर्षे व कमाल २८ वर्षे आहे. अनुसूचित जाती व जमातीमधील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३३ वर्षे, इतर मागास वर्गासाठी ३१ वर्षे, तर दिव्यांग उमेदवारांसाठी वयोमर्यादेत १० ते १३ वर्षे शिथिलता देण्यात आलेली आहे. ही वयोमर्याद १ एप्रिल २०२१ रोजीची ग्राह्य धरली जाईल.

भरती परीक्षेचे स्वरूप - भरती परीक्षा राष्ट्रीय पातळीवर व ऑनलाइन पद्धतीने होईल. ही बहुपर्यायी स्वरूपाची भरती परीक्षा असेल, या परीक्षेकरिता हिंदी व इंग्रजी माध्यम उपलब्ध आहे. पूर्व परीक्षा १०० गुणांची असेल व मुख्य परीक्षा २०० गुणांची. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरीता लॅग्वेज ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे स्थानिक भाषेबाबतची टेस्ट घेतली जाईल, तथापि मुलाखत घेतली जाणार नाही. म्हणजेच मुख्य परीक्षेमधील २०० गुणांपैकी प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.

पूर्व परीक्षेचे स्वरूप - पूर्व परीक्षेकरिता इंग्रजी, न्यूमरिकल ॲबिलिटी व रिझनिंग ॲबिलिटी हे तीन विषय देण्यात आले आहेत. यामध्ये इंग्लिश, न्यूमरिकल ॲबिलिटी, रिझनिंग ॲबिलिटी मिळून एकूण १०० गुणांची एक तासाची परीक्षा असेल. परीक्षा ऑनलाइन बहुपर्यायी पद्धतीचे असेल. तिन्ही विषयांत किमान आवश्यक गुण प्राप्त करणे बंधनकारक राहील.

मुख्य परीक्षेचे स्वरूप - मुख्य परीक्षेकरिता चार घटक निर्धारित करून देण्यात आलेले असून, ही परीक्षा एकूण दोनशे गुणांचे असेल. त्यासाठी दोन तास ४० मिनिटे कालावधी आहे. परीक्षा बहुपर्यायी स्वरूपाची हिंदी व इंग्रजी या दोन्ही माध्यमांतून ऑनलाइन होईल. यामध्ये जनरल व फायनान्शिअल अवेअरनेस याकरिता ५० प्रश्न ५० गुणांसाठी व त्यासाठी ३५ मिनिटांचा कालावधी असेल, जनरल इंग्लिश करिता ४० प्रश्न ४० मार्कांसाठी असतील व त्यास ३५ मिनिटांचा कालावधी असेल, सांखिकीय अभियोग्यता करिता ५० प्रश्न ५० गुणांसाठी असतील व त्यासाठी ४५ मिनिटांचा कालावधी असेल, रिझनिंग ॲबिलिटी व कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड याकरिता ५० प्रश्न ६० गुणांसाठी असतील व त्यासाठी देखील ४५ मिनिटांचा कालावधी असेल.

अंतिम निवड - भरती परीक्षेतील उमेदवारांची अंतिम निवड त्या-त्या प्रवर्गात उपलब्ध असलेल्या जागा व उमेदवारास मुख्य परीक्षेत प्राप्त झालेले एकूण गुण, तसेच मुख्य परीक्षेतील चार विषयांमध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल.

अंतिम निवडीकरिता मुलाखत घेतली जाणार नाही, मात्र स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत नियुक्ती दिली जाणार आहे, त्या शाखेच्या संबंधित असणारी राज्याची भाषा बोलता येते किंवा नाही याबाबतची स्थानिक भाषेबाबतची टेस्ट घेतली जाईल.

ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत - या पदाकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी २० ते ५० केबी साईजमध्ये फोटो, स्वतःची सिग्नेचर, तसेच आपल्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा स्कॅन केलेला असावा. याबरोबरच ऑनलाइन अर्ज करण्याकरिता मुख्य जाहिरातीत दिल्याप्रमाणे एक डिक्लेरेशन प्रत्येक उमेदवाराने स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून त्यावर सही करणे व सदर डिक्लेरेशन २० ते ५० केबी या साईजमध्ये स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे. ऑनलाइन परीक्षेकरिता सर्वसाधारण प्रवर्ग, इतर मागास वर्ग व आर्थिक मागास प्रवर्गासाठी ७५० रुपये फी असून, अनुसूचित जाती व जमाती तसेच दिव्यांग उमेदवारासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://sbi.co.in/web/careers/current-openings या संकेतस्थळावर भेट द्यावी.

Web Title: Vijay Kumbhar Writes About Mega Recruitment In State

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top