esakal | संधी करिअरच्या... : बारावीनंतर... फॉरेन्सिक सायन्समधील करिअर
sakal

बोलून बातमी शोधा

Career Opportunity

संधी करिअरच्या... : बारावीनंतर... फॉरेन्सिक सायन्समधील करिअर

sakal_logo
By
विवेक वेलणकर

गुन्ह्यांची शास्त्रोक्त पद्धतीने उकल व्हावी आणि तीही निर्विवाद पुराव्यांच्या आधारे, यासाठी निर्माण झालेल्या शाखेला फॉरेन्सिक सायन्स असे म्हणतात. आपल्याकडे ‘सीआयडी’सारख्या दूरचित्रवाणी मालिकांमुळे या क्षेत्राबद्दल आकर्षण निर्माण झाले आहे.

बंदुकीपासून ते रक्ताच्या नमुन्यांच्या विश्लेषणापर्यंत आणि मानसिक चाचण्यांपासून डीएनए चाचण्यांपर्यंत अनेक प्रकारच्या गोष्टींचा समावेश या शाखेत होतो. गुन्हेगारीचे स्वरूप सातत्याने बदलत आहे आणि त्यावर शास्त्रीय पद्धतीने मात करून गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा होऊन कायद्याचा धाक निर्माण होण्यामध्ये या शास्त्राचा मोठा वाटा आहे. या शाखेत फिजिक्स, केमिस्ट्री, बायॉलॉजी व मॅथेमॅटिक्स या चारही विषयांचा अभ्यास करणे आवश्यक असते. बारावीनंतर या शाखेत बीएसस्‍सी व त्यानंतर एमएसस्सी करण्याची सोय देशातील अनेक संस्थांमध्ये, तसेच विद्यापीठात उपलब्ध आहेत. पंजाब, दिल्ली, लखनौपासून गुजरातपर्यंत अनेक विद्यापीठांमध्ये वैद्यकीय शास्त्र, अभियांत्रिकी, फार्मसी, विज्ञान पदवीनंतर फॉरेन्सिक सायन्स विषयात पदव्युत्तर शिक्षणाच्या उत्तम सोयी आहेत.

या क्षेत्राचे महत्त्व व काळाची गरज ओळखून महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून शासकीय न्याय सहायक विज्ञान संस्थेची तीन महाविद्यालये औरंगाबाद, नागपूर व मुंबई या ठिकाणी सुरू केली आहेत. या तीनही संस्थांमध्ये बीएसस्सी, एमएस्सी हे फॉरेन्सिक सायन्समधील कोर्सेस आहेतच, पण याशिवाय पीजी डिप्लोमा इन फॉरेन्सिक सायन्स व पी जी डिप्लोमा इन डिजिटल ॲड सायबर फॉरेन्सिक सायन्स हे एक वर्षाचे पदव्युत्तर डिप्लोमा कोर्सेस ही उपलब्ध आहेत.

बीएससी फॉरेन्सिक सायन्स

शासकीय न्याय सहायक विज्ञान संस्थेच्या औरंगाबाद, नागपूर व मुंबई या तीनही महाविद्यालयात बारावी सायन्सनंतर तीन वर्षे कालावधीचा बीएसस्सीचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. यासाठी कोणतीही स्वतंत्र प्रवेशपरीक्षा घेतली जात नाही, तर बारावीच्या बोर्डाच्या मार्कांआधारे प्रवेश दिला जातो. यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने संस्थेच्या संकेतस्थळावर अर्ज करावे लागतात, आलेल्या अर्जांची बारावीच्या गुणांच्या आधारे मेरीट लिस्ट तयार केली जाते व त्याआधारे प्रवेश मिळतो. मुंबई येथील संस्थेचे instforensicscimumbai.in हे संकेतस्थळ आहे तर नागपूर येथील संस्थेचे ifscnagpur.in हे संकेतस्थळ आहे, तर औरंगाबाद येथील संस्थेचे gifsa.ac.in हे संकेतस्थळ आहे ‌.

या क्षेत्रात गुन्हे विश्लेषक, बॅलास्टिक तज्ज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डीएनए ॲनालिस्ट, डिजिटल फॉरेन्सिक तज्ज्ञ , पॉलिग्राफ परीक्षक अशा विविध संधी उपलब्ध आहेत.

loading image
go to top