esakal | रि-स्किलिंग : परिस्थितीचे आत्मभान
sakal

बोलून बातमी शोधा

Technology

रि-स्किलिंग : परिस्थितीचे आत्मभान

sakal_logo
By
विनोद बिडवाईक

कारकीर्दीत वेगवेगळ्या, मोठ्या पदांवर काम केलेल्या यशस्वी कर्मचाऱ्यांत असणारा एक गुण म्हणजे, त्यांचे आजूबाजूच्या परिस्थितीबद्दलचे आत्मभान. ह्यामध्ये दोन गोष्टी येतात...

  • आजूबाजूची परिस्थिती आणि लोकांचे वागण्याचे निकष.

  • बॉस आणि वरिष्ठांच्या अपेक्षा जाणून घेण्याची कुवत.

अपेक्षांनुसार कामात बदल करा

आजूबाजूची परिस्थिती नेहमी बदलत असते. वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. लोकांच्या वागण्याच्या, जगण्याच्या तऱ्हा बदलत असतात; टेक्नॉलॉजीमुळे झालेले बदल आत्मसात करावे लागतात; व्यवसाय करण्याची पद्धती (बिझनेस मॉडेल) बदलत असते. ग्राहकांच्या अपेक्षा बदलत असतात. त्याच बरोबर येणारे वेगवेगळे कायदे, नियामक बाबी, सामाजिक परिस्थिती आणि लोकांची वाढती जागरूकता ह्या सर्वांचा परिणाम व्यवसायावर होत असतो, व्यवसाय करण्याच्या पद्धतीवर होत असतो. हे सर्व त्रयस्थपणे पाहून चालत नाही. ह्या सर्वांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम आपल्यावर होत असतो. या सर्वांचा प्रभाव आपल्या कामाच्या पद्धतीवरही पडतोच, त्याचप्रमाणे तो कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या कामगिरी आणि वर्तनावरही पडतो. अपेक्षाही बदलत जातात. हे सर्व समजून आणि उमजून घेऊन आपल्याला काय करावे लागेल, ह्याचा विचार प्रत्येक कर्मचाऱ्याला करणे गरजेचे ठरते.

त्यामुळे आपल्या बॉस आणि वरिष्ठांच्या अपेक्षाही बदलत जातात. कधीतरी नवीन बॉस आणि नवीन वरिष्ठ येतात आणि मागील गोष्टी चुकीच्या अथवा अप्रासंगिक ठरू लागतात. कर्मचाऱ्यांना मग आपली पद्धत बदलावी लागते. उदा. एखादा बॉस वाढीव महसुलाला महत्त्व देत असेल, तर नवीन बॉस कदाचित किफायतशीर आणि फायदेशीर व्यवहाराला महत्त्व देईन. त्यामुळे तुम्ही महसूल वाढवला, पण तो नफा योग्य नसल्यास तुम्ही अपेक्षा पूर्ण करू शकणार नाहीत.

हे करण्यासाठी तुम्हाला बॉस आणि वरिष्ठांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करावा लागेल. बॉसचे प्राधान्यक्रम, कामाची शैली, त्याच्या सवयी आणि त्याचे वर्तन ह्याचे निरीक्षण करावे लागेल. तसेच, ते सर्वांत जास्त महत्त्व कशाला देतात, हे पण समजून घ्यावे लागेल. बॉसच्या नजरेत आपण अगदी चांगले काम करत असाल, तरच तुम्ही यशस्वी व्हाल. स्वतःच्या कार्यक्षमतेमुळे आणि कार्यप्रदर्शनामुळे थेट व्यवसायातील उद्दिष्टांवर कसा प्रभाव पडतो, हे तुम्ही दाखवून द्यायला हवे.

खालील गोष्टी नियमित करा

१) नियमित वाचन : आपल्या आयुष्यावर आणि कामावर प्रभाव पडणाऱ्या गोष्टी, लेख, बातम्या, पुस्तके ह्यांचे नियमित वाचन करा.

२) नोकरी करताना वरील घडणाऱ्या घटनांचा नकारात्मक प्रभाव मर्यादित करण्यासाठी योजना तयार करा.

३) या विषयावर बॉस आणि वरिष्ठांसोबत योग्य वेळी चर्चा करा.

४) घटनांकडे एक शिकण्याची संधी म्हणून बघा.

loading image