फॅशन थंड ऋतूची

फॅशन थंड ऋतूची

हिवाळ्याचे स्वागत दीपावलीच्या शुभ उत्सवाने होत असते. दीपावलीच्या निमित्ताने लावलेल्या आरोग्यसवयी नंतरही चालू ठेवल्या तर संपूर्ण हिवाळा, इतकेच नाही तर पुढचे संपूर्ण वर्षसुद्धा आरोग्याने परिपूर्ण होऊ शकते. वातावरण जसजसे थंड होते, तसतसा हवेतील कोरडेपणा वाढणे स्वाभाविक असते. थंडीपासून संरक्षण मिळावे, तसेच कोरडेपणा कमी व्हावा यासाठी आहार-आचरणात काळजी घेतली, छोटे व सोपे उपाय योजले तर हिवाळा सुखावह तर होईलच, बरोबरीने आरोग्य सुधारण्यासही फायदा होईल. 

हवेतील कोरडेपणाचा प्रथमदर्शनी परिणाम दिसून येतो तो त्वचेवर. हिवाळ्यातही निरोगी, सुंदर त्वचा हवी असेल तर थंडीमुळे शरीरात वाढणारा कोरडेपणा कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे अभ्यंग. रोज रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिटे वेळ काढून संपूर्ण अंगाला अभ्यंग तेलासारखे त्वचेला स्निग्धता देणारे, शिवाय त्वचेमार्फत आत जिरून रस, रक्‍त, मांस या धातूंपर्यंत काम करणारे तेल लावले तर त्वचेला आतून-बाहेरून आवश्‍यक ते सर्व पोषण मिळते, नियमित अभ्यंगाइतकाच दुसरा प्रभावी उपाय म्हणजे उटण्याचा वापर. उटण्यामध्ये अनंतमूळ, ज्येष्ठमध, वाळा, हळद, दारूहळद अशा अनेक उत्तमोत्तम वनस्पतींचे मिश्रण असते, ज्या त्वचेला स्वच्छ तर करतातच, पण त्वचेवरील दोष दूर करण्यासही समर्थ असतात. उटण्याचा अजून एक फायदा म्हणजे यामुळे त्वचेला उचित स्निग्धता मिळते, वातावरणातील कोरडेपणामुळे त्वचा कोरडी होण्यास प्रतिबंध होतो. सॅन मसाज पावडरसारखे उटणे या दृष्टीने उत्तम होय. हिवाळ्यात उटणे लावताना किंवा मुखलेप लावताना त्यात पाण्याऐवजी दूध-दुधाची साय टाकण्याचा अधिक उपयोग होऊ शकतो. अभ्यंग, उटणे, या प्रकारचे विशेष लेप यांची व्यवस्थित योजना केली तर हिवाळ्याचा दुष्परिणाम त्वचेला भोगावा लागणार नाही हे निश्‍चित. चेहऱ्यावरची त्वचा सर्वांत नाजूक समजली जाते. चेहऱ्याच्या त्वचेच्या सौंदर्य व आरोग्यासाठी आयुर्वेदातही विशेष उपाय सुचवलेले आहेत. हिवाळ्याच्या हेमंत तसेच शिशिर ऋतूमध्ये पुढील मुखलेप सांगितले आहेत.

कोलमज्जा वृषान्मूलं शाबरं गौरसर्षपाः ।
बोराच्या आतील बी, अडुळशाचे मूळ, लोध्र व पांढरी मोहरी यांच्यापासून तयार केलेला मुखलेप हेमंतात लावावा.

सिंहीमूलं तिला कृष्णाह दार्वीत्वङ्‌िन््स्तुषा यवाः ।

डोरलीचे मूळ, काळे तीळ, दारूहळद, दालचिनी व टरफल काढलेले जव यांचा लेप शिशिर ऋतूत लावावा. 

या सर्व वनस्पती त्वचेला पोषक तर असतातच, बरोबरीने कोरडेपणा कमी करणाऱ्या, त्वचा उजळण्यास मदत करणाऱ्या असतात. त्यामुळे चेहऱ्याला, शक्‍य झाल्यास गळा, हाता-पायांची जी त्वचा बाह्य वातावरणाच्या संपर्कात येणारी असते. त्या ठिकाणी हा लेप लावून ठेवणे उत्तम.

हिवाळ्यामध्ये तळपाय विशेषतः टाचांना भेगा पडणे, शरीरात अतिरुक्षता वाढल्याने भेगांमधून रक्‍त येणे या सुद्धा तक्रार आढळतात. यावर नियमित पादाभ्यंग उत्तम असतो. त्यातही घृतासारखे शतधौत घृत वापरण्याचा अजून चांगला गुण येताना दिसतो. तळपायांना कोकमाचे तेल लावणे, फरशीच्या थंडपणापासून संरक्षण करण्याच्या हेतूने पायांत मोजे घालणे किंवा घरातही पादत्राणे घालणे हे सुद्धा उपयोगी ठरते. 

