#FamilyDoctor मूतखड्याचा त्रास

#FamilyDoctor मूतखड्याचा त्रास

मूतखडा हा सर्वसाधारणपणे तीव्र वेदना देणारा आजार आहे. काही वेळा वेदना होत नाहीत, पण मूतखड्यामुळे होणाऱ्या अन्य त्रासाला सामोरे जावे लागते. मूतखड्याचा असह्य त्रास थांबण्यासाठी काही वेळा शस्त्रक्रिया करावी लागते. मात्र, पुन्हा-पुन्हा मूतखडा होऊ नये, यासाठी औषधे अधिक गुणकारी असतात. आपल्या आसपास पाहिले तरी साधारण पाच टक्के लोकांना मूतखड्याचा त्रास कधी ना कधी झाल्याचे लक्षात येईल. यापैकी पन्नास टक्के लोकांना एखाद्या-दुसऱ्या वेळी त्रास झालेला असतो. पण पन्नास टक्के रुग्णांमध्ये हे खडे पुन्हा पुन्हा निर्माण होतात. आपल्या मनात अनेक शंका असतील. उदा. मूतखडा म्हणजे काय? कसा असतो मूतखडा? कशामुळे तयार होतो? मूत्रमार्गात कुठे असतो? त्याचे प्रकार असतात का? तो औषधाने विरघळतो की शस्त्रक्रिया करावीच लागते? खडा होऊच नये यासाठी काय खावे अन्‌ काय खाऊ नये?  

मूत्रपिंडात किंवा लघवीच्या मार्गात तयार होणाऱ्या कठीण स्फटिकजन्य पदार्थाला मूतखडा म्हणतात. लघवीतील न विरघळलेले स्फटिकजन्य पदार्थ ज्या वेळी एका ठिकाणी जमा होतात त्या वेळी मूतखडा तयार होतो. मूतख़ड्याला वैद्यकीय भाषेत ‘नेफ्रोलिथायसिस‘ (Nephrolithiasis) असे म्हणतात. सामान्यपणे व्यवहारात ‘किडनी स्टोन‘ (Kidney Stones) म्हटले जाते. आयुर्वेदात ‘मूत्राश्‍मरी‘ म्हणतात. (अश्‍मरी म्हणजे खडा.) 

संपूर्ण मूत्रसंस्था ही आपल्या शरीरातील एक विसर्जन संस्था (ड्रेनेज सिस्टिम) आहे. लघवी म्हणजे पाणी, अनेक प्रकारचे क्षार आणि चयापचय प्रक्रियेतील (मेटाबोलिक) घटक असतात. शरीरात अधिकचे झालेले क्षार, चयापचय प्रक्रियेतील (मेटाबोलिक) घटक व पाणी मूत्रपिंडामध्ये वेगळे केले जातात. हे अधिकचे क्षार लघवीत विरघळून बाहेर पडत असतात. पण जेव्हा या क्षारांचे लघवीतील प्रमाण वाढते तेव्हा ते विरघळलेल्या स्थितीत न राहता त्यांचे स्फटिक तयार होतात. काही वेळा रुग्णाच्या शरीरात क्षारांचे तयार होण्याचे प्रमाण सर्वसामान्य असते, पण लघवीत क्षार विरघळण्याची क्षमता घटलेली असते अशावेळीही न विरघळलेल्या क्षारांचे स्फटिक तयार होऊ शकतात. लघवीत हे क्षार काही कारणांनी मूत्रमार्गात एखाद्या ठिकाणी गोळा होतात. या राळेतून काही काळाने या क्षारांचा स्फटिक तयार होतो. तिळावर साखरेच्या पाकाची पुटे चढून जसा हलवा तयार होतो, तसा लघवीतील क्षारांची व अन्य घटकांची या स्फटिकावर रोज पुटे चढून खडा मोठा होत जातो. एक गोष्ट लक्षात येईल की, मूतखडा मूत्रसंस्थेत तयार होत असला तरी त्याचे मूळ हे यकृत व चयापचय संस्थेत असते. मूतखडा तयार होण्याची ही एक सर्वसाधारण संकल्पना आहे. पण याबाबतीत आणखीही काही संकल्पना आहेत. रॅंडॉल यांनी १९३२मध्ये पहिल्यांदा, मूतखडा तयार होण्याची प्रक्रिया सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अनेकांनी या प्रक्रियेविषयी सिद्धांत मांडले. आधुनिक वैद्यकशास्त्रात न्यूक्‍लिअँशन थेअरी, सुपर सॅच्युरेशन थेअरी, आणि इंट्रानेफ्रॉनील कॅल्क्‍युलोसीस थेअरी मांडल्या गेल्या आहेत. सुश्रुतसंहितेतही ‘तत्र असंशोधनशीलस्य अपथ्यकारिणः‘ म्हणजे नियमित शरीरशुद्धी न करणाऱ्याने अपथ्यकर आहार-विहार चालू ठेवला तर त्याला मूतखडा होऊ शकतो, असेच सांगितले आहे.    

