नाते विश्वासाचे

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 29 June 2018

वैद्यांनी जसे प्रेमाने, आपल्या परीने उत्तमोत्तम उपचार करायचे; तसेच रुग्णानेही वैद्यांवर, वैद्यांनी केलेल्या उपचारांवर विश्वास ठेवायला पाहिजे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे वैद्यांनी सांगितलेल्या नियमांचे पालन करायची तयारी ठेवायला पाहिजे. 

नाते कोणतेही असो, त्यात विश्वास असला तरच ते टिकते. अगदी रक्‍ताच्या नात्यातही आपुलकी, आत्मीयता जपली जाणे महत्त्वाचे असते. मनुष्य हा समाजप्रिय असल्याने तो रक्‍ताच्या नात्याच्या पलीकडे अनेकांशी जोडलेला असतो. असेच एक विश्वासार्ह नाते म्हणजे डॉक्‍टर-रुग्ण किंवा वैद्य-रुग्णाचे नाते. अर्थात डॉक्‍टरांकडे जाण्यासाठी रोग होण्याची वाट बघायची गरज नसते. रोग होऊ नये आणि निरोगी जीवन जगता यावे, यासाठीसुद्धा डॉक्‍टर व वैद्य उत्तम मार्गदर्शन करत असतात. 

मात्र, डॉक्‍टर आणि रुग्ण हे नाते दोघांकडून जपले जाणे महत्त्वाचे असते. उपचार करणाऱ्याच्या मनात उपचार करून घेणाऱ्याबद्दल सदिच्छा, त्याला मदत करण्याची भावना असायला हवी आणि उपचार करून घेणाऱ्याला, ‘या उपचारांचा मला उपयोग होणार आहे’ हा विश्वास असायला हवा. यातून रोगाविरुद्धची लढाई या दोघांनी अर्धी जिंकली नाही तरच नवल.

उपचार कुठलाही असो, रोगनिवारणासाठी करायचा असो किंवा आरोग्यरक्षणासाठी योजायचा असो, यासाठी चार मुख्य आधारस्तंभ आवश्‍यक असतात. आयुर्वेदात याला ‘चिकित्सा चतुष्पाद’ असे म्हटलेले आहे. पहिला स्वतः वैद्य, दुसरे औषध, तिसरा परिचारक आणि चौथा रुग्ण. यामध्ये वैद्यांचा क्रमांक पहिला