
चिंचवड पोटनिवडणुकीत अजित पवारांच्या वर्चस्वाला धक्का! भाजपच्या अश्विनी जगताप यांचा दणदणीत विजय |Chinchwad By-Election Result
Chinchwad: चिंचवड पोटनिवडणुकीत अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांचा धक्कादायक रित्या पराभव झाला आहे. 'काटे की टक्कर' अशी ही लढत पाहिला मिळाली होती. मात्र भाजपच्या अश्विनी जगताप यांनी ३६ हजार १६८ मतांनी नाना काटे यांचा पराभव केला आहे.
अश्विनी जगताप यांना १ लाख ३५ हजार ४३४ मते मिळाली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांना ९९ हजार ३४३ मते मिळाली. महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ४४ हजार ०८२ मते मिळाली.
ही निवडणूक एकतर्फी होईल अशी परस्थिती होती. मात्र राष्ट्रवादीने तगडी टक्कर दिली तरी देखील भाजपला गड राखण्यास यश आलं आहे. या जागेसाठी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी ताकत लावली होती. तर या पराभवामुळे अजित पवारांच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे.
या जागेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील प्रचारात उतरले होते. दरम्यान चिंचवडमध्ये ५०.४७ टक्के मतदान पार पडलं होतं.
मात्र मविआला राहुल कलाटे यांच्या बंडखोरीचा मोठा फटका बसला त्यामुळेच नाना काटे यांचा पराभव झाला अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी देखील दिली आहे. जर ही बंडखोरी थोपवण्यास मविआला यश आलं असतं तर या जागेवर मविआचा उमेदवार नक्कीच विजयी झाला असता.