आपण गर्भावस्थेत असल्यापासून पूर्ण आयुष्यभर आपल्या शरीरात सातत्याने क्षारांचे आवागमन चालू असते. हे सर्व क्षार, चयापचयीन घटक शेवटी मूत्रात विरघळून बाहेर टाकले जातात. पण जेव्हा हे क्षार किंव घटक मूत्रात पूर्णपणे विरघळून बाहेर जात नाहीत, तेव्हा त्याचे स्फटिक तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते, हे आपण आधी समजून घेतले आहेच. ही प्रक्रिया एक-दोन दिवसांत घडत नाही. ती बराच काळ सुरू असते. त्याचा त्रास अचानक सुरू होतो इतकेच. या क्षारांचे लघवीमधील प्रमाण वाढलेले दिसण्याची दोन कारणे असतात. एक मुळातच हे क्षार किंवा घटक शरीरात वाढून ते जास्त प्रमाणात लघवीत उतरतात अथवा त्यांचे लघवीत विरघळण्याचे प्रमाण घटलेले असते. दुसरे म्हणजे त्यांना लघवीतून बाहेर पडण्यास विलंब होतो अथवा लघवीच्या मार्गात काही अडथळा आलेला असतो. मूत्रपिंडाचा नरसाळ्यासारखा भाग, मूत्रवाहिन्या व मूत्राशय यांत कोठेही हे खडे तयार होतात. खडे एकतर आहे तेथेच राहतात किंवा लघवीच्या प्रवाहाबरोबर खाली सरकतात. 

मूतखडा तयार कसा होतो? कोणाला होतो?
लघवी तयार होण्याचे प्रमाण कमी झाल्याने किंवा मूतखडा तयार करू शकणाऱ्या घटकांचे लघवीतील प्रमाण वाढल्याने मूतखडा तयार होतो. पाणी अथवा पातळ पदार्थ कमी घेण्याने किंवा श्रम, व्यायाम, जुलाब या कारणांनी पाण्याचे शरीरातील प्रमाण कमी झाले, तर क्षार, प्रथिने लघवीत विरघळत नाहीत. एक गैरसमज असा आहे की, कष्टाची कामे केल्यामुळे किंवा व्यायामामुळे मूतखडा होतो. पण असे घडत नाही. कष्टामुळे किंवा व्यायामामुळे शरीरातील पाणी घामावाटे बाहेर पडते. पण त्या वेळी पाणी पिण्याकडे दुर्लक्ष होते. श्रम किंवा व्यायाम करताना अधूनमधून थोडे थोडे पाणी पीत शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखले पाहिजे. पण तसे न केल्याने शरीरातील पाण्याचे, पर्यायाने लघवीचे प्रमाण घटते, साहजिकच लघवीत क्षार अथवा अन्य घटक विरघळण्याचेही प्रमाण घटते. ही स्थिती अधिक काळ राहिल्यास मूतखडा तयार होण्याचे प्रमाण वाढते. अशा खड्यात प्रामुख्याने प्रथिने व जीवाणू सापडतात. मूत्रमार्गात होण्याऱ्या जंतुसंसर्गामुळे तेथे ‘राळ‘ तयार होतो व त्याची प्रथिने जमा झाल्याने त्याचे मूतखड्यात रूपांतर होण्याची शक्‍यता वाढते. हा खडा जेलीसारखा असतो.

