
Telangana Election : केसीआर यांच्याकडून आश्वासनांचा सपाटा तर अमित शाहांकडून सर्वाधिक भ्रष्टाचारी असल्याची टीका
मानकोंडूर(तेलंगण): ‘‘तेलंगणमध्ये तांदळाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, राज्यात पुन्हा सत्तेत आल्यास सर्वत्र अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करण्यात येतील, या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल’’ असे आश्वासन तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सोमवारी करीमनगर जिल्ह्यातील मानकोंडूर येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत दिले आहे.
राज्यात पुन्हा सत्ता आल्यास रिक्षाचालकांकडून प्रतिवर्षी ‘तंदुरुस्ती प्रमाणपत्र’घेण्याची पद्धत बंद करण्यात येईल, असे आश्वासनही राव यांनी सभेत बोलताना केले दिले आहे. केसीआर यांनी यावेळी काँग्रेसवरही जोरदार टीका केली आहे. काँग्रेसने १९५०मध्ये तेलंगणमधील जनतेच्या इच्छेविरुद्ध तेलंगण राज्य आंध्र प्रदेशात विलीन केले, असा आरोप केसीआर यांनी यावेळी केला.
त्याचप्रमाणे राव यांनी पुन्हा एकदा इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळावर टीका केली आहे. तेलंगणसह संयुक्त आंध्र प्रदेश असताना के.टी. रामाराव मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी गरिबांसाठी अवघ्या दोन रुपयांत तांदूळ द्यायला सुरूवात केली. तोवर येथील नागरिकांची मोठ्याप्रमाणात उपासमार होत होती असा दावाही राव यांनी केला आहे. यावेळी राव यांनी काँग्रेसवरही टीका केली, ‘‘काँग्रेसचे नेते आरोप करतात की ‘रायथू बंधू’ योजना ही करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी आहे. खरोखर ही उधळपट्टी आहे काय याचे उत्तर आता जनतेनेच द्यावे’’ असे राव म्हणाले.
केसीआर देशात भ्रष्टाचारात अव्वल- अमित शाह
तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर हे देशात भ्रष्टाचारात अव्वल आहेत, असा आरोप गृहमंत्री अमित शहा यांनी केला. तेलंगणात भाजपची सत्ता आल्यास बीआरएस सरकारच्या भ्रष्ट व्यवहाराची आणि कराराची तपासणी केली जाईल आणि ज्या मंडळींनी गैरप्रकार केला आहे, त्यांना तुरुंगात डांबले जाईल, असेही शहा म्हणाले.
जनगाव येथे प्रचारसभेत बोलताना गृहमंत्री अमित शहा यांनी बीआरएस सरकारच्या काळातील कथित गैरव्यवहाराचा उल्लेख केला. यात कालेश्वरम प्रकल्प, मद्य गैरव्यवहार आणि हैदराबादच्या मियापूर येथील जमीन व्यवहाराचा समावेश आहे.
केसीआर हे देशात भ्रष्टाचार करण्यात पहिल्या क्रमांकांवर आहेत आणि भाजपकडून त्यांच्या भ्रष्ट व्यवहाराची तपासणी करून भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात पाठवण्यात येईल, असे शहा म्हणाले. दोनच दिवसांपूर्वी भाजपने जाहीर केलेल्या संकल्पपत्रात सत्तेत आल्यानंतर कालेश्वरम आणि धरणीसह विकासाच्या नावावर सुरू केलेल्या अनेक योजनांची चौकशी केली जाईल आणि त्यासाठी समिती नेमली जाईल. या योजनेचा खर्च प्रचंड वाढला असून त्यात भ्रष्टाचार होत असल्याचेही भाजपचे म्हणणे आहे.
अमित शहा यांनी आणखी एका आश्वासनाची आठवण करून दिली. ते म्हणाले, ‘‘३० नोव्हेंबरच्या निवडणुकीत भाजप सत्तेवर येत असेल तर मागासवर्गीयातील नेत्याला राज्याचे मुख्यमंत्री केले जाईल. शिवाय राज्यातील जनतेला अयोध्येत श्रीराम मंदिराचे मोफत दर्शनाची व्यवस्था केली जाईल.’’