अन्नपानविधी- शाकवर्ग 

Annapaanvidhi Shakvarga
Annapaanvidhi Shakvarga

पावसाळ्यात भरपूर उगवणारी टाकळा ही पालेभाजी त्वचारोगावर गुणकारी आहे. पित्तदोष व वातदोष कमी करणारी ही भाजी हृदयासाठीही हितकर आहे. 

सामान्यतः सर्वांच्या परिचयाच्या असणाऱ्या पालेभाज्यांची आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून माहिती पाहिली. आज फारशा वापरात नसणाऱ्या, पण सहज उपलब्ध होऊ शकणाऱ्या पालेभाज्यांची माहिती घेऊ या. 

टाकळा 
ही भाजी फक्‍त पावसाळ्यात मिळते आणि हवी तेवढी म्हणजे मोठ्या प्रमाणावर उगवते. रस्त्याच्या कडेला, लागवड न करताही ही भाजी येते. साधारण दोन-तीन फूट उंच वाढते. याला पिवळी फुले येतात. लांबसडक बारीक शेंगा येतात. शेंगेमधील बी हुबेहूब मेथीच्या बीप्रमाणे दिसते. कोवळ्या पानांची म्हणजे फुले धरण्याअगोवर भाजी केली जाते. 
आयुर्वेदात टाकळा हा त्वचारोगांवरचे उत्तम औषध समजला जातो. याची भाजीसुद्धा याच गुणांचा असते. 
चक्रमर्दो लघुः स्वादु रुक्षः पित्तानिलापहः । 
हृद्यो हिमः कफश्वासकुष्ठदद्रुकृमीन्हरेत्‌।। 

...भवप्रकाश 
टाकळा पचायला हलका, चवीला गोड, गुणाने रुक्ष असतो, पित्तदोष तसेच वातदोषाला कमी करतो, हृदयासाठी हितकर, वीर्याने शीत, कफनाशक, दमा, त्वचारोग, खाज जंत यांचा नाश करणारा असतो. 

अंगाला खाज येत असल्यास टाकळ्याची भाजी उत्कृष्ट पथ्यकर समजावी. विशेषतः गजकर्ण (छोटी पुटकुळी उठून ती गोलाकार पसरत जाते व त्या ठिकाणी असह्य खाज येते) या विकारावर टाकळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी खाणे व पानांचा रस कंड येणाऱ्या जागेवर लावणे हे उपयोगी पडते. 

खरूज हा सुद्धा खाज येऊन बेजार करणारा त्वचाविकार. खरूज ओली असो वा कोरडी, त्यावर टाकळ्याची पाने वाटून तयार केलेल्या चटणीची चकती लावून ठेवल्याने आराम मिळते. बरोबरीने टाकळ्याची भाजी आहारात समाविष्ट करण्याचा अधिक उपयोग होतो. 

शरीरावर कुठेही गाठ आली असली, विशेषतः चरबीच्या गाठी आल्या असल्या तर त्यावर टाकळ्याची पाने वाफवून सोसवतील इतकी गरम करून बांधून ठेवण्याचा उपयोग होतो. जर गाठीमुळे वेदना होत असतील तर त्याही कमी होतात. 

अंगावर पांढरे डाग पडणे, विशेषतः चेहऱ्यावर फिकट पांढरे डाग येणे, अंगाला कंड येणे, पोटात जंत होणे वगैरे तक्रारींवर टाकळ्याची भाजी आहारात ठेवणे लाभदायक असते. 

अनावश्‍यक चरबी नष्ट करण्यासाठी टाकळ्याच्या पानांचा रस उपयोगी पडतो. विशेषतः पोट, नितंब या ठिकाणची चरबी कमी करण्यासाठी, त्या ठिकाणची शिथिलता कमी करण्यासाठी टाकळ्याच्या पानांचा रस चोळून लावण्याचा उपयोग होतो. बरोबरीने आहारात टाकळ्याच्या पानांची भाजी, नाचणी, भगर, राजगिरा, ज्वारी, बाजरी ही धान्ये समाविष्ट करण्याचा अजून चांगला फायदा होतो. 

सध्या प्रदूषण, रासायनिक प्रसाधनांचा सातत्याने वापर, प्रखर प्रकाश यांच्या योगे त्वचा निस्तेज होण्याची अनेक उदाहरणे दिसतात. त्वचा पुन्हा सतेज व उजळण्यासाठी, त्वचेचा निबरपणा कमी होण्यासाठी टाकळ्याच्या पानांच्या रसात मसुराचे पीठ भिजवून ते उटण्याप्रमाणे लावून स्नान करण्याचा उपयोग होतो. यातच अष्टगंध व इतर वर्ण्य द्रव्यांनी युक्‍त सॅन मसाज पावडरसारखे उटणे मिसळले तर अजून चांगला गुण येतो. 

मुका मार लागल्याने सूज आली असेल, त्या ठिकाणी वेदना होत असतील तर त्यावर टाकळ्याची पाने वाफवून शेकण्याचा उपयोग होतो. 

टाकळ्याच्या बिया उत्तम कृमीनाशक असतात. जंत पडून जाण्यासाठी अर्धा चमचा प्रमाणात या बियांचे चूर्ण तीन दिवस घेऊन नंतर एरंडेलाचा जुलाब घेण्याची पद्धत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com