
Kasba Bypoll Election 2023: कसब्याची लढाई; सर्वाधिक रसद कोणाकडे? रासणे की धंगेकर
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील भाजप व मित्रपक्ष यांचे उमेदवार हेमंत रासने आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे स्थावर व जंगम मालमत्ता अशी मिळूण एकूण १४ कोटी ७३ लाख ३९ हजार ७२० रुपयांची मालमत्ता आहे.
तर हेमंत रासने यांच्या नावावर ३ कोटी ५५ लाख ६३ हजार रुपयांचे कर्ज व त्यांच्या पत्नीच्या नावावर २४ लाख ९३ हजार २६३ रुपयांचे कर्ज आहे. रासने यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासोबत जोडलेल्या शपथपत्रावरून ही माहिती समोर आली आहे.
रासने यांनी त्यांचे वार्षिक उत्पन्न ५ लाख ७५ हजार ४१० रुपये इतके दाखविले आहे. विविध बॅंकांमध्ये मुदत ठेवी आहेत.
तसेच शेअर्स, तीन कंपन्यांमध्ये भांडवल गुंतविले आहेत. तसेच त्यांच्या नावावर कोकणातील दापोली, भोर आणि म्हाळुंगे येथे जमीन आहे.
शिवाय सदाशिव पेठ येथे दुकाने असून बुधवार पेठ येथे सदनिका आहेत. रासने यांच्याकडील स्थावर व जंगम मालमत्तांची एकूण किंमत ९ कोटी ८१ लाख ४१ हजार रुपये इतकी आहे.
रासने यांच्या पत्नीकडे १८ तोळे सोने असून त्याची किंमत ८ लाख १३ हजार ६०० इतकी आहे. तर चांदी २५० ग्रॅम असून त्याची किंमत १७ हजार ५०० रुपये इतकी आहे.
तसेच रोख रक्कम २२ हजार २०० रुपये इतकी असून एकूण स्थावर मालमत्ता २७ लाख ५९ हजार ३५७ इतकी आहे. त्यांच्या पत्नीच्या नावावर २४ लाख ९३ हजार २३६ रुपयांचे कर्ज आहे.
तर मुलीच्या नावावर ५४ लाख आठ हजार ४२३ रुपये व मुलाच्या १ कोटी ५६ लाख ५७८ रूपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे.
रासने १२ वी पास असून त्यांचा शेती, भाडे आणि बांधकाम व्यवसाय असल्याचे शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे.
रासने यांच्याकडील मालमत्तेची स्थिती
१० तोळे सोने , किंमत ४ लाख ५२ हजार रुपये
जंगम मालमत्ता, १ कोटी ८२ लाख ८१ हजार ३६२ रुपये
स्थावर मालमत्ता, ७ कोटी ९८ लाख ६0 हजार रुपये
रोख रक्कम, १ लाख ३५ हजार रुपये
काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर आणि दाम्पत्याकडे आठ कोटींची संपत्ती
कसबा पेठ विधानसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीकडे एकूण ८ कोटी ३६ लाख १० हजार रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे.
तर धंगेकर यांच्या नावावर ३५ लाख ७३ हजार रुपयांचे कर्ज, तर पत्नीच्या नावावर ३२ लाख ८ हजार रुपयांचे कर्ज आहे.
धंगेकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्जासोबत त्यांनी जोडलेल्या शपथपत्रावरून ही माहिती समोर आली आहे.
धंगेकर यांचा शेती व सोने-चांदी कारागिरी आणि बांधकाम हा व्यवसाय आहे. तसेच त्यांचे शिक्षण आठवीपर्यंत झाले आहे. धंगेकर यांच्या पत्नीकडे ६८ लाख ६७ हजार ३७६ रुपयांची मालमत्ता असून २ कोटी ६० लाख ७२ हजार ९९४ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
धंगेकर यांच्याकडे दहा तोळे सोने, तर पत्नीकडे १५ तोळे सोने आहे. धंगेकर यांच्या रविवार पेठ, मंगळवार पेठ, कसबा पेठ आणि शिवाजीनगर येथे सदनिका आहेत. तर यांची दौंड तालुक्यातील पिंपळगाव येथे शेती असून कोथरूड येथे साडेचार हजार चौरस फुटांची बिनशेती जागा आहे.
मालमत्तेची स्थिती
सोने, १० तोळे
जंगम मालमत्ता, ४७ लाख ६ हजार १२८ रुपये
स्थावर मालमत्ता, ४ कोटी ५९ लाख २७ हजार ९१६
वार्षिक उत्पन्न, ३ लाख ३६ हजार रुपये