हिवाळ्याचा परिणाम ओठांवरही होतो. ओठ फुटणे, दोन ओठ कडेला मिळतात त्या ठिकाणी बारीकशी चीर जाणे असे त्रास हिवाळ्यात होताना दिसतात. ओठ फुटू नये यासाठी ओठांवर दुधावरची साय लावणे उत्तम असते. ओठांच्या कडेला चीर पडणे हा प्रकार खूप वेदनामय असू शकतो. यावर घरचे ताजे लोणी किंवा घरचे साजूक तूप लावून ठेवण्याचा फायदा होतो. रात्री झोपण्यापूर्वी नाभीवर दोन-तीन थेंब तूप लावण्यानेही ओठांना चीर जाण्याची प्रवृत्ती कमी होते असा अनुभव आहे.

एकंदर त्वचा कोरडी झाली तर त्याचा परिणाम गुदाच्या आसपासच्या त्वचेवरही होतो. विशेषतः फिशर म्हणजे गुदाला भेगा पडून शौचाच्या वेळेला आग होणे, वेदना होणे, या प्रकारचा त्रास होऊ शकतो. यावर गुदभागी व्रणरोपण तेल किंवा सॅन हील मलम सारखे औषधी तुपापासून बनविलेले मलम लावण्याचा उपयोग होतो. हिवाळ्याची सुरवात झाल्यावर लगेचच रोज रात्री झोपण्यापूर्वी गुदभागी दोन थेंब एरंडेल तेल लावण्यानेही या प्रकारचा त्रास होण्यास प्रतिबंध होतो.

हिवाळ्यात त्वचेला आलेला कोरडेपणा पटकन दूर करण्यासाठी बऱ्याचदा केवळ बाह्योपचार केले जातात, यात सहसा क्रीम, मलम वगैरेंचा समावेश असतो. काही मर्यादेमध्ये याने बरे वाटत असले तरी ही क्रीम्स चांगल्या प्रतीची व नैसर्गिक घटकद्रव्यांपासून बनविलेली आहेत का याची खात्री करून घ्यायला हवी कारण बऱ्याचदा यात वापरलेल्या रासायनिक द्रव्यांचा नंतर त्वचेवर दुष्परिणाम होताना दिसतो. 

हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण मिळण्यासाठी उबदार कपडे, स्वेटर्स, पायमोजे, शाल, कानटोपी, स्कार्फ, रजई यासारख्या वस्तू वापरता येतात, परंतु शरीर उबदार राहण्यासाठी आपल्या हातात असणारा, सोपा पण प्रभावी उपाय म्हणजे व्यायाम. खरंतर व्यायाम आपल्या दिनक्रमातील अविभाज्य भाग असायला हवा, मात्र हिवाळ्यात तरी व्यायाम करायलाच पाहिजे. हिवाळ्यात व्यायाम करण्याने शरीराबरोबरच मन प्रफुल्ल होते, शरीरातील अग्नी प्रदीप्त होऊन आतून ऊब मिळू शकते आणि एकंदर शरीरसामर्थ्य वाढविण्यास मदत होते. वय, प्रकृती आणि व्यायामाचा उद्देश ध्यानात घेऊन व्यायामाचा प्रकार निवडणे चांगले. उदा. प्राणायाम, योगासने, चालणे, पोहणे यासारखे व्यायामप्रकार बहुधा कोठल्याही प्रकृतीला मानवणारे असतात. धावणे, पोहणे, सायकल चालवणे, ॲरोबिक्‍स यासारख्या व्यायामाने रक्‍ताभिसरण प्रक्रिया सुधारण्यास मदत मिळते, स्नायू लवचिक राहतात, हृदय व फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते, शरीर ऊबदार राहण्यास मदत मिळते. योगासने, चालणे या प्रकारच्या व्यायामाने शरीर लवचिक राहते; शरीरासह मनाचाही ताण नाहीसा होण्यास मदत मिळते; रक्‍ताभिसरण संस्थेसह, मज्जासंस्थेचे कार्य सुधारते आणि प्राणायाम, भस्रिकासारख्या श्वसनक्रियांमुळे शरीरात प्राणशक्‍तीचा संचार अधिक चांगल्या प्रकारे होण्यास मदत मिळते; शरीर, मन, इंद्रिये सर्वच गोष्टी प्रफुल्लित होण्यास मदत मिळते. प्राणायामामुळे वाताला प्रेरणा मिळाली की अग्नी सुधारण्यास, पर्यायाने शरीराला आवश्‍यक ऊब मिळण्यासही मदत मिळते. 

