esakal | संधी करिअरच्या... : बारावीनंतर ‘फाईन आर्ट्स
sakal

बोलून बातमी शोधा

Career Opportunity

संधी करिअरच्या... : बारावीनंतर ‘फाईन आर्ट्स

sakal_logo
By
विवेक वेलणकर

अनेक मुलांना चित्रकला, शिल्पकला, पेंटिंग, सिरॅमिक्स, डिझायनिंग या क्षेत्रांत आवड असते. अशा विद्यार्थ्यांना बारावीनंतर फाईन आर्ट्समध्ये ‘बीएफए’ची पदवी मिळवून करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतात.

बारावीनंतर चार वर्षांच्या या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील आठ शासकीय व खासगी महाविद्यालयांत प्रवेशासाठी कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य एक प्रवेश परीक्षा घेते. मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स, नागपूरचे चित्रकला महाविद्यालय, औरंगाबादचे शासकीय स्कूल ऑफ आर्ट्स यांसारख्या शासकीय महाविद्यालयांपासून मुंबईच्या रचना संसद, सावंतवाडीतील बांदेकर कॉलेज, डी. वाय. पाटील कॉलेज व भारती विद्यापीठ, पुणे या महाविद्यालयांमध्ये या ‘बीएफए’ प्रवेश परीक्षेतून प्रवेश मिळतो. कोणत्याही शाखेतून इंग्रजी विषय घेऊन किमान पंचेचाळीस टक्के गुण मिळवून बारावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी ही प्रवेशपरीक्षा देऊ शकतो.

एकूण दोनशे गुणांच्या या परीक्षेत चार पेपर असतात. एक पेपर ऑब्जेक्ट ड्रॉइंगचा असतो, ज्यामध्ये स्पेसिमेनचे ड्रॉइंग एक तासात काढावे लागते. दुसरा पेपर डिझाईन प्रॅक्टिकलचा असतो, ज्यामध्ये एक डिझाईन दीड तासांत काढावे लागते. तिसरा पेपर मेमरी ड्रॉइंगचा असतो, ज्यामध्ये एक तासात मेमरी ड्रॉइंग काढावे लागते. हे तीनही पेपर्स प्रत्येकी पन्नास मार्कांचे असतात. चौथा चाळीस मार्कांचा पेपर ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा असतो, ज्यामध्ये कला, हस्तकला, ड्रॉइंग, डिझाईन यांसारख्या विषयांवर प्रश्न विचारले जातात. यावर्षीच्या परीक्षेसाठी www.mahacet.org या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जुलै आहे. परीक्षेची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

या संकेतस्थळावर गेल्या काही वर्षांचे पेपर्स उपलब्ध आहेत. या परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वरील महाविद्यालयांत प्रवेश मिळतो. पेंटिंग , सिरॅमिक्स ,ॲप्लाइड आर्ट्स, मेटल वर्कपासून टेक्स्टाईल डिझायनिंग, इंटिरिअर डेकोरेशनपर्यंत अनेक विषयांत बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स ही पदवी मिळवता येते. हा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी मल्टिमीडिया/ ॲनिमेशन, वेब डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग, सेट डिझायनिंग या क्षेत्रात काम करू शकतात, तसेच कमर्शिअल आर्टिस्ट म्हणून जाहिरात संस्थांमध्येही काम करू शकतात अथवा स्वतंत्र व्यवसाय करू शकतात. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये आर्ट गॅलरीज स्थापन झालेल्या आहेत, त्यामुळे चित्रकारांना लोकाश्रय व समाजमान्यता मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

loading image