उत्तराखंडमधील सस्पेंस संपला; धामी उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

Pushkar Singh Dhami
Pushkar Singh Dhamiesakal
Summary

नुकत्याच झालेल्या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपानं दणदणीत विजय मिळवला होता.

देहराडून : नुकत्याच झालेल्या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपानं दणदणीत विजय मिळवला होता. त्यात उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) स्पष्ट बहुमतासह सत्ता कायम राखत भाजपानं (BJP) नवा इतिहास रचला होता. परंतु, उत्तराखंडचे विद्यमान मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) पराभूत झाल्यानं आता भाजपा मुख्यमंत्री म्हणून कुणाची निवड करणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं.

गेल्या आठवडाभरापासून त्यावर भाजपाच्या अंतर्गत गोटात खल सुरू होता. या सर्व घडामोडींनंतर अखेर मुख्यमंत्री म्हणून पुष्कर सिंह धामी यांच्या नावावरच शिक्कामोर्तब करण्यात आलंय. उत्तराखंड भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर पुष्कर सिंह धामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (Narendra Modi) सर्व नेत्यांचे आभार मानलेत. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल पंतप्रधानांसह गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) आणि इतर सर्वांचे मी आभार मानू इच्छितो. कारण, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मुख्य सेवक म्हणून काम करण्याची संधी मिळालीय, असं त्यांनी नमूद केलं.

सोमवारी, देहराडूनमध्ये विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून धामी यांच्या निवडीची घोषणा केंद्रीय पक्ष निरीक्षक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मीनाक्षी लेखी यांनी केली. धामी यांचा शपथविधी सोहळा उद्या 23 मार्च रोजी देहराडूनच्या परेड ग्राऊंडवर होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान आणि अमित शाह यांच्याशिवाय सर्व बडे नेते सहभागी होणार आहेत. एवढंच नाही तर यावेळी भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहू शकतात.

नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी झालेल्या भाजपाच्या आमदारांच्या बैठकीत पुष्कर सिंह धामी यांची भाजपाच्या विधिमंडळ सदस्यांच्या नेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून राजनाथ सिंह, मीनाक्षी लेखी आणि निवडणूक प्रभारी प्रल्हाद जोशी उपस्थित होते. उत्तराखंडमधील विधानसभेच्या ७० जागांसाठी १४ फेब्रुवारी रोजी मतदान झालं होतं. तर, १० मार्च रोजी निकाल जाहीर झाले. यामध्ये ७० पैकी ४७ जागा जिंकत दोन तृतियांश बहुमतासह भाजपानं पुन्हा एकदा सत्ता मिळवली. मात्र, पुष्कर सिंह धामी पराभूत झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com