स्वतःचं ‘व्हीजन’ हवं!

दिग्दर्शक हा संपूर्ण चित्रपटाच्या युनिटचा सेनापती असतो.
director ajay naik
director ajay naiksakal
Updated on

दिग्दर्शक हा संपूर्ण चित्रपटाच्या युनिटचा सेनापती असतो. कोणताही ‘सीन’ पडद्यावर येण्यापूर्वी दिग्दर्शकाला तो कॅमेऱ्यात दिसतो आणि त्याही आधी त्याच्या मनात त्या ‘सीन’ची प्रतिमा असावी. चित्रपटाच्या विषयापासून ते तांत्रिक साधनांपर्यंतच्या विविध गोष्टींची माहिती त्याला पाहिजे. समाजमनाची नस ओळखून विषयाची मांडणी करण्याचं कौशल्यपूर्ण काम दिग्दर्शकाचं असल्याने त्याने संवेदनशील असावं लागतं.

आपण दिग्दर्शन करू शकतो ही जाणीव कधी झाली?

- मी मूळ संगीतकार. संगीतकार म्हणून काम करत असतानाच निर्माता झालो. निर्माता, संगीतकार अशा दोन्ही भूमिकांमधून काम करत असताना चित्रपट माध्यमाशी जवळून संबंध येत होताच. त्यातच माझ्या ‘सतरंगी रे’ (२०१२) या चित्रपटाच्या वेळी दिग्दर्शनाच्या दृष्टीनेही काही गोष्टी सांगत होतो. त्यामुळे आमचे सिनेमॅटोग्राफर संदीप पाटील म्हणाले की, ‘‘तू दिग्दर्शन करू शकतोस.’’ त्यानंतर मी या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला.

दिग्दर्शकाकडे कोणती कौशल्ये असावीत?

- नाटकाला रंगमंचाची चौकट, मर्यादा असते. चित्रपटाला ती कॅमेऱ्यातून सांभाळावी लागते. ‘व्हिज्युअल्स’ पक्के असावे लागतात. दिग्दर्शकाच्या अंगात व्यवस्थापकाचेही गुण असावे लागतात. त्याला अभिनेत्याला सांगायचं असतं की, हा सीन असा हवा. तोच सीन कॅमेऱ्यातून कसा टिपायचा हे कॅमेरामनला सांगायचं असतं. आर्ट डिरेक्टरला तोच सीन कसा दिसेल? हे सांगायचं असतं आणि महत्त्वाचं म्हणजे तो चित्रपट पडद्यावर येणं का आवश्‍यक आहे? हे त्याला निर्मात्याला पटवून द्यायचं असतं. त्यामुळे एका दिग्दर्शकात उद्योजक होण्यासाठीची कौशल्येही असावी लागतात. त्याचबरोबर वाचन, वास्तवाचं भान, भाषेचा अभ्यास, मांडणी, समाजातील घडामोडींचं विश्‍लेषण करण्याची क्षमता हेही दिग्दर्शकाच्या अंगी असावं लागतं.

दिग्दर्शक होण्यासाठी काय करावं?

- या क्षेत्रात खूप विविध पद्धतीने लोक येत असतात. काही लोक थेट काम सुरू करतात, काही लोक विविध संस्थांमधून प्रशिक्षण घेऊन येतात, काही नाटक-मालिकांचा अनुभव घेऊन येतात, तर काहींना ओळखीतूनही संधी मिळते. तुमचा प्रवेश कसाही होत असला, तरी तुमच्या अंगात काही विशिष्ट गुण, कौशल्ये असावीच लागतात. अनेक गोष्टी साध्या डोळ्यांना छान दिसतात. मात्र, कॅमेऱ्यात त्या छान दिसत नाहीत. या उलट काही फक्त कॅमेऱ्यात छान दिसतात, प्रत्यक्षात नाही. हे सर्व दिग्दर्शकाला ओळखता आणि ठरवता यायला हवं. तुमची व्यक्त होण्याची पद्धत कशी आहे? तुम्ही त्यासाठी कोणती भाषा, संदर्भ, माध्यम, मांडणी वापरत आहात? यावर चित्रपटाचं यश ठरतं. हा व्यवसाय असल्यामुळे आर्थिक गणिते कळायला हवी. तुम्ही ज्या प्रेक्षकवर्गासाठी चित्रपट तयार करत आहात, त्याच्या मनःस्थितीचा, विचारांचा अभ्यासही करावा लागतो.

कॅमेरा, रोल, ॲक्शन...

  • स्वतःला जवळचा वाटेल असा विषय निवडा.

  • विषय निवडल्यावर त्यासाठी आवश्‍यक ती पूर्वतयारी आणि अभ्यास करा.

  • आर्थिक गणिते, बदलते तंत्रज्ञान आणि समाजस्वास्थ या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करू नका.

  • पंचेंद्रिये सतत उघडी ठेवा आणि प्रामाणिक राहा.

(शब्दांकन : मयूर भावे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com