esakal | रि-स्किलिंग : केपीआय आणि केआरए

बोलून बातमी शोधा

Reskilling
रि-स्किलिंग : केपीआय आणि केआरए
sakal_logo
By
विनोद बिडवाईक

आपण एखादे काम करतो, तेव्हा त्या कामाचा उद्देश आपल्याला समजलेला असतो, हे गृहीत धरले जाते. काम करत असताना असणारे टार्गेट्स किंवा अपेक्षित असणारे रिझल्ट हे आपल्याला माहीत असतात. आपल्याला आपले केपीआय अथवा की परफॉर्मन्स इंडिकेटर्स आणि केआरए अथवा की रिजल्ट एरियास आपल्याला माहीत असतात; परंतु आपल्याला आपल्या बॉसचे ‘केपीआय’ आणि ‘केआरए’ कोणते आहेत हे मात्र माहीत नसते. बॉसचे प्राधान्य कशाला आहे, हे खूपदा आपण समजून घेत नाही. आणि जर आपल्याला आपल्या बॉसच्या कामाचे ध्येय, त्याची उद्दिष्टे माहीत असले तरी बॉसच्या बॉसची उद्दिष्टे, टार्गेट्स अथवा प्राधान्य माहिती असतीलच असे नव्हे.

खूपदा आपल्याला आपल्याकडून काय अपेक्षित आहे, हे माहीत असू शकते. थोडाफार प्रमाणात बॉसच्या कामाबद्दल माहीत असते, पण बॉसच्या बॉसबद्दल अथवा त्याच्या प्राधान्यक्रमाबद्दल आपल्याला फारशी माहिती असत नाही. त्यामुळे सर्वप्रथम आपण आपल्या कामाची माहिती तर घ्याच. आपल्याकडून काय अपेक्षा आहेत हे अगदी स्पष्टपणे बॉसला विचारायला हरकत नाही. त्याच बरोबर आपल्या बॉसची उद्दिष्टे काय आहेत हे त्याला विचारायला विसरू नये. त्याची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्याला आपली काही मदत हवी, आधार हवा असेल, तर त्या मदतीचा हात देणे सुद्धा चांगल्या आणि स्मार्ट कर्मचाऱ्याचे लक्षण समजले जाते.

बॉसचा बॉस

त्यानंतर येतो तो बॉसचा बॉस. बॉसचा बॉस हा संस्थेतील व्यवस्थापनामध्ये महत्त्वाच्या पदावर असू शकतो, त्यामुळे त्याला सहजासहजी भेटता येईल, असे नव्हे. परंतु, त्याला भेटण्याचे काही मार्ग शोधून काढायला हवे. ऑफिसमध्ये कॉरिडॉर, लिफ्टमध्ये येता जात भेट झाल्यास त्या भेटीचा उपयोग करता येईल. काही बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये पारदर्शक कार्यसंस्कृती असल्यामुळे असे बॉस सहज भेटत असतात. एकदा अशा भेटी झाल्या की त्यांच्यासोबत आपल्या कामाबद्दल माहिती देऊन त्यांचीही मते घेऊ शकतो. त्यांच्या प्राधान्य यादीत काय आहे, हे तुम्हाला समजू शकेल. त्यासाठी चुणचुणीत प्रश्न विचारण्याचे कौशल्य हवे.

बऱ्याचदा बॉस अशा बैठकी आयोजित करत असतो. अशावेळेस वरिष्ठ मंडळींना प्रश्न विचारू शकता. संस्थेमध्ये वेगवेगळे मंच, बैठकी, प्रकल्प असतात. त्यासाठी स्वतःला नॉमिनेट करा. हे सर्व साध्य करण्यासाठी सर्वप्रथम संस्थेची संपूर्ण माहिती, संस्थेच्या व्यवसायाबद्दलची माहिती, संस्थेच्या ग्राहकाची माहिती, सर्वसमावेशक संस्थेची उद्दिष्टे आणि धोरणे माहिती करून घेणे महत्त्वाचे ठरते.

शेवटी तुमचे काम हे संस्थेच्या धोरणासोबत आणि उद्दिष्टे सोबत जुळत नसेल, तर तुमच्या कामाला काहीही अर्थ राहत नाही.