
रि-स्किलिंग : मानसिक प्रतिमा
मानसिक प्रतिमा हे ‘मेंटल मॉडेल’ या इंग्रजी शब्दाचे मराठी स्वैर भाषांतर आहे. आपल्या वातावरणाचा, संस्कृतीचा, कुटुंबीयांचा आणि शिक्षणाचा प्रभाव आपल्या व्यक्तिमत्त्वावर पडत असतो, हे आपल्याला माहीत आहेच. अशा अनेक अनुभवावर आधारित आपण काही गृहीतके तयार करत असतो. या गृहीतकांना मानसिक प्रतिमा असे म्हणता येईल. मानसिक प्रतिमा अशी रचना आहे, जी लोकांना जग कसे कार्य/लोक कसे वागतात/व्यापार कसा होतो इत्यादी क्षेत्रात योग्य तो मार्ग दाखवते. जगात अशा अनेक मानसिक प्रतिमा आहेत की त्या सर्वांचा तपशीलवार अभ्यास करण्यास बराच वेळ लागेल. काहींचे मूळ जैविक निरीक्षणांमध्ये आहे, तर काहींचे वर्णन वर्तणुकीच्या अभ्यासात केले गेले आहे.
एखाद्या विषयांवरची मानसिक प्रतिमा कशी तयार करावी, हे समजणे एक महत्त्वाचे कौशल्य आहे. असे म्हणतात, की एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर त्याची तयारी आपल्या मेंदूत करावी लागते. त्या गोष्टीची रूपरेखा आपल्या मनात तयार होते, ती एक प्रकारची ब्लू प्रिंटच असते. ती मेंदूतील अथवा मनातील, ब्लू प्रिंट म्हणजेच मानसिक प्रतिमा. संस्थेत बदलत्या जगात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला गर्दीतून वेगळे दिसावे लागते. हे साध्य करायचे असल्यास मानसिक प्रतिमा बदलण्याचे आणि नवीन मानसिक प्रतिमा तयार करण्याचे कौशल्य शिकणे महत्त्वाचे ठरते.
आपली स्वतःची मानसिक प्रतिमा तयार करण्याची मानसिकता कशी बनवावी?
वेगवान वातावरणात, मानसिक प्रतिमा तुम्हाला जलद विचार करण्यात आणि निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात.
१) लोकांचे निरीक्षण करा
तुमचे स्वतःचे मानसिक मॉडेल विकसित करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे इतर लोकांकडून प्रेरणा मिळवणे. एखादी व्यक्ती निर्णय घेत असल्यास स्वतःला विचारा, ‘त्यांनी हा निर्णय का घेतला? ते काय विचार करत होते? त्यांनी कोणती मानसिक प्रतिमा वापरली असेल?’ आपल्या सर्वांचा एक मित्र किंवा सहकारी असतो ज्यांच्या कामाची आपण प्रशंसा करतो. तुम्ही त्यांना एका जटिल परिस्थितीत विशिष्ट निवड करताना पाहता, तेव्हा त्यांना विचारा की ते त्या निर्णयावर कसे आले.
२) निसर्गाकडून शिका
निसर्ग अनेक नियमांचे पालन करतो. निसर्गाकडून आपण बऱ्याच गोष्टी शिकू शकतो. आतापर्यंत लागलेले शोध हे निसर्गाकडून मिळालेल्या प्रेरणेतच आहेत. उदा. विमानाचा शोध हा पक्ष्यांच्या उडण्याच्या प्रेरणेतून लागला.
३) अभिप्राय विचारा
एखाद्या मित्राला किंवा सहकाऱ्याला तुम्ही कसे वागता याचे निरीक्षण करण्यास सांगा आणि तुम्हाला कदाचित स्पष्ट नसलेले वर्तन ओळखण्याची मदत मागा. हा एक आश्चर्यकारकपणे अस्वस्थ परंतु मनाचा विस्तार करणारा अभ्यास असू शकतो.
स्वतःला रचनात्मक मानसिक प्रतिमेपर्यंत मर्यादित करू नका. एकदा तुम्हाला तुमच्या विचारांचा पॅटर्न समजला, उमजला की मग तुम्ही स्वतःची कोणत्याही विषयावर मानसिक प्रतिमा तयार करायला सिद्ध झालात.
मानसिक प्रतिमा कशी तयार करावी?
१) तुमचे प्रश्न काय आहेत, ते एक कागदावर लिहून काढा.
२) अशा प्रश्न तुम्ही आधी कधी सोडवला आहे का ते बघा. अशा प्रकारचा प्रश्न कोठे तुम्ही वाचला आहे का, त्यावर कोठे आधी उपाय सापडला आहे का, हे तपासा
३) वरील उपाय अमलात आणला तर तो योग्य असेल का? नसेल तर वेगळे काही पर्याय आहेत का? वेगळे पर्याय शोधून काढायचे काही मार्ग आहेत का?
४) कोणता पर्याय या प्रश्नाला योग्य ठरेल?
हे करत असताना तुमच्या मनात असणाऱ्या सर्व विचारांना एक पॅटर्न द्या आणि तसाच कागदावर उतरण्याचा प्रयत्न करा.
मानसिक प्रतिमा तुम्ही कोठेही, शिक्षणापासून तर निर्णय प्रक्रियेपर्यंत कोठेही वापरू शकता.