मूतखड्याचा त्रास होणाऱ्यात पुरुषांचे प्रमाण अधिक असते. आधीच्या काळात हे प्रमाण ऐंशी टक्के होते. पण बदलत्या जीवनशैलीचा परिणाम म्हणून स्त्रियांमध्येही मूतखडा होण्याचे प्रमाण वाढत चाललेले दिसते. विशेषतः  ते वर्षांच्या व्यक्तींमध्ये हा त्रास अधिक आढळून येतो. कुटुंबातील लोकांना मूतखडा होण्याचा इतिहास असणारे रुग्ण आढळण्याचे प्रमाण अधिक असते. अशा रुग्णांच्या आहार पद्धतीत, जीवनशैलीत या त्रासाची कारणे दडलेली आढळतात. वारंवार मूत्रमार्गात जंतुसंसर्ग होणारे रुग्णही मूतखड्याच्या त्रासाला बळी पडलेले दिसतात. ज्या व्यक्तींमध्ये रक्तातील युरिक ॲसिडचे प्रमाण अधिक असते, त्यांना युरिक ॲसिडपासून मूतखडे तयार होण्याची शक्‍यता जास्त असते. या आधी स्त्रियांमध्ये प्रामुख्याने गर्भारपणात मूतखड्याचा त्रास होताना दिसत असे. येथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की, गर्भारपणामुळे मूतखडा होत नाही. पण गर्भारपणात प्रोजेस्टेरॉन नावाचा स्राव वाढल्याने लघवीचा वेग कमी होतो, त्याने खडे तयार होण्याची शक्‍यता असते. तसेच गर्भारपणात कॅल्शियम मूत्रात उत्सर्जित होण्यानेही मूतखडे तयार होण्याची शक्‍यता वाढते. ही त्या वेळची स्वाभाविक स्थिती असते. मात्र कॅल्शियमच्या गोळ्या घेतल्याने मूतखडा होत नाही, हे स्त्रियांनी लक्षात घ्यायला हवे. शरीरातील कॅल्शियम घटत असल्याने त्या गोळ्या घेणे आवश्‍यकच असते. अलीकडे जीवनशैलीतील बदलामुळे स्त्रियांमध्ये विविध कारणांनी मूतखडा होण्याचे प्रमाण वाढलेले आढळते. पूर्वी साधारणपणे आठ पुरूष रुग्ण व दोन स्त्री रुग्ण असे प्रमाण असायचे, तेच आता सहा पुरूष रुग्ण व चार स्त्री रुग्ण एवढे वाढलेले आहे.

कारणे काय? 
१) कमी पाणी पिणे. पाणी कमी पिण्यामुळे लघवीतील न विरघळलेल्या ऑक्‍सलेटचे प्रमाण वाढते. म्हणजेच लघवी सौम्य न होता ‘कडक’ होते. यामुळे हे ऑक्‍सलेटचे थर जमू लागतात. वारंवार होणाऱ्या अपचनामुळे किंवा सततच्या आतड्यांच्या आजारामुळे लघवीवाटे बाहेर पडणाऱ्या पाण्याचे प्रमाण घटते, स्वाभाविकच लघवीतील क्षारांचे प्रमाण वाढते. उष्ण प्रदेशात राहणाऱ्यांना किंवा सतत भट्टीजवळ काम करणाऱ्यांनाही याच कारणाने मूतखडा होण्याची शक्‍यता अधिक असते. 

२) जठर व आतड्यांमधून कॅल्शियमचे वाढत्या प्रमाणात शोषण. आपली हाडे ही मुख्यतः कॅल्शियमची बनलेली असतात. यामध्ये नवीन कॅल्शियम शरीरात घेतले जाते व जुने मूत्राद्वारे शरीराबाहेर फेकले जाते. मूत्रपिंडामध्ये जवळजवळ ९५ टक्के कॅल्शियम गाळले जाते. यातील बहुतांशी कॅल्शियम शरीरात परत शोषले जाते. केवळ दोन टक्के कॅल्शियम शरीराबाहेर टाकले जाते. हे प्रमाण वाढले तर ते लघवीत विरघळत नाही व त्याचे कण तसेच राहतात. पॅराथॉयराईड (उपकंठस्थ)ग्रंथींच्या आजारात कॅल्शियम मोठ्या प्रमाणात बाहेर टाकले जात असल्याने मूतखडा होण्याची शक्‍यता अधिक असते. 

३) ऑक्‍सलेटचे वाढत्या प्रमाणात शोषण. अळू, पालक, चुका, टोमॅटो, दूध, पत्ताकोबी, काजू, कोल्ड्रिंक्‍स, चॉकलेट यामध्ये, तसेच मटन व काही प्रकारच्या माशांमध्ये ऑक्‍सलेटचे प्रमाण खूप जास्त असते. (हे ऑक्‍सलेटचे प्रमाण कमी करण्यासाठीच मासे हेच मुख्य अन्न असलेल्या प्रदेशात सोलकढी किंवा आमसोलाचा आहारात समावेश असतो. अळूमध्येही आमसोल टाकले जाते ते यासाठीच.) आम्लपित्त (ॲसिडिटी) कमी करणारी औषधे सतत उपयोगात आणल्यामुळेही ही समस्या उद्भवू शकते. काही विहिरींच्या पाण्यातही क्षार जास्त असतात. विशेषतः कूपनलिकांचे पाणी जड असते. यांचे सेवन केल्याने आतड्यांमधून ऑक्‍सलेट जास्त प्रमाणात शोषले जाते. शरीरातून साधारण दहा ते पंधरा टक्के ऑक्‍सलेट लघवीद्वारे बाहेर टाकले जाते. त्यापेक्षा प्रमाण वाढले तर ते लघवीत विरघळण्याऐवजी स्फटिक रुपाने साचू लागते.   

४) लाल मांसामध्ये आढळणाऱ्या प्रथिन पदार्थांच्या घटकांचे सेवन. 

५) शरीरातील चयापचय क्रियेमुळे जसे ऑक्‍सलेटचे खडे तयार होतात, तसे लघवीत व रक्तात युरिक अँसिडचे प्रमाण वाढल्यानंतरही खडे तयार होतात. विशेषतः गाऊट या आजारात, तसेच काजू, बदाम, चहा, कॉफी, शेंगदाणे, मांसाहार जास्त केल्याने युरिक अँसिडचे प्रमाण वाढते. स्थूलत्व व आहारपद्धती यामुळेही ऑक्‍सलेटचे प्रमाण वाढू शकते. अशावेळी पुरेसे पाणी सेवन करूनही मूतखडे होऊ शकतात.

६) मूत्रमार्गात कोठेही संसर्ग होऊन पू अथवा सूज असल्यास हळूहळू प्रथिनांचे स्फटिक जमायची क्रिया होते. 

७) कुपोषित लहान मुलांमध्ये ’अ’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे पेशी मरण्याचे प्रमाण जास्ती असते. मूत्रमार्गात अशा मृत पेशींभोवती क्षार जमायला मदत होते. अशा मुलांना मूत्राशयात खडा होतो. तसेच जीवनसत्त्व ’ड’ हे जरूरीपेक्षा जास्त सेवन केल्यासही मूतखडा होऊ शकतो.

८) कॅल्शियमची गळती असणारे मूत्रपिंड ज्याला ‘हायपरकॅल्सियुरिया‘ (Hypercalciurea) म्हणतात. अशा रुग्णात मूतखडा होण्याची वारंवारिता जास्त असते. 

९) मूत्रपिंडात लघवी तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये काही दोष असल्यानेही मूतखडा तयार होऊ शकतो.

१०) स्त्रियांमध्ये गर्भारपणी लघवीचे प्रमाण घटल्याने व कॅल्शियमची अधिक गळती झाल्याने मूतखड्याचा त्रास होऊ शकतो. 

११) आनुवंशिकता, रासायनिक रचनेतील दोष, मूत्रसंस्थेतील दोष, प्रोस्टेट ग्रंथीची वाढ अशा काही कारणांनीही मूत्रपिंडात खडे होऊ शकतात.

१२) दीर्घकाळ कोणतीही हालचाल न करता बिछान्यावर पडलेल्या रुग्णाला मूतखडे होण्याची शक्‍यता वाढते.

१३) काही रुग्णांमध्ये कोणतेही कारण सापडत नाही.

अशी असतात लक्षणे
सामान्यत - मूतखडा तयार होत असताना लक्षणे दिसून येत नाहीत. पण जेव्हा मूत्रमार्गात त्याची हालचाल होते किंवा त्याच्यामुळे मूत्रमार्गात अचानक अडथळा निर्माण होतो त्या वेळी तीव्र वेदना सुरू होतात. या वेदना ज्या बाजूला मूतखडा असेल त्या बाजूला पाठीत, पोटात किंवा ओटीपोटात होतात. 

मूतखड्याचा क्षोभ झाल्यामुळे मूत्रपिंडातून मूत्राशयाकडे मूत्र वाहून नेणाऱ्या नलिकेचे आकुंचन होते, त्याला ‘रेनल कोलिक’ (Renal Colic) म्हणतात. ही पोटदुखी साधारणपणे बाजूच्या क्षेत्रात सुरू होऊन नंतर ती जांघ, पोट व मांडी यांच्यामधल्या खोलगट भागात पसरते. 
खडा वाहून गेल्यानंतर दुखणे कमी होते, पण लघवीवाटे रक्त पडू शकते. लघवीत रक्त गेल्याने लघवी लाल रंगाची होते.

मूतखडा मूत्राशयाच्या जवळ पोचल्यावर लघवी पुन्हा-पुन्हा आल्याची संवेदना होते किंवा लघवी होताना जळजळ झाल्याची जाणीव होते.

मूत्रसंस्थेत जंतुसंसर्ग झाल्यास ताप व थंडी वाजून येते. तसेच मूत्रोत्सर्जनात अडथळे आणि मूत्रोत्सर्जन जास्त वेळा होणे ही लक्षणे दिसून येतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com