भग्न (फ्रॅक्‍चर) पथ्यापथ्य

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 17 November 2017

मोडलेले हाड जोडण्यासाठी आयुर्वेदाने बंधन उपचार सुचवले आहेतच. आधुनिक वैद्यकानुसार उपचार करणे अधिक सोयीचे झाले आहे. मात्र हाडे सांधण्यासाठी आयुर्वेदाने सुचविलेली आहार योजना नक्कीच सहायक ठरेल.

अपघातामुळे, खेळताना पडल्यामुळे हाड मोडते, त्याला ‘भग्नरोग’ असे नाव दिलेले आहे. सध्या ज्या प्रकारे मोडलेले हाड नीट जागेवर बसवून प्लॅस्टर केले जाते, तशाच प्रकारे पूर्वीच्या काळीसुद्धा विशिष्ट गवत, झाडांच्या साली आदींच्या मदतीने भग्नावर बंधन उपचार केला जात असे. सरकलेले हाड पुन्हा स्वस्थानी कसे बसवावे, वेदना कमी करण्यासाठी काय उपचार घ्यावेत, मोडलेले हाड सुखरूप सांधले जावे यासाठी काय औषधे घ्यावीत, आहार कसा असावा वगैरे अनेक मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन आयुर्वेदाच्या ग्रंथांत दिलेले आढळते. ऋतुमानानुसार बंधन कधी उघडावे याचेही निकष आयुर्वेदात दिलेले आढळतात. आज आधुनिक वैद्यकानुसार प्लॅस्टर करणे, उघडणे ही कामे अधिक सोयीची व सहजतेने करता येत असली, तरी बरोबरीने हाडांना सांधण्यासाठी सहायक आहाराची योजना नक्कीच करता येईल.

हाडांच्या बळकटीसाठी दूध उत्तम असते. हाड जुळून येण्यासाठी पहिल्यांदा व्यायलेल्या गाईचे दूध अधिक प्रशस्त असते असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. 

गृष्टिक्षीरं ससर्पिष्कं मधुरौषधसाधितम्‌ ।
शीतलं लाक्षया युक्‍तं प्रातर्भग्नः पिबेन्नरः ।।
....भैषज्य रत्नाकर

पहिल्यांदा वासरू झालेल्या गाईच्या दुधावर मधुर रसाच्या वनस्पतींचा संस्कार करून त्यात साजूक तूप आणि लाखेचे चूर्ण मिसळून रोज सकाळी घेण्याने भग्न जुळून येण्यास चांगली मदत मिळते. 

गहूसुद्धा हाडांना सशक्‍त करण्यासाठी उत्तम समजले जातात. 

सघृतेन अस्थिसंहारं लाक्षागोधूमअर्जुनम्‌ ।
सन्धिमुक्‍ते अस्थिभग्ने च पिबेत्‌ क्षीरेण मानवः ।।

गाईच्या दुधात तूप, गव्हाचे सत्त्व, अर्जुन साल, लाखेचे चूर्ण आणि हाडसांधी नावाच्या वनस्पतीचे चूर्ण मिसळून घेण्याने हाड सांधण्यास, तसेच निखळण्याची प्रवृत्ती असणारा सांधा पुन्हा पूर्ववत होण्यास मदत मिळते. 
लसूणसुद्धा हाडे सांधण्यासाठी औषधाप्रमाणे हितकर असतो. 
रसोनमधुलाक्षा आज्यसिताकल्कं समश्ननाम्‌ ।
छिन्नभिन्नच्युतास्थीनां सन्धानम्‌ अचिरात्‌ भवेत्‌ ।।
...भैषज्य रत्नाकर

लसूण वाटून तयार केलेला कल्क (चटणीसारखा गोळा), मध, लाखेचे चूर्ण, तूप, खडीसाखर या सर्व गोष्टी एकत्र करून दुधाबरोबर रोज घेतल्यास अस्थी सांधून येण्यास, सांधे मजबूत होण्यास मदत मिळते. 

हाड चांगल्या प्रकारे आणि लवकर सांधून येण्यासाठी अजून दोन योग सांगितले आहेत, 

क्षीरं सलाक्षामधुकं ससर्पिः स्यात्‌ जीवनीयञ्च सुखावहञ्च ।
भग्नः पिबेत्‌ त्वक्‌ पयसाऽर्जुनस्य गोधूमचूर्णं सघृतेन वाऽथ ।।

- कपभर दुधात दोन चमचे साजूक तूप आणि एक-दोन चमचे गव्हाचे सत्त्व मिसळून घेण्याने हाड सांधण्यास मदत मिळते.

काही वेळा फ्रॅक्‍चर अशा ठिकाणी होतो, जेथे प्लॅस्टर करता येत नाही किंवा छोटीसी क्रॅक वगैरे असली तर प्लॅस्टर केले जात नाही. अशा वेळी त्या ठिकाणी लेप लावता येतात. 
- शतधौतघृतोन्मिश्रं शालिपिष्टञ्च लेपनम्‌ ।
साठेसाळीचे तांदूळ शतधौतघृताबरोबर वाटून तयार केलेला लेप केल्यास हाड जुळून येण्यास मदत मिळते. 
- घाण्यातून काढलेले ताजे ताजे तिळाचे तेल थोडे गरम करून लावण्याने भग्न झालेल्या ठिकाणी होणाऱ्या वेदना कमी होतात. 

भग्न रोगात पथ्य : 
तांदूळ, गहू, मटार, लोणी, तूप, तेल, मांसरस, मध, 
पडवळ, लसूण, शेवगा, मुळा, द्राक्षे, आवळा, लसूण, 
डिंक वगैरे

भग्न रोगात अपथ्य : 
तिखट पदार्थ, आंबट पदार्थ, रुक्ष व कोरडे अन्न वगैरे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article on Fracture