esakal | अन्नपानविधी
sakal

बोलून बातमी शोधा

Honey

स्वतःसाठी हितकर काय, अहितकर काय हे आयुर्वेदशास्त्राच्या मदतीने जाणून घेतले व त्यानुसार आहारयोजना केली तर आरोग्याचे रक्षण सोपे होते. त्यासाठी निरनिराळ्या आहारद्रव्यांचे गुण, दोष, चव, प्रभाव, वीर्य माहिती असणे आवश्‍यक असते.

अन्नपानविधी

sakal_logo
By
डॉ. श्री बालाजी तांबे

स्वतःसाठी हितकर काय, अहितकर काय हे आयुर्वेदशास्त्राच्या मदतीने जाणून घेतले व त्यानुसार आहारयोजना केली तर आरोग्याचे रक्षण सोपे होते. त्यासाठी निरनिराळ्या आहारद्रव्यांचे गुण, दोष, चव, प्रभाव, वीर्य माहिती असणे आवश्‍यक असते.

अग्र्यसंग्रहानंतर आता आपण आयुर्वेदाच्या पुढच्या विषयाकडे वळणार आहोत. आयुर्वेद हे आरोग्यरक्षणाचे शास्त्र असल्याने त्यात उपचारांच्याही आधी अन्न-धान्य व इतर आहारद्रव्यांची माहिती दिलेली आहे. स्वतःसाठी हितकर काय, अहितकर काय हे आयुर्वेदशास्त्राच्या मदतीने जाणून घेतले व त्यानुसार आहारयोजना केली तर आरोग्याचे रक्षण सोपे होते. चरकाचार्यांनी ‘अन्नपानविधि’ नावाच्या अध्यायाच्या सुरुवातीला दिलेल्या या सूत्रातून हेच समजते. 

इष्टवर्णगन्धरसस्पर्शं विधिविहितं अन्नपानं प्राणिनां प्राणिसंज्ञकानां प्राणमाचक्षते कुशलाः प्रत्यक्षफलदर्शनात्‌, तद्‌ इन्धना ह्यन्तरग्नेः स्थितिः, तत्‌ सत्त्वमूर्जयति, तद्‌ शरीरधातुव्यूहबलवर्णेन्द्रियप्रसादकरं यथोक्‍तम्‌ उपसेव्यमानं, विपरीतमहिताय संपद्यते ।

ज्या आहाराचा वर्ण, गंध, चव तसेच स्पर्श मनाला अनुकूल असतो, जे अन्न विधिपूर्वक (योग्य संस्कारातून) तयार केलेले असते, ते अन्नपान जीवधारी प्राणिमात्रांचा ‘प्राण’ असते असे विद्वान म्हणतात. प्रत्यक्षातही अन्नपानाचे प्रत्यक्ष फळ प्राणधारण असते, असे अनुभवाला येते. अन्नरूपी इंधनावरच शरीरातील अग्नीची स्थिती अवलंबून असते. असे अन्नपान चैतन्य देते, शरीरातील सर्व धातू (अवयव), बल, वर्ण तसेच इंद्रियांना प्रसन्नता देते. या उलट (म्हणजे जे अन्न वर्ण, गंध व स्पर्शाला नकोसे असते, ज्यावर योग्य संस्कार झालेले नसतात) असे अन्नपान अहितकर असते. 

म्हणून प्रत्येकाला अन्नपानविधी अर्थात निरनिराळ्या आहारद्रव्यांचे गुण, दोष, चव, प्रभाव, वीर्य वगैरे माहिती असणे आवश्‍यक असते. आपण आयुर्वेदातील या विषयाचा अभ्यास करणार आहोत. 
आहारातील हितकर, अहितकर भाव समजण्यासाठी सुरुवातीला चरकाचार्य काही नियम सांगतात, ते असे, 
     तत्‌ स्वभावात्‌ उदकं क्‍लेदयन्ति - पाणी हे स्वभावतःच अन्नाला उचित ओलावा देते. 
     लवणं विष्यन्दयति - लवण रस स्वभावतः कोणताही संघात पातळ करतो. म्हणजे कफदोषामुळे जेथे कुठे घट्टपणा येऊ शकतो, प्रवाहीपणाला अडथळा तयार होऊ शकतो, तेथे लवण रस मदतीला येतो. लवणाच्या मदतीने पचनसंस्थेतील अवरोध दूर करता येतो. 
     क्षारः पाचयति - क्षार म्हणजे वनस्पतीवर विशेष प्रक्रिया करून त्यातील वेगळे केलेले लवण. उदा. अपामार्ग क्षार, चिंच क्षार, आघाडा क्षार. असे क्षार तयार त्यावर अग्नीचा मोठ्या प्रमाणावर संस्कार झालेला असतो, त्यामुळे तो स्वभावतःच पचनाला मदत करणारा असतो. 
     संदधति - मध हे संधानाला, एकमेकांपासून सुट्ट्या होऊ पाहणाऱ्या धातूंना पुन्हा एकत्र आणण्याचे, जोडण्याचे काम स्वभावतःच करत असतो. 
    शरीरातील शिथिलता दूर करून धातूंना दृढ, घट्ट बनविण्याचे काम मधामुळे होते. 
     सर्पिः स्नेहयति - तूप अन्नाला, पर्यायाने शरीराला स्निग्धता देण्याचे काम स्वभावतः करत असते. 
ज्याप्रमाणे यज्ञात नुसत्या समीधा टाकून चालत नाहीत, तुपाच्या बरोबरीने टाकलेल्या समीधा सावकाश जळतात व त्यातूनच अपेक्षित शक्‍ती तयार होते, त्याप्रमाणे अन्नाचे यथाव्यवस्थित पचन व्हावे, अन्नातून अधिकतम शक्‍ती मिळावी यासाठी अन्नाबरोबर तूप सेवन करणे आवश्‍यक असते. दुचाकी, चारचाकी असली तरी त्यात नुसते पेट्रोल, डिझेल टाकणे पुरेसे नसते, तर चांगल्या प्रतीचे तेलही टाकावे लागते. जेथे जेथे घर्षण असेल तेथे तेथे वंगण लागते, त्याप्रमाणे शरीरात तुपाची आवश्‍यकता असते. 
     क्षीरं जीवयति - दूध हे स्वभावतःच जीवन देणारे, शरीरातील प्रत्येक अवयवाला, प्रत्येक पेशीला ऊर्जा देणारे असते. 
     सं बृंहयति - मांस (मांसाहार) शरीर धातूंची स्वभावतः वृद्धी, पुष्टी करणारे असते. 
     रसः प्रीणयति - मांसरस स्वभावतः शरीरधातूंना तृप्त करण्यास सक्षम असतो. 
    सुरा जर्जरीकरोति - मदिरा (दारू) शरीरधातूंमध्ये शैथिल्य (सैलसरपणा) निर्माण करणारी असते. 
     सीधु अवधमति - सीधु (विशेष प्रकारची मदिरा) धातूंचे लेखन (धातू खरडून काढण्याची क्रिया) करणारी असते. 
अशा अजूनही काही द्रव्यांचे स्वाभाविक कार्य यापुढे दिलेले आहे, याची माहिती आपण पुढच्या अंकात घेऊ.