अन्नपानविधी- शाकवर्ग 

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 27 September 2019

शाकवर्गात पालेभाज्या, फुलभाज्या, फळभाज्या, कंदमूळ आणि छत्रशाक (मशरूम) यांचा समावेश होतो. या सर्व प्रकारच्या भाज्या शिजवूनच खाव्यात. पालेभाज्यांपेक्षा फळभाज्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक योग्य असतात. 

शाकवर्गात पालेभाज्या, फुलभाज्या, फळभाज्या, कंदमूळ आणि छत्रशाक (मशरूम) यांचा समावेश होतो. या सर्व प्रकारच्या भाज्या शिजवूनच खाव्यात. पालेभाज्यांपेक्षा फळभाज्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक योग्य असतात. 

शाक म्हणजे भाजी. शाकवर्गात पालेभाज्या, फुलभाज्या, फळभाज्या, कंदमूळ आणि छत्रशाक (मशरूम) वगैरे उपप्रकारांचा समावेश होतो. हे प्रकार उत्तरोत्तर पचायला जड असतात, असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. म्हणजे पानापेक्षा फुले, फुलांपेक्षा फळे या क्रमाने कंदमुळे व मशरूम पचायला सर्वांत जड असतात. भाज्या शिजवूनच खाव्यात, असे आयुर्वेदाला अपेक्षित असते. कच्चे खायचे पदार्थ आयुर्वेदात वेगळे सांगितलेले आहेत. याच मालिकेमध्ये ‘हरितक वर्गात’ आपण त्यांचा माहिती घेणार आहोत. पालेभाज्यांपेक्षा फळभाज्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक प्रशस्त असतात. त्यामुळे आपणाही शाकवर्गाची सुरवात फळभाज्यांनी करणार आहोत. 

फळभाज्यांमध्ये वेलीवर येणाऱ्या दुधी, तोंडली, घोसाळी, दोडकी, पडवळ, परवर, कारले, कोहळा, तांबडा भोपळा, कर्टोली वगैरे भाज्या बहुतेक प्रकृतींसाठी पथ्यकर असतात. भेंडी, वांगे, ढोबळी मिरची, कोबी, फ्लॉवर, परदेशांतून आलेली आणि दिवसेंदिवस लोकप्रिय होणारी झुकिनी, ब्रोकोली यासुद्धा फळभाज्यांमध्येच मोडतात. 

दुधी भोपळा 
सर्वप्रथम माहिती घेऊया ती दुधी भोपळ्याची. दुधीला संस्कृतमध्ये तुम्बी असे म्हणतात. दुधी अथवा तुम्बी लांबट आकाराची असते, तर गोल आकाराच्या पांढऱ्या भोपळ्याला कुंभतुम्बी असे म्हटले जाते. 

बाराही महिने मिळणारी, सर्व प्रकृतींसाठी अनुकूल असणारा, गर्भारपणात विशेष उपयोगी असणारी फळभाजी म्हणजे दुधी होय. 
तुम्बी तु मधुरा स्निग्धा गर्भपोषणकारिणी । 
...निघण्टु रत्नाकर 
मिष्टतुम्बीफलं हृद्यं पित्तश्‍लेष्मापहं गुरु । वृष्यं रुचिकरं प्रोक्‍तं धातुपुष्टिविवर्धनम्‌ ।। 
....भावप्रकाश 
दुधी चवीला गोड, गुणांनी स्निग्ध व गर्भाचे पोषण करणारी असते, हृदयासाठी हितकर असते, पित्त तसेच कफदोषाचे शमन करते, वृष्य म्हणजे शुक्रधातूसाठी हितकर असते, रुचकर असते व धातूंसाठी पोषक असते. 

दुधी थंड असल्याने पित्तदोषावर औषधाप्रमाणे उपयोगी पडते. पित्त वाढल्याने वारंवार डोके दुखणे, अंगात कडकी राहणे, उष्णतेमुळे शरीरात दाह होणे वगैरे लक्षणांवर दुधीचा मोरांबा करून रोज थोडा थोडा घेण्याचा उपयोग होतो. दुधीचे तुकडे करून ते पाण्यात वाफवून, साखरेत मिसळून तीन तारी पाक करून दुधीची मोरांबा करून ठेवता येतो. दुधी नेहमी कोवळा आहे पाहूनच घ्यावा. जून दुधी अपथ्यकर असतो. कोवळ्या दुधी भोपळ्याची तुपात जिरे, धणे, हळद, आले टाकून केलेली भाजी मूळव्याधीचा त्रास असणाऱ्यांसाठी, तसेच आम्लपित्ताचा त्रास असणाऱ्यांसाठी पथ्यकर असते. 

दुधी पोट साफ होण्यास मदत करते, पण बरोबरीने मलप्रवृत्ती बांधून होण्यासही मदत करते. त्यामुळे ज्यांना पातळ मलप्रवृत्ती होण्याची प्रवृत्ती असते, त्यांच्यासाठी दुधी साल काढून जाडसर किसून, तुपावर जिरे, मिरी पूड, सैंधव मिसळून छोट्या वाटीभर प्रमाणात खाणे हितावह असते. 

दुधी हलवा, जून दुधीतील बियांमधील मगज हा शुक्रधातूसाठी पौष्टिक असतो. गर्भाधारणेपूर्वी उभयतांनी दुधी हलव्याचा आहारात समावेश करणे, गर्भारपणातही दुधीची भाजी अधिकाधिक आहारात ठेवणे हे उत्तम असते. गर्भवती स्त्रीसाठी दुधी भोपळ्याच्या बिया वाटून त्यात दूध व खडीसाखर मिसळून घेणे चांगले असते. यामुळे गर्भवतीची ताकद टिकून राहते, गर्भाचेही पोषण होते. 

उन्हात फार वेळ राहण्याने, किंवा रात्रीच्या जागरणाने लघवीला जळजळ होत असली तर, सेंद्रिय पद्धतीने उगवलेल्या दुधीचा चार चमचे रस त्यात चमचाभर खडीसाखर, अर्धा चमचा धण्याची पूड मिसळून घेण्याने लागलीच गुण येतो. दिवसातून दोन-तीन वेळा याप्रकारे दुधीचा रस घेतल्यास बरे वाटू लागते. 

हाता-पायाच्या तळव्यांची आग होत असली तर, रात्री झोपण्यापूर्वी दुधीचा कच्चा कीस बांधण्याचा उपयोग होतो. डोळ्यांची आग होत असेल, डोळे लाल होत असतील तर, दुधी किसून काढलेल्या रसात कापूस भिजवून त्याच्या घड्या बंद डोळ्यांवर ठेवण्याने बरे वाटते. 
सेंद्रिय दुधी असेल तर तिची साल काढून ती तुपावर परतून तीळ, आले, मीठ, चवीपुरते तिखट, लिंबू, टाकून सुकी चटणी करता येते. ही चटणी अत्यंत रुचकर असते. 

स्तन्यपान करणारे बालक बाळसे धरत नसेल, तर आईच्या आहारात दुधी हलवा, दुधीची भाजी समाविष्ट करण्याचा उपयोग होतो. बाळ सहा महिन्यांनंतर वरचे अन्न खाऊ लागले की वरण-भातासह किंवा खिचडीबरोबर कुस्करलेली दुधीची भाजी थोडी थोडी देता येते. 
मुगाचे कढण बनविताना त्यात दुधी टाकली, तर तयार होणारे सूप अजूनच पौष्टिक बनते. याला वरून तूप-जिरे-कढीपत्त्याची फोडणी दिली, चवीनुसार मिरपूड, किसलेले आले व मीठ मिसळले तर सूप अजूनच रुचकर बनते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Annapaanvidhi Shakvarga written by Dr Shri Balaji Tambe