esakal | रि-स्किलिंग : प्रेरणा दररोज कामावर जाण्याची!
sakal

बोलून बातमी शोधा

Reskilling

रि-स्किलिंग : प्रेरणा दररोज कामावर जाण्याची!

sakal_logo
By
विनोद बिडवाईक

रोज सकाळी उठून, तयारी करून, कामावर जाण्यासाठी तुम्ही तयार होता. आता सध्याच्या काळात "वर्क फ्रॉम होम" साठी तुम्ही तयार होता. हे सर्व करण्यामागे तुमच्या स्वतःच्या प्रेरणा काय आहेत? प्रत्येकाच्या कामासाठी प्रेरित होण्यामागे वेगवेगळी कारणे आहेत. त्यामुळे सर्वप्रथम आपण काम का करतो हे समजून घेणे गरजेचे आहे. नोकरीची गरज आहे म्हणून? महिन्याच्या शेवटी मिळणारा पगार मिळतो म्हणून? काम संपल्यानंतर त्यातून मिळणारा आनंद म्हणून? संस्थेतील वातावरण अतिशय उत्कृष्ट असल्यामुळे काम करायला मजा येते म्हणून? मानसिकदृष्टया विचार केला तर आपण वरील कारणांसोबत आपल्या कामात पुढील गोष्टी असल्यास जास्त प्रेरित होतो.

अधिकार : स्वतःचे काम करत असताना मिळणारा अधिकार, हा अधिकार बऱ्याचदा आपण वापरात नाही. काम कसे करावे ह्याचा अधिकार, काही निर्णय घेण्याचा अधिकार हा जॉब सोबत नकळत येत असतो. तो अधिकार समजून घ्यावा लागतो.

कामाचा योग्य मोबदला : आपल्याला मिळणाऱ्या पगारावर आपण कधीच संतुष्ट नसतो. परंतु आपल्या कामाचा योग्य मोबदला आपल्याला मिळतो का हे समजून घेणे गरजेचे ठरते. बऱ्याच संस्था या कामगारांना अथवा कर्मचाऱ्यांना त्यांच्या रोजच्या निकडीच्या गरजाही पूर्ण होऊ न शकणाऱ्या पगारात काम करायला लावतात. खरंतर हा अन्याय आहे. योग्य तो मोबदला काय आहे हे प्रत्येकाने समजून घेणे आवश्यक आहे.

प्रतिष्ठा : काम करत असताना योग्य तो आदर मिळावा, अशी अपेक्षा प्रत्येकाची असते. योग्य प्रतिष्ठा जर संस्थांनी कर्मचाऱ्यांना दिली नाही तर कर्मचारी आनंदी राहू शकत नाही. काही संस्थेमध्ये टॉक्सिक कार्यसंस्कृती असते. अशा वेळेस एकमेकांना दोष देणे, सतत कर्मचाऱ्यांचा अपमान करत राहणे असे उद्योग होत असतात.

स्वातंत्र : काम करण्याचे स्वातंत्र प्रत्येकाला अपेक्षित असते. काम करत असताना आपल्यावर सतत लक्ष असेल तर आपले कामात लक्ष लागणार नाही.

आता ह्या वरील गोष्टी समजून घेतल्यानंतर, स्वतःला इतर कर्मचाऱ्यांच्या जागी ठेवा आणि त्यांच्यासोबत वागतांना त्यांची प्रेरणा समजून घ्या. ज्याप्रमाणे आपण स्वतःचे काम करण्याचे प्रेरणास्त्रोत समजून घेतले, त्याचप्रमाणे संस्थेतील दुसऱ्यांचे प्रेरणास्त्रोत किंवा प्रेरित होण्याच्या पद्धती काय आहेत हे जर समजून घेतले तर एकमेकांसोबत आवश्यक असणारे संबंध प्रस्थापित करता येतात. जर तुम्ही मॅनेजर असाल तर आपल्या कर्मचाऱ्यांना समजून घ्या, आपण कर्मचारी असाल तर आपल्या बॉसची कामाची निकड समजून घ्या आणि सोबत सहकाऱ्यांचीही.

तुम्ही जेव्हा संकटात असाल, ठेवला हे सर्व तुमच्या मदतीला नक्की येतील.