
मोठी बातमी! ९ महापालिकांची आरक्षण सोडत स्थगित
औरंगाबाद : महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शुक्रवारी काढण्यात येणारी आरक्षण सोडत अखेर स्थगित करण्यात आली आहे. रात्री उशिरा निवडणूक आयोगाने केलेल्या सूचनेनुसार ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली असल्याचे औरंगाबाद महापालिकेच्या निवडणूक विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त संतोष टेंगळे यांनी सांगितले. याशिवाय राज्यातील अन्य आठ महापालिकांच्या निवडणुकांसाठीची आरक्षण सोडतही स्थगित करण्यात आली आहे. तसेच अन्य १४ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीची आरक्षण सोडत स्थगित करण्यात आलीये.
औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना अंतिम करण्यात आली होती. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने शहराची वाढती लोकसंख्या गृहीत धरून नगरसेवकांची संख्या वाढविली होती. १२६ नगरसेवकांचे ४२ प्रभाग तयार करून प्रभाग रचना अंतिम करण्यात आली. नियोजित वेळापत्रकानुसार शुक्रवारी संत एकनाथ रंगमंदिरात सकाळी ११ वाजता आरक्षण सोडत काढली जाणार होती. पण बुधवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी नगरसेवकांची वाढीव संख्या कमी करण्याचा व चार वॉर्डांचा एक प्रभाग अशी रचना करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लोकसंख्येच्या निकषानुसार आता महापालिकेत ११५ नगरसेवकच राहणार आहेत. यासंदर्भात महापालिकेच्या निवडणूक विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त संतोष टेंगळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, रात्री उशिरा निवडणूक आयोगाने केलेल्या सूचनेनुसार उद्याची सोडत स्थगित करण्यात आली आहे.
सर्वच प्रक्रिया नव्याने होणार
राज्य शासनाच्या बुधवारच्या निर्णयानुसार राज्य निवडणूक आयोगाकडून पुढील आदेश प्राप्त झाल्यास सर्वच प्रक्रिया नव्याने राबवली जाणार आहे. सध्याची प्रभाग रचना १२६ वॉर्डांची आहे. ११५ वॉर्ड झाल्यास प्रभागांचे क्षेत्रफळ वाढणार आहे. नव्याने प्रक्रिया राबविण्यासाठी निवडणूक आयोगाच्या आदेशाची वाट पाहावी लागणार आहे.
औरंगाबादसह नांदेड- वाघाळा, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल आणि मीरा-भाईंदर या 9 महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी काढण्यात येणारी आरक्षण सोडत स्थगित करण्यात आलीये. तसेच मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर या 14 महानगरपालिकांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचनादेखील प्रसिद्ध केली जाणार नाही.
Web Title: Election News Postponed Reservation Of 9 Municipalities Aurangabad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..