प्रेरकांचे प्रेरक गोष्टी सांगतात तेव्हा...

सुमारे पावणेदोनशे वर्षांपूर्वीची ही गोष्ट. पश्चिम बंगालमधील दक्षिणेश्वर येथील कालीमातेच्या मंदिरातील एक पुजारी, त्याला कित्येक जण वेडा ठरवत असत.
Ek Gost Sangato Book
Ek Gost Sangato Booksakal

आपण प्रेरणा देणाऱ्या अनेक कथा ऐकतो, वाचतो, पण अशा प्रेरक व्यक्तींना प्रेरणा देणाऱ्या व्यक्तीने सांगितलेल्या कथा, जर आपल्याला पुस्तक रूपात वाचायला मिळाल्या तर, तर काय होईल? याची अनुभूती तुम्हाला हवी असेल, तर तुम्ही हे पुस्तक आवर्जून वाचा !

सुमारे पावणेदोनशे वर्षांपूर्वीची ही गोष्ट. पश्चिम बंगालमधील दक्षिणेश्वर येथील कालीमातेच्या मंदिरातील एक पुजारी, त्याला कित्येक जण वेडा ठरवत असत. कारण, तो माणसांनी एकमेकांशी गप्पा माराव्यात, तितक्या सहजतेने कालीमातेशी संवाद साधत असे. मात्र, तत्कालीन काही लोकांच्या दृष्टीने पागल असणाऱ्या पुजाऱ्याने जगाला प्रेरणा देणारी एक अख्खी पिढी घडवली.

ही व्यक्ती म्हणजे विवेकानंदांचे गुरू भगवान रामकृष्ण परमहंस. रामकृष्णांची त्यांच्या शिष्यांना शिकवण द्यायची एक सोपी पद्धत होती, ते अगदी व्यवहारातील किंवा परमार्थातील तत्वज्ञान त्यांच्या शिष्यांना समजावे यासाठी बऱ्याचदा गोष्टीरूपाने सांगत असत.

त्यांच्या याच कथांचा संग्रह त्यांच्या काही शिष्यांनी तयार करून ठेवला आणि रामकृष्ण मठाने, त्यांच्या १७५ व्या जयंतीनिमित्त तो प्रकाशित केला. या कथासंग्रहाचीच माहिती आपण घेणार आहोत. या पुस्तकाचे नाव आहे, ‘एक गोष्ट सांगतो.’

या पुस्तकामध्ये रामकृष्ण परमहंस यांनी त्यांच्या शिष्यांना वेळोवेळी सांगितलेल्या कथांपैकी १०३ कथांचा मराठी अनुवाद देण्यात आला आहे. या कथा मोठ्या रंजक आणि बोधप्रद आहेत. क्वचित काही कथा आपल्याला माहिती असल्या तरीदेखील त्या कथेकडे पाहण्याची आणि त्यातून बोध घेण्याची एक वेगळीच दृष्टी रामकृष्ण परमहंस देतात.

दक्षिणेश्वरच्या एका छोट्याशा खोलीत रामकृष्ण परमहंस आणि त्यांची पत्नी शारदामाता राहात असत. त्या एवढ्याशा खोलीत त्यांच्याभोवती नेहमी जिज्ञासूंचा मोठा गराडा असे. या जिज्ञासूंच्या शंकांना उत्तर देताना ते बंगालीत म्हणत असत, ‘एकटा गल्प शून’ अर्थात एक गोष्ट सांगतो ती ऐक!

आणि मग त्या जिज्ञासूच्या शंकेचे निरसन एखाद्या रसाळ कथेद्वारे ते करत असत. त्याच कथा या पुस्तकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. या कथांबरोबरच त्या अनुषंगाने या पुस्तकात सुरेख, रंगीत चित्रेदेखील साकारण्यात आली आहेत. त्यामुळे हे पुस्तक अत्यंत देखणेही झालेले आहे.

विशेष म्हणजे, जगभरातील जवळपास सर्व प्रमुख तत्त्वज्ञानांचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या रामकृष्णांच्या या कथांमध्ये अगदी व्यवहारिक जीवनातील मार्गदर्शनदेखील आहे. ते लहान मुले, युवक यांच्याप्रमाणे सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी आहे.

आपले आयुष्य उत्तम जगू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी या पुस्तकात देण्यात आलेल्या कथा मार्गदर्शकाप्रमाणे काम करणाऱ्या आहेत. रामकृष्णांच्या शिष्यांनी प्रत्यक्ष अनुभवून असे सांगितले आहे की, चटकन कोणालाही लळा लागावा इतक्याच रसाळपणे ते कथा सांगत असत. त्यांच्या कथांचा हा मराठी अनुवाद वाचताना हीच अनुभूती वाचकालाही येते.

(संकलन : रोहित वाळिंबे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com