संधी करिअरच्या... : बारावीनंतर फिजिओथेरपी, स्पीच थेरपी

बारावीनंतर आरोग्य विज्ञान शाखांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली राष्ट्रीय पातळीवरील ‘नीट’ परीक्षा नुकतीच पार पडली आहे.
physiotherapy speech therapy
physiotherapy speech therapySakal

बारावीनंतर आरोग्य विज्ञान शाखांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली राष्ट्रीय पातळीवरील ‘नीट’ परीक्षा नुकतीच पार पडली आहे. लवकरच या परीक्षेचा निकाल जाहीर होईल, त्यानंतर आरोग्य विज्ञान शाखांची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. यामधील तीन महत्त्वाच्या आणि उत्तम करिअर संधी मिळवून देणाऱ्या शाखांची माहिती घेऊ या...

फिजिओथेरपी

बारावीनंतर चार वर्षांचा हा पदवी अभ्यासक्रम असून ‘नीट’परीक्षेतील गुणांच्या आधारे महाराष्ट्रातील सदतीस (शासकीय व खासगी मिळून ) १५८० जागा उपलब्ध होतात. यातील काही ठिकाणी दोन वर्षांच्या मास्टर्स डिग्रीचीही सोय आहे. फिजिओथेरपी हा वैद्यकीय शाखेच्या जवळपास सर्वच स्पेशलायझेशनचा अविभाज्य भाग बनला आहे. प्रौढ आणि लहान मुलांमधील मेंदूचे आजार, ऑर्थोपेडिक, कार्डिऍक, मेडिसीन , प्रसूतिपूर्व व प्रसूत्योत्तर, क्रीडावैद्यक अशा सर्वच रुग्णोपचारांमध्ये फिजिओथेरपीचे साहाय्य लागते. रुग्णांच्या शास्त्रशुद्ध हालचाली व व्यायाम यातून त्याला बरे करण्यासाठी मोलाची मदत फिजिओथेरपी मधून मिळते. अर्धांगवायू झालेल्या रुग्णांसाठी तर ही अत्यंत प्रभावी व टिकाऊ उपचार पद्धती आहे. या क्षेत्राची व्याप्ती आज फक्त रुग्णोपचारापुरती मर्यादित नाही तर सर्वसामान्य शारीरिक तंदुरुस्ती, त्याचबरोबर खेळाडूंची तंदुरुस्ती या क्षेत्रातही फिजिओथेरपीचे स्थान मोलाचं आहे. फिजिओथेरपी पदवीधरांना स्वतःची स्वतंत्र प्रॅक्टिस करणे शक्य आहेच , परंतु त्याशिवाय विविध रुग्णालयांत नोकरीच्याही खूप संधी उपलब्ध आहेत. युरोप, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांत फिजिओथेरपी पदवीधरांना उत्तम संधी उपलब्ध आहेत.

स्पीच थेरपी व ऑडिऑलॉजी

बारावीनंतर हा चार वर्षांचा अभ्यासक्रम असून ‘नीट’ परीक्षेतील गुणांच्या आधारे महाराष्ट्रातील दोन महाविद्यालयांत प्रवेश मिळतो. बोलण्यातील तोतरेपणा, बोबडेपणा अशा व्यंगांवर उपचारांचे शिक्षण यामध्ये दिले जाते. कॅन्सर वा अन्य रोगांमुळे स्वरयंत्रावर शस्त्रक्रियेमुळे झालेला परिणाम असो वा अर्धांगवायूमुळे बोलण्यावर झालेला परिणाम असो... स्पीच थेरपी उपयुक्त ठरते. याशिवाय श्रवण दोषांवर वर उपचारही या शाखेत शिकवले जातात. हिअरिंग साधने वापरून श्रवणदोषांवर मात करण्यासाठीची कौशल्ये शिकवली जातात.

ऑक्युपेशनल थेरपी

बारावीनंतर चार वर्षांचा हा पदवी अभ्यासक्रम असून ‘नीट’परीक्षेतील गुणांच्या आधारे महाराष्ट्रातील पाच महाविद्यालयात प्रवेशासाठी १२० जागा उपलब्ध आहेत. शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या दुर्बल झालेल्या रुग्णांना परत एकदा उभे करणे आणि त्यांना त्यांची दैनंदिन कामे योग्य रीतीने करता येण्यासाठी गरजेप्रमाणे उपचार करणे हे या उपचार पद्धतीचे मूळ तत्त्व आहे. यामध्ये अपघातांत अवयव गमावलेल्या लोकांपासून हे अल्झायमर्स, अर्थारायटीस, स्किझोफ्रेनिया यासारख्या आजारांनी त्रस्त रुग्णांपर्यंत सर्व प्रकारच्या रुग्णांवरील उपचारांचा समावेश होतो. ऑक्युपेशनल थेरपी पदवीधरांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या अनेक संधी आपल्या देशात उपलब्ध आहेतच, परंतु त्याचबरोबर परदेशातही उत्तम संधी उपलब्ध आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com