व्यायाम करताना एक गोष्ट महत्त्वाची गोष्ट आयुर्वेदशास्त्र सांगते ती म्हणजे व्यायाम करून शरीर पिळदार बनविण्याची इच्छा असणाऱ्यांनी बरोबरीने आहारात स्निग्ध आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश असू द्यावा. 

अर्धशक्‍त्या निषेव्यस्तु बलिभिः स्निग्धभोजिभिः ।
....अष्टांगहृदय सूत्रस्थान


या ठिकाणी स्निग्ध पदार्थांचा अर्थ तेलकट तळकट असा नसून दूध, तूप, लोणी, बदाम, खजूर, खारीक इ. शरीरोपयोगी पदार्थ असा आहे. गूळ-तूप, सुंठ-खारीक टाकून उकळलेले दूध वगैरेंचा आहारात समावेश केला तर शरीराला स्निग्धता मिळते, तसेच आवश्‍यक असणारी ऊबही मिळते. या सर्व गोष्टी पचण्याची क्षमता हिवाळ्यात असल्याने या ऋतूत व्यायाम करणे उत्तम असते. 

थंडीचा कडाका वाढला, की सूर्याची कोवळी किरणे अंगावर घेण्यासारखे दुसरे सुख नसावे. सूर्यकिरणांच्या माध्यमातून सूर्य ऊब तर देतोच, पण आरोग्य राखण्यासही मोठा हातभार लावत असतो. सूर्यकिरणांचा संपूर्ण फायदा होण्यासाठी ती कोवळी असावी लागतात. सूर्यकिरणांतून ‘ड’जीवनसत्त्वाची पूर्ती होते, असे आधुनिक शास्त्रातही सांगितलेले आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये हाडे ठिसूळ झाल्याने हात-पाय वाकू लागले (मुडदूस) तर सध्याच्या काळातही ‘सौरचिकित्सा’ म्हणजे सूर्यप्रकाशात बसवले जाते. शरीराचा फिकटपणा, निस्तेजता कमी होण्यासाठीही सूर्याची ऊब महत्त्वाची असते. त्वचा तेजस्वी व्हावी, त्वचेवर नैसर्गिक चमक यावी यासाठी आजही थंड प्रदेशातील म्हणजे नैसर्गिक सूर्यप्रकाश कमी असणाऱ्या ठिकाणचे स्त्री-पुरुष प्रत्यक्ष सूर्यप्रकाशाचा किंवा सूर्यकिरणांप्रमाणे असणाऱ्या विशिष्ट किरणांचा उपयोग करतात. आयुर्वेदानेही वजन कमी करणाऱ्या, शरीराला हलकेपणा आणणाऱ्या उपचारांमध्ये ‘आतपसेवन’ म्हणजे सूर्यप्रकाशात बसण्याचा समावेश केला आहे. 

लंघनप्रकारः आतपसेवनम्‌ ।
मध्यबलस्थूलमनुष्येषु स्थौल्यापनयनाय ।
...चरक सूत्रस्थान


चांगली किंवा मध्यम ताकद असणाऱ्या स्थूल मनुष्याची स्थूलता दूर करण्यासाठी आतपसेवन उपयुक्‍त असते. 

हिवाळ्यात मधुर अर्थातच गोड चवीचे तसेच स्निग्ध गुणाचे अन्न सेवन करण्यावर भर द्यायचा असतो. हिवाळ्यातील थंडीमुळे प्रदीप्त झालेल्या अग्नीला पुरेसे इंधन मिळणे आवश्‍यक असते, त्या दृष्टीनेही आहारात मधुर, स्निग्ध, पौष्टिक पदार्थांचा समावेश असावा लागतो यादृष्टीने हिवाळ्यात दूध, लोणी, साजूक तूप, खोबऱ्याची वडी, डिंकाचा लाडू, दुधी हलवा वगैरे पदार्थ आहारात असणे चांगले. यातून रसादी धातूंचे पोषण व्यवस्थित होते. पर्यायाने त्वचा वगैरे अवयवांचे आरोग्य उत्तम राहते. 

तेव्हा हिवाळ्यातील थंड हवामानाचा आरोग्य सुधारण्यासाठी फायदा करून घेतला, थंडीपासून नीट संरक्षण केले तर हिवाळ्याचा आनंद घेता येतो, शिवाय संपूर्ण वर्षभर पुरेल अशी आरोग्य शिदोरी बांधून ठेवता येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com