esakal | संधी करिअरच्या... : चार्टर्ड अकाउंटंट बनण्यासाठी...
sakal

बोलून बातमी शोधा

Chartered Accountant

संधी करिअरच्या... : चार्टर्ड अकाउंटंट बनण्यासाठी...

sakal_logo
By
विवेक वेलणकर

वाणिज्य शाखेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचे अंतिम ध्येय चार्टर्ड अकाउंटंट होण्याचे असते. नोकरी व व्यवसाय या दोन्ही क्षेत्रांत संधी उपलब्ध करून देणारा सर्वव्यापी असा हा अभ्यासक्रम आहे. यामध्ये आर्थिक व सामाजिक प्रतिष्ठा निश्चितपणे मिळते.

चार्टर्ड अकाउंटंटच्या अभ्यासक्रमाची आखणी करून परीक्षांचे नियंत्रण करण्याची संविधानिक जबाबदारी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया या स्वायत्त संस्थेकडे देण्यात आली आहे. चार्टर्ड अकाउंटंट होण्यासाठी परीक्षापद्धती त्रिस्तरीय असते. पहिली परीक्षा फाउंडेशन परीक्षा नावाने ओळखली जाते. जून व डिसेंबर अशी वर्षातून दोनदा ही परीक्षा घेतली जाते. बारावीनंतर विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. या परीक्षेत दोनशे गुणांचे दीर्घोत्तरी प्रश्न असतात. अकाउंटन्सी, लॉ व बिझनेस करोस्पॉन्डन्स या तीन विषयांची ही परीक्षा असून कमीत कमी शंभर गुण उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक आहेत. याशिवाय ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे २०० गुणांचे प्रश्न असतात, ज्यामध्ये बिझनेस मॅथेमॅटिक्स, लॉजिकल रीझनिंग, इकॉनॉमिक्स, कमर्शिअल नॉलेज या विषयांवर प्रश्न असतात.

उत्तीर्ण होण्यासाठी कमीत कमी शंभर गुण आवश्यक आहेत. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना इंटरमिजिएट परीक्षेचे दोन ग्रुप द्यावे लागतात. यातील पहिला ग्रुप उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना व्यावसायिक चार्टर्ड अकाउंटंटच्या हाताखाली तीन वर्षांचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव घ्यावा लागतो. या कालावधीत त्यांना उत्तम अनुभवाबरोबरच विद्यावेतन ही मिळते. आर्टिकलशिपच्या तिसऱ्या वर्षापासून विद्यार्थ्यांना चार्टर्ड अकाउंटंटच्या फायनल परीक्षेला बसता येते. अंतिम परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया या संस्थेचे सभासदत्व घेता येते.अभ्यासक्रमाच्या तिन्ही टप्प्यांमध्ये अकाउंटन्सी हा पायाभूत विषय असून गणित, अर्थशास्त्र, विविध कायदे, प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष कर, कॉस्टिंग, लेखापरीक्षण, अर्थव्यवस्थापन, संगणक असे इतर विषयही अभ्यासावे लागतात. व्यावसायिक चार्टर्ड अकाउंटंट ना लेखा परीक्षण, हिशेब तयार करणे, सल्ला सेवा, कर सल्ला, संगणक क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, नोकरी अशा विविध संधी उपलब्ध होतात.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या टिप्स

१. अभियांत्रिकी, वैद्यकीय यांच्या तोडीचा अभ्यासक्रम असूनही खर्च अतिशय कमी येतो. संस्थेची नोंदणी, परीक्षा शुल्क, संगणक प्रशिक्षण शुल्क मिळून पन्नास हजार रुपयांच्या आसपास खर्च येतो. क्लासेससाठी येणारा खर्च वेगळा, पण तीन वर्षांच्या आर्टिकलशिपच्या कालावधीत विद्यावेतनही मिळते.

२. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विषयांचे सखोल आकलन व उत्तराची योग्य मांडणी करण्याची क्षमता असणे आवश्यक असते. प्रथमपासूनच मेहनत, योग्य मार्गदर्शन, आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टिकोन या चतु:सुत्रीच्या आधारे विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम पूर्ण करता येतो.

३. भारतातून चार्टर्ड अकाउंटंट झालेल्या विद्यार्थ्यांना इंग्लंडमध्ये फक्त थोड्या विषयांची परीक्षा देऊन तिथली चार्टर्ड अकाउंटंटची पदवी मिळवता येते.

४. बी.कॉम ५५ टक्क्यांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना फाउंडेशन परीक्षा न देता थेट आर्टिकलशिप सुरू करता येते.

५. चार्टर्ड अकाउंटंट च्या अभ्यासक्रमाची अधिक माहिती www.icai.org या संकेतस्थळावर मिळेल.