अभिनेते शत्रुघ्न सिन्हांच्या विरोधात भाजप देणार तगडा उमेदवार; 'हे' नाव आघाडीवर I Political News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actor Shatrughan Sinha

माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांना उमेदवारी देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते आवाज उठवत आहेत.

अभिनेते शत्रुघ्न सिन्हांच्या विरोधात भाजप देणार तगडा उमेदवार

आसनसोल : बंगालमधील (Bengal) आसनसोल लोकसभा मतदारसंघात भाजपनं सलग दोनदा विजयाचा झेंडा फडकावलाय. आसनसोलच्या माध्यमातून भाजपनं बंगालचं भगवंकरण करण्याची राजकीय मोहीम पुढं नेलीय, असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाहीय. गेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) बाबुल सुप्रियो भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. बाबुल यांना केंद्रीय मंत्रीपद न मिळाल्यानं त्यांनी भाजपला (BJP) सोडचिठ्ठी दिली. तसंच त्यांनी लोकसभा सदस्यपदाचाही राजीनामा दिला. दरम्यान, पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यानंतर अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Actor Shatrughan Sinha) यांना तृणमूल काँग्रेसनं (Congress) उमेदवार म्हणून घोषित केलंय. तर, पार्थ मुखर्जी डाव्या आघाडीतून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

परंतु, इथं भाजपची विश्वासार्हता पणाला लागलीय. भाजपनं हा गड जिंकला, तर हॅटट्रिक होईल आणि पराभव झाला तर मोठा गड ढासळला जाईल, असं चित्र सध्या बंगालमध्ये पहायला मिळतंय. त्यामुळं उमेदवार निवडीसाठी भाजपमध्ये जोरदार मंथन सुरूय. दरम्यान, आसनसोल महापालिकेचे माजी महापौर राहिलेले जितेंद्र तिवारी (Jitendra Tiwari) यांचं नाव तिकीटाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. त्याचबरोबर माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन (Former cricketer Mohammad Azharuddin) यांना उमेदवारी देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते आवाज उठवत आहेत. होळीनंतर भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांची नावं समोर येऊ शकतात, असं जाणकारांचं मत आहे.

विशेष म्हणजे, 2014 मध्ये भाजपनं बंगालमध्ये पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवली होती. त्यानंतर गायक बाबुल सुप्रियो आसनसोलमधून खासदार म्हणून निवडून आले. त्यांना केंद्रीय मंत्रीही करण्यात आलं. दरम्यान, 2019 मध्येही भाजपनं बाबुल यांना उमेदवारी दिली होती. ते दुसऱ्यांदाही खासदार म्हणून निवडून आले. मात्र, भाजपनं त्यांना केंद्रात मंत्री न केल्यामुळं बाबूल यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. आसनसोल लोकसभा मतदारसंघ (Asansol Lok Sabha Constituency) भाजपसाठी सोपा आहे. कारण, इथं जास्त हिंदी भाषिक आहेत. बिहार आणि उत्तर प्रदेश वंशाच्या लोकांची लोकसंख्या इथं सर्वाधिक आहे. याच कारणामुळं तृणमूलनं बिहारी बाबूंना संधी दिलीय. शत्रुघ्न सिन्हाही यापूर्वी भाजपमध्ये होते. ते केंद्रीय मंत्रीही राहिले आहेत.

भाजपकडून जितेंद्र तिवारीचं नाव आघाडीवर

तृणमूलनं शत्रुघ्न सिन्हा यांना उमेदवार म्हणून घोषित केल्यापासून, भाजप एका मजबूत हिंदी भाषिक चेहऱ्याच्या शोधात आहे. सध्या तिकिटाच्या शर्यतीत जितेंद्र तिवारी यांचं नाव पुढं आहे. जितेंद्र हा एक असा चेहरा आहे, जो सगळ्यांना ओळखतो. जितेंद्र तिवारी यांच्या मार्गात काटे घालण्यास उत्सुक असलेला भाजपचा एक गटही आहे. बाराबनीमध्ये भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी जितेंद्र तिवारी यांना तिकीट मिळू नये, अशी पोस्टर्सही लावली आहेत. त्यामुळं आणखी चेहरेही पाहायला मिळणार आहेत.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा करणार शत्रुघ्न सिन्हांचा प्रचार

शत्रुघ्न सिन्हा 20 मार्चपासून प्रचाराला सुरुवात करणार आहेत. त्यांच्यासोबत त्याची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Actress Sonakshi Sinha) देखील असण्याची शक्यता आहे. आसनसोल लोकसभा आणि बालीगंज विधानसभेसाठी 12 एप्रिलला मतदान होणार आहे. त्याचबरोबर बाबुल सुप्रियो यांनीही प्रचाराला सुरुवात केलीय.