
‘सखी सावित्री’ द्वारे विद्यार्थ्यांना मिळणार सुरक्षित वातावरणात शिक्षण
पुणे: राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप वातावरण निर्मितीसाठी शालेय शिक्षण विभागातर्फे ‘सखी सावित्री समिती’ स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती शाळा, केंद्र आणि तालुका/शहर स्तरावर असणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची १०० टक्के पटनोंदणी आणि उपस्थितीबाबत आग्रही असणे, तसेच विद्यार्थ्यांच्या भावनिक, शारीरीक व बौद्धिक विकासासाठी या समित्या कार्यरत असणार आहेत. प्रत्येक पातळ्यांवर पालकांचे समुपदेशन करण्यावर समितीद्वारे भर देण्यात येईल, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
सद्यःस्थितीत मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेबाबत प्राधान्याने लक्ष केंद्रित करण्याची गरज जाणवत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुला-मुलींच्या शिक्षणावर दूरगामी परिणाम झालेले आहेत. पालकांच्या स्थलांतरामुळे शाळाबाह्य विद्यार्थीचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. तसेच बालविवाहांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे, अशा परिस्थितीत घर, शाळा आणि समाजात विद्यार्थ्यांची सुरक्षित व बालस्नेही वातावरण मिळावे, म्हणून वेगवेगळ्या पातळ्यांवर ‘सखी सावित्री समिती’ स्थापन करण्यात येतील. विद्यार्थ्यांचे सामाजिक, भावनिक, अध्ययन उत्तमरीत्या व्हावे, यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२५ व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विविध स्तरावर समित्या स्थापन करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाचे सह सचिव इम्तियाज काझी यांनी अध्यादेशाद्वारे दिले आहेत.
हेही वाचा: The Kashmir Files:सिनेमा पाहून प्रेक्षक रडतायत,एका महिलेनं तर चक्क...
शिक्षण विभागाच्या आदेशानुसार शाळा स्तरावरील समितीला महिन्यातून एक वेळा बैठक आयोजित करावी लागेल. या बैठकीचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत केंद्रस्तर समितीसमोर सादर करावा लागणार आहे. त्यातून केंद्रातील विद्यार्थिनींच्या शिक्षणाबाबत व इतर समस्यांबाबत अडचणी समजू शकतील आणि त्यावर तातडीने निर्णय घेणे शक्य होणार आहे. प्रत्येक केंद्रस्तर समितीने कार्याचा अहवाल तालुका स्तर समितीच्या प्रत्येक तीन महिन्याच्या बैठकीत सादर करावा, तर तालुका/शहर केंद्र स्तर समितीच्या कार्याचा अहवाल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत आयोजित जिल्हा गुणवत्ता कक्षाच्या बैठकीत सादर करणे गरजेचे राहणार आहे.
‘सखी सावित्री समिती’ची अशी असेल जबाबदारी:
कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती साध्य करणे, त्यासाठी पटनोंदणी करणे
विद्यार्थी, पालकांचे समुपदेशन करणे
करिअरसंबंधी मार्गदर्शन, शासकीय योजनांची माहिती देणे
बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती करणे
कौशल्य विकास होण्यासाठी विविध उपक्रम राबविणे
शैक्षणिक नुकसान कमी करण्यासाठी उपाययोजना करणे
हेही वाचा: भावकीच्या भांडणातून तरुणाचा खून: सात जणांवर गुन्हा दाखल
अशी असेल शाळा स्तरावरील समितीची रचना:
अध्यक्ष - शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष, सदस्य - शाळेतील महिला शिक्षक, समुपदेशक, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ (महिला), अंगणवाडी सेविका, पोलिस पाटील, ग्रामपंचायत सदस्य (महिला), पालक (महिला), शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी, सदस्य सचिव - शाळेचे मुख्याध्यापक
शहर केंद्रस्तर समितीची अशी असेल रचना:
अध्यक्ष : प्रशासन अधिकारी, शहर साधन केंद्र संपर्क अधिकारी (डायट), विधिज्ञ (महिला), पंचायत समिती सदस्य (महिला), वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ (महिला), बाल विकास प्रकल्प अधिकारी, पोलिस निरीक्षक/ पोलिस उपनिरीक्षक, बालरक्षक, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, समुपदेशक, सदस्य सचिव विस्तार अधिकारी
हेही वाचा: शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्प तोट्याचा की फायद्याचा? अजित नवलेंनी मांडली भूमिका
Web Title: Savitribai Phule Pune News School Updates
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..