करिअर-मानस : रागाला योग्य वाट

केबिनच्या दरवाजातून एक महिला पालक आल्या. सोबत त्यांचा चौदा-पंधरा वर्षांचा मुलगा. स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी विषयात हात घातला.
Student Anger
Student AngerSakal
Updated on
Summary

केबिनच्या दरवाजातून एक महिला पालक आल्या. सोबत त्यांचा चौदा-पंधरा वर्षांचा मुलगा. स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी विषयात हात घातला.

- प्रा. विजय नवले

केबिनच्या दरवाजातून एक महिला पालक आल्या. सोबत त्यांचा चौदा-पंधरा वर्षांचा मुलगा. स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी विषयात हात घातला. ‘सर, माझा मुलगा खूप रागीट आहे, सतत चिडतो. याच्या करिअरचं सोडा, याला आधी नॉर्मल करता येईल का ते सांगा.’ मी दोघांकडे पाहिले. दोघेही डिस्टर्ब्ड होते. आईचे त्याच्याबद्दलचे हे उद्‌गार ऐकून तो अधिकच अस्थिर झाला होता.

मी म्हणालो, ‘असूद्या की रागीट! प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव असतो. त्यात त्रासदायक नकारात्मकता असल्यास आपण करू शकतो काही प्रयत्न; पण हा मला नॉर्मल वाटतोय. विनाकारण त्रास करून घेऊ नका.’ प्रत्येक व्यक्ती ही त्याच्या गुण वैशिष्ट्यांनी भरलेली असते. त्यात दोन-चार दोष असतात. आपण त्यांना दोष म्हणतो; पण कधी कधी त्या गोष्टी इतरांना फार त्रासदायक नसतील आणि खूप प्रयत्न करून जात नसतील तर त्या स्वीकाराव्यात. जसे कारले कडू असते, ते आंब्यासारखे गोड नसते; पण म्हणून साखरेत टाकले, पाकात घोळले तरी कारले कडूच लागेल. मात्र, त्यातील जीवनसत्त्वे ही फार लाभदायक असणार आहेत. एखादा गोड पदार्थ खाताना गोड लागेल; पण नंतर तब्येतीला त्रासदायक ठरू शकतो. आपण मिरची तिखट नसावी अशी अपेक्षा करतो का? चिंच आंबट, नकोय असे कुणीतरी म्हणेल का? उत्तम आवळा तोच जो जास्त तुरट लागतो. प्रत्येकाला आपली गुणवैशिष्टये आहेत. ती सहजपणे दूर झाली नाहीत तर स्वीकारावी लागतील.

मी हे काही सांगू शकत नव्हतो. मी शांतपणे म्हणालो, ‘तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हा मुलगा रागीट आणि चिडका आहे, तर याचे हेच गुण आपण त्याच्या करिअरसाठी नीटपणे वापरले तर?’ त्या पुन्हा उसळल्या, ‘अहो, हे तर त्याचे दुर्गुण आहेत.’ मी पुन्हा त्यांना शांत करत म्हणालो, ‘याला आपण त्याच्या स्वाभाविक करिअर क्षेत्रात पाठवून त्याला जास्तीत जास्त यशस्वी करू.’ ‘सर, पण सगळीकडेच लोकांची अपेक्षा असते, की माणूस शांत असावा. चिडका नको,’ बाई जरा शांततेत म्हणाल्या.

‘अहो, आहेत ना अनेक करिअर्स जिथे तुम्ही राग येणारे असणे अपेक्षित असता. जिथे तुम्ही अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे हवे असता. जिथे तुम्हाला इतरांना जरब बसवावी लागते.’ मग मी त्या काकूंना खेळातील करिअर्स खासकरून बॉक्सिंग, कराटे यांची माहिती दिली. ‘बॉक्सिंग खेळणारा जर शांत स्वभावाचा असेल तर चालेल का हो... या गालात मारली, आता या दुसऱ्या कानफटात मार, असे म्हणणारा बॉक्सर जिंकेल, की तू एक ठोसा मारला काय, मी आता तुला माझ्या ठोशांनी जामच करतो असे म्हणणारा, भावनिकदृष्ट्या संतापून; पण खेळाचे नियम पाळून आक्रमक खेळणारा खेळाडू?’

मुलाच्या आईने मान डोलावली. मी म्हणालो, ‘तुमचा मुलगा देशप्रेमाने भारलेला आहे आणि तो जर सैन्यात अधिकारी किंवा सैनिक म्हणून काम करत असेल आणि आपले सैनिक शत्रूने ठार मारले तर संताप, राग, चीड हे याच्या मनात आले पाहिजेत ना! समोरून आलेली शत्रूची गोळी चुकवून आपल्या शस्त्रांनी शत्रूला नामोहरम करण्यासाठी काय लागेल? विनम्रता, की शत्रूबद्दलची चीड?’’ मुलाच्या आईने पुन्हा मान डोलावली. मी अजून म्हणालो, ‘‘समजा तुमचा मुलगा पोलिस क्षेत्रात गेला आणि त्याच्या कार्यक्षेत्रात गुंडांनी आणि समाजकंटकांनी गोंधळ घातलेला असेल, तर हा चिडलाच नाही तर गुन्हे कमी होतील का वाढतील? राग येणे आणि तो नियमात, संयमात बसवून; पण मनातली आग न विझवता तो पोलिस, सैन्य अधिकारी , खेळाडू झाला तरच तो त्याचे कर्तव्य नीटपणे करणार आहे. बरोबर ना?’ मुलाची आई खूश झाली. मी सांगत होतो, ‘अर्थात या करिअर्समध्ये केवळ रागीटपणा चालणार नाही. सदासर्वदा चिडून चालत नाही. प्रचंड संयमीदेखील असावे लागते. पण मूळ मुद्दा अन्यायाविरुद्ध निर्माण होणारा राग, योग्य दिशेने वाळवून समाजहिता करता येऊ शकते. म्हणून तुमचा मुलगा चिडका आहे याचे दुःख नको. अर्थात आता मी जे सांगितले म्हणून फार कौतुक पण नको.’

चांगली चर्चा झाली. आता आम्ही वरीलपैकी एक करिअर करण्याचे फायनल केले. मुलाला योग, प्राणायाम, व्यायाम आणि पुस्तकवाचनाचे काही उपाय सुचविले. विविध करिअरच्या दृष्टीने परीक्षेची तयारी कशी करायची याची चर्चा केली. मला तो मुलगा खूपच सकारात्मक वाटला. विशेष म्हणजे मुलाची आईसुद्धा समुपदेशनानंतर आनंदी झाली होती.

आपली मुले आहेत तशी स्वीकारली पाहिजेत. अमुक एक गुण माझ्या मुलात हवाच असा आग्रह नको. ते काही मशीन नाही. काही अनावश्यक आणि त्रासदायक बाबी असतील, तर त्या निश्चितच दूर करू; पण गंमत म्हणजे प्रत्येक स्वभावाला अनुसरून काही करिअर्स उपलब्ध असतात. स्वाभाविक वाटणाऱ्या करिअरमध्ये आपली मुले गेली तर ती नक्कीच यशस्वी होतील. तेही खूप सहजपणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com