esakal | अन्नपानविधी - फळवर्ग 
sakal

बोलून बातमी शोधा

Annapaanvidhi phalvarga

अन्नपानविधी - फळवर्ग 

sakal_logo
By
डॉ. श्री बालाजी तांबे

 आंब्याचा हंगाम जवळ येत आहे. मधुमेह, रक्‍तविकार, आमविकार असणाऱ्या व्यक्‍तींखेरीज इतरांनी उन्हाळ्यात ताजा आंबा खाणे उत्तम होय. आंबा पचला असता त्यामुळे मांस व शुक्रधातूचे उत्तम पोषण होते. 
 

मागच्या अंकात आपण फळवर्गातील नारळ या बहुपयोगी फळाची माहिती घेतली. आज आबालवृद्धांना आवडणाऱ्या आंब्याचे आयुर्वेदाच्या दृष्टीने काय काय उपयोग असतात हे पाहू या. 


आंब्याच्या अनेक जाती आहेत. रसाचा आंबा वेगळा, नुसता खाण्याचा आंबा वेगळा, चोखून खाण्याचा आंबा वेगळा, लोणच्याचा आंबा त्याहून वेगळा. हापूस, पायरी, तोतापुरी, राजापुरी, लंगडा आंबा, बारमाही आंबा अशा काही मोजक्‍या जाती आपल्या परिचयाच्या असतात, मात्र प्रत्यक्षात आंब्याच्या हजाराहून अधिक जाती अस्तित्वात आहेत. आंब्याचे गुण आयुर्वेदात पुढीलप्रमाणे समजावले आहेत, 
पक्वाम्रो मधुरः शुक्रवर्धकः पौष्टिकः स्मृतः । 
गुरुः कान्तितृप्तिकरः किंचिदम्लो रुचिप्रदः ।। 
हृद्यो मांसबलानां च वर्धकः कफकारकः । 
तुवरश्च तृषावातश्रमाणां नाशकः स्मृतः ।। 

...निघण्टु रत्नाकर 
पिकलेला आंबा चवीला गोड पण किंचित आंबट व तुरट असतो, पचण्यास जड असतो, शुक्रधातू वाढवतो, पौष्टिक असतो, चवीला अतिशय रुचकर असतो, तृप्ती करणारा असतो, मांसधातूची ताकद वाढवतो, कफकर असतो, तृष्णा, वात व श्रमाचा नाश करतो. 


आंबा खाण्यापूर्वी वाहत्या पाण्याने स्वच्छ धुणे व तासभर थंड (सामान्य तपमानाच्या) पाण्यात बुडवून ठेवणे व नंतर खाणे चांगले असते. आंबा खायची सर्वात चांगली पद्धत म्हणजे त्याचा रस काढून, आतील दोरे, रेषा निघून जाण्यासाठी चाळणीने चाळून घेऊन, वाटीभर रसात दोन-तीन चमचे पातळ केलेले आयुर्वेदिक तूप, दोन चिमूट सुंठपूड किंवा पाव चमचा वेलची, दालचीनी, तमालपत्र, खरे नागकेशर यांचे मिश्रण मिसळून खाणे. अशा रीतीने सेवन केल्यास आंबा पचणे सोपे जाते. असा आंब्याचा रस खाल्ल्यास अशक्‍तता दूर होऊन शुक्रधातूची ताकद वाढते, कफदोषाचे संतुलन झाल्याने शांत झोप यायला मदत मिळते, वजन कमी असल्यास वाढते, चिडचिडेपणा कमी होतो, हृदयाची ताकद वाढते. मधुमेह, रक्‍तविकार, आमविकार असणाऱ्या व्यक्‍तींखेरीज इतरांनी उन्हाळ्यात ताजा आंबा खाणे उत्तम होय. आंबा पचला असता त्यामुळे मांस व शुक्रधातूचे उत्तम पोषण होते. 


फळाच्या आत अतिशय कठीण बाठ असते व हिच्या आत अजून एक छोटी बी असते, जी तुरट व कडू चवीची असते. आंब्याची बाठ निखाऱ्यात भाजून आतली बी बारीक करून ठेवतात, जुलाब होत असल्यास हे पाव चमचा चूर्ण ताकासह घेण्याचा उपयोग होतो. लहान मुलांना मधात उगाळून दिली तसेच पाण्यात उगाळून पोटावर लेप केल्यानेही गूण येतो. या बीचे चिमूटभर चूर्ण हिरड्यांना चोळल्यास हिरड्यांतून पू येणे, रक्‍त येणे वगैरे तक्रारी कमी होतात, तसेच हिरड्या घट्ट व्हायला मदत मिळते. 


आंब्याची पाने तुरट चवीची असतात. कोवळी पाने चघळल्याने तोंड स्वच्छ होण्यास मदत मिळते, हिरड्या-दातांचे आरोग्य चांगले राहण्यास तसेच हिरड्या घट्ट होण्यास मदत मिळते. 


कैरी कोवळी असताना तुरट, आंबट असते, तर नंतर फक्‍त आंबट असते. वात-पित्त वाढवणारी कैरी सहसा नुसती खाता येत नाही मात्र कैरीचे पन्हे हे उन्हाळ्यातील एक उत्तम पेय होय. पन्हे उन्हाळ्यामुळे मंद झालेल्या अग्नीला ताकद देते, रुची वाढवते, तीव्र उष्णतेमुळे क्षीण झालेल्या रसधातूची शक्‍ती वाढवते व तहान शमवते. 


आंब्याची ओली साल अंघोळीच्या आधी अंगाला चोळल्यास त्वचेचे पोषण होते तसेच त्वचा घट्ट व्हायला मदत मिळते. 


‘पंचपल्लव’ या गणामध्ये आंब्याच्या पानांचा अंतर्भाव आहे. ही तुरट चवीची असतात. कोवळी पाने चावून थुंकून द्यावीत. याने तोंड स्वच्छ होते, हिरड्या-दातांचे आरोग्य सुधारते, हिरड्या घट्ट होतात. 


झाडाची साल देखील औषधात वापरतात. सालीच्या काढ्याच्या गुळण्या केल्यास वारंवार तोंड येणे कमी होते. ही साल गर्भाशयाची सूज कमी करण्यासाठीही उपयुक्‍त असते. या काढ्याची उत्तरबस्ती घेतल्यास गर्भाशयाची सूज कमी होऊन अंगावरून पांढरे किंवा रक्‍तस्राव होणे थांबते, मात्र हा उपचार तज्ज्ञांकडूनच करून घ्यावा. 


अशा प्रकारे ‘आंबा’ हा बहुपयोगी वृक्ष आहे, उन्हाळ्यातील थकवा दूर करण्यासाठी, रसधातूला टवटवीत करण्यासाठी आणि शुक्रधातूचे पोषण करण्यासाठी जणू निसर्गाने दिलेले हे वरदानच आहे. विधिवत व योग्य प्रमाणात खाल्लेला आंबा याची प्रचिती नक्की देईल. 


‘उन्हाळ्याखेरीज आंबा खाऊ नये’ अशीही सूचना काही ठिकाणी दिलेली आढळते. प्रत्यक्षातही पावसाळा सुरू झाल्यावर आंबा खाल्ल्यास त्रास होताना दिसतो. म्हणून आंबा ताजा असतानाच खाल्लेला चांगला.