
महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. गेल्या काही वर्षांत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात विविध आंदोलने झाली असून, त्यांचा परिणाम राज्याच्या राजकीय वातावरणावरही पडला आहे. २७ ऑगस्टपासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक नेता मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाने राज्य सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता, विशेषतः गणपती उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता वाढली होती. अशा संकटकाळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या एका धोरणात्मक निर्णयाने डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांना 'मुख्यमंत्र्यांचे नवे संकटमोचक' म्हणून ओळख मिळाली.