अन्नपानविधी- शमीवर्ग 

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 20 September 2019

मटार पथ्यकर आहारात विशेष बसत नाही. ज्यांची पचनशक्‍ती उत्तम आहे, म्हणजे ज्यांना भूक नीट लागते, जे भरपूर व्यायाम करतात, ज्यांना कधीच अपचन होत नाही त्यांना अधून मधून मटार किंवा वाटाणा सेवन करण्यास हरकत नसावी. ज्यांना भूक चांगली लागते, पण वजन भरत नाही त्यांनी ताज्या गावरान मटाराच्या शेंगा भाजून घेऊन आतील कोवळे दाणे खाण्याचा उपयोग होतो. 

मटार पथ्यकर आहारात विशेष बसत नाही. ज्यांची पचनशक्‍ती उत्तम आहे, म्हणजे ज्यांना भूक नीट लागते, जे भरपूर व्यायाम करतात, ज्यांना कधीच अपचन होत नाही त्यांना अधून मधून मटार किंवा वाटाणा सेवन करण्यास हरकत नसावी. ज्यांना भूक चांगली लागते, पण वजन भरत नाही त्यांनी ताज्या गावरान मटाराच्या शेंगा भाजून घेऊन आतील कोवळे दाणे खाण्याचा उपयोग होतो. 

मटार-वाटाणा 
शिंबी वर्गातील पथ्यकर व वापरात असणाऱ्या कडधान्यांची माहिती आपण घेतो आहोत. औषध म्हणून वापरले न जाणारे मात्र चवीने खाल्ले जाणारे एक कडधान्य म्हणजे मटार किंवा वाटाणा. मटार ताजे असतात म्हणजे शेंगा सोलून काढले जातात. सुकलेले वाटाणे रंगभेदाने दोन प्रकारचे असतात. काळे वाटाणे कोकणात आवडीने खाल्ले जातात. पांढऱ्या वाटाण्यांची उसळही प्रसिद्ध असते. 

 

कलायो वातलो रुच्यः पुष्टिकृत्‌ शीतलो मतः ।पाके च मधुरः प्रोक्‍तः तुवरश्चामदोषकृत्‌ । 
वाटाणे वातूळ, रुचकर, शरीराला पुष्टी देणारे असतात, वीर्याने शीतल व विपाकानंतर मधुर असले तरी आमदोष वाढविणारे असतात. 

 

या गुणधर्मामुळे मटार पथ्यकर आहारात विशेष बसत नाही. ज्यांची पचनशक्‍ती उत्तम आहे, म्हणजे ज्यांना भूक नीट लागते, जे भरपूर व्यायाम करतात, ज्यांना कधीच अपचन होत नाही त्यांना अधून मधून मटार किंवा वाटाणा सेवन करण्यास हरकत नसावी. ज्यांना भूक चांगली लागते पण वजन भरत नाही त्यांनी ताज्या गावरान मटाराच्या शेंगा भाजून घेऊन आतील कोवळे दाणे खाण्याचा उपयोग होतो. 
 

सध्या हिरवा मटार फ्रीझरमध्ये गोठवून वर्षभर हवा तेव्हा खाण्यासाठी वापरण्याची पद्धत रूढ झालेली दिसते. मात्र आधीच पचायला व वातूळ असणारा मटार या चुकीच्या संस्कारामुळे अजूनच अपथ्यकर बनतो. 
 

घेवड्याचे दाणे - कडवे वाल 
घेवड्याचे दाणे (म्हणजे गोड वालपापडी) आणि कडवे वाल यांचाही गणना कडधान्यांत होते. कोवळी गोड वालपापडी मडक्‍यात भाजून खाण्याची पद्धत आहे. हिवाळ्यात पौष्टिक म्हणून अशा प्रकारे वालपापडी खाता येते. भरपूर व्यायाम किंवा अतिरिक्‍त श्रम करणाऱ्यांना कडव्या वालाची उसळ खाण्याने शरीरपोषणास मदत मिळते. 

 

खूप भूक लागत असेल, व्यवस्थित जेवण केले तरी लगेच पुन्हा खूप भूक लागत असेल तर वालाची उसळ आहारात समाविष्ट करता येते. 
 

वाताचा त्रास असणाऱ्यांसाठी, पोटात वायू धरण्याची किंवा मलावष्टंभ होण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनी मात्र मटार, वाल या कडधान्यांपासून दूर राहणे श्रेयस्कर होय. 
कडधान्यांबद्दल सारांश रूपाने आयुर्वेदात दिलेली माहिती याप्रमाणे होय, 
मधुराः शीतलो गुर्व्यो बलघ्न्यो रुक्षणात्मिकाः । सरनेहा बलिभिर्भोज्या विविधाः शिम्बिजातयः।।  
...चरक सूत्रस्थान 

 

बहुतेक सर्व शिम्बी धान्ये चवीला गोड, वीर्याने थंड व पचण्यास जड असतात, शरीरात रुक्षता वाढवितात त्यामुळे बल कमी करतात. बलवान व्यक्‍तीने म्हणजे ज्यांची पचनशक्‍ती चांगली आहे, एकंदर शरीरशक्‍ती व्यवस्थित आहे त्यांनी कडधान्यांचे स्नेहासह म्हणजे तूप किंवा तेलासह सेवन करावे. 
 

एक गोष्ट यातून लक्षात येऊ शकते की कडधान्ये कच्च्या, न शिजवलेल्या स्वरूपात खाणे आयुर्वेदाला संमत नाही. 
 

चवळी, घेवडा, वाल वगैरेंच्या ओल्या ताज्या शेंगाही आहारात समाविष्ट केल्या जातात. यांचे स्वतंत्र गुण दिलेले नसले तरी सुश्रुताचार्यांनी याबाबत सांगितले आहे, 
विदाहवन्तश्च भृशं विरुक्षा विष्टभ्य जीर्यन्त्यनिलप्रदाश्च ।रुचिप्रदाश्चैव सुदुर्जराश्च सर्वे स्मृता वैदनिलास्तु शिम्बा ।। 
... सुश्रुत सूत्रस्थान 

 

सर्व कडधान्यांच्या ओल्या शेंगा घशाशी जळजळ करणाऱ्या असतात, अतिशय रुक्ष असतात, वात वाढवितात, मलावष्टंभ करतात, रुचकर असल्या तरी पचण्यास जड असतात. 
मोड आलेल्या धान्यांबाबतही सुश्रुतसंहितेत माहिती दिलेली आहे, 
विदाहि गुरु विष्टम्भि विरुढं दृष्टिदूषणम्‌ ।। 
....सुश्रुत सूत्रस्थान 
बहुतेक मोड आलेली धान्ये (न शिजवता) पचायला जड, घशाशी जळजळ करणारी, मलावष्टंभ करणारी व दृष्टीसाठी अपायकारक असतात. 

 

एकंदर काय तर प्रकृतीला अनुरूप असणाऱ्या कडधान्यांचा, डाळींचा रोजच्या आहारात योग्य प्रमाणात समावेश करणे चांगले, मात्र संतुलित आहार सोडून नुसतीच कडधान्ये खाणे किंवा रोज सकाळी नाश्‍त्यामध्ये कच्ची कडधान्ये खाणे टाळणेच सयुक्‍तिक होय. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Annapaanvidhi Shameevarga written by Dr Shri Balaji Tambe