#FamilyDoctor  स्तनांचा कर्करोग

डॉ. जयश्री बंकिरा
Friday, 2 November 2018

स्त्रिया स्वतःच्या शरीराविषयी, आरोग्याविषयी पुरेशी काळजी घेत नाहीत. सहन करण्याकडे, अंगावर दुखणे काढण्याकडे त्यांचा कल असतो. त्यामुळेच स्तनांचा कर्करोग हा अधिक गंभीर आजार बनू पाहात आहे. वेळीच काळजी घेतली तर हा आजार रोखता येतो.

भारतात स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. तरुण स्त्रियांमध्येही हा कर्करोग अधिक प्रमाणात आढळू लागला आहे. स्वतःच्या स्तनांविषयी पुरेसे जागरूक नसण्याने स्त्रियांना स्तनातील बदल कळण्यास विलंब होतो. मग डॉक्‍टरांकडून तपासणी करून घेण्यास आणि पर्यायाने निदानास झालेल्या विलंबामुळे भारतीयांमध्ये स्तनांचा कर्करोग झालेल्या महिलांमध्ये मृत्यूदर अधिक आहे. त्यातही जेव्हा माता आपल्या बाळाला स्तन्यपान देत असते, तेव्हा तिने तिच्या स्तनांची काळजी घेणेही अधिक आवश्‍यक असते. 

एक खरे की, स्तन्यपानाच्या काळात स्तनांचा कर्करोग होण्याची शक्‍यता फारच कमी म्हणजे केवळ पाच टक्के असते. म्हणजेच धोका कमी वाटला तरी तो नसतोच असे नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, स्तन्यपान देणाऱ्या माता आपल्या स्तनांमध्ये होणारे बदल टिपत असतात. त्यांच्या स्तनांमध्ये झालेले शारीरिक बदल त्यांच्या लक्षातही येतात. पण या टप्प्यात मातेच्या शरीरात अनेक प्रकारचे बदल होत असतात. त्यामुळे स्तनांमध्ये झालेल्या बदलांसाठी स्तन्यपान हे कारण असेल, असे मातेला वाटते आणि ती त्याकडे दुर्लक्ष करते. चूक येथेच होते. आपल्या स्तनामध्ये कोणत्याही प्रकारची गाठ नाही ना, तेथे वेदना होत नाही ना, स्तनाग्रांना पुरळ आलेला नाही ना, तेथे खाज येत नाही ना, यासारखी प्राथमिक निरीक्षणे स्त्रियांनी करायलाच हवीत. स्तनामध्ये थोडाही बदल झाला तरी आधी आपणच स्तनांची नीट तपासणी केली पाहिजे. कोणत्याही वयोगटातील स्त्रियांनी स्तनांमधील बदल आणि गाठी डॉक्‍टरांकडून तपासून घेऊन मनातल्या शंका दूर केल्या पाहिजेत.

स्तन्यपान देणाऱ्या महिलांच्या स्तनांमध्येही गाठी जाणवू शकतात. या गाठी कर्करोगाच्याच असतील असे अजिबात नाही. आणखीही काही कारणांनी स्तनांमध्ये गाठी तयार होऊ शकतात. त्या अशा :
    स्तनांना झालेला संसर्ग (मॅस्टिटिस)
    स्तनांना झालेले गळू
    तंतूग्रंथीअर्बुद (फायब्रोडेनोमा)
    गॅलॅक्‍टोसेलेस

स्त्रियांनी आपले स्तन तपासताना काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यावे. 
    स्तनांचा विस्तार, आकार आणि रूपातील बदल
    स्तनाग्रांमधून स्त्राव बाहेर येणे
    स्तनांमध्ये वेदना होणे
    स्तन लालसर होणे किंवा काळवंडणे
    स्तनांग्रांना कंड सुटणे किंवा पुरळ उठणे
    स्तनांना सूज येणे

असे काही आढळले, तर वैद्यकीय मदत घेणे आवश्‍यक आहे. स्तनाच्या कोणत्याही आजारावर वेळीच उपचार केले पाहिजेत. स्तनांमध्ये गाठ जाणवली किंवा पुढील लक्षणे जाणवली तर डॉक्‍टरांची तातडीने भेट घ्यायला हवी :
    आठवड्यानंतरही स्तनातील गाठ न जाणे
    उपचारांनंतरही त्याच ठिकाणी गाठ परत येणे
    गाठीची वाढ होणे
    गाठ कठीण होणे
    स्तनांना खळी पडणे

ही कोणतीही लक्षणे दिसली, वेदना होत नसल्या तरी त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. केवळ घरगुती उपचार करीत बसू नये, तर डॉक्‍टरांनी सुचवलेल्या चाचण्या तातडीने करून घ्याव्यात. दुखणे अंगावर काढता कामा नये. स्तनाचा कर्करोग वेळीच लक्षात आला तर धोकादायक नक्कीच नाही. योग्य त्या उपचारांनी रुग्ण कर्करोगमुक्त होऊ शकतो. काही वेळा स्तन्यपानकाळ सुरू असतानाच कर्करोग झाल्याचे कळते. स्तनांचा कर्करोग असल्याचे निदान झाले तरी कदाचित बाळाला स्तन्यपान देणे शक्‍य असते. मात्र योग्य त्या तपासण्यांनंतर स्तन्यपान करू देणे हे त्या मातेच्या व बाळाच्या आरोग्यासाठी कितपत चांगले आहे, ते डॉक्‍टरांना ठरवू द्या.

कोणत्याही स्त्रीने कायम लक्षात ठेवले पाहिजे की, आपणच नियमितपणे स्तनांची तपासणी करायची आणि नेहमीपेक्षा वेगळे जाणवले की डॉक्‍टरांकडे जाऊन शंका निरसन करून घ्यायचे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article on Breast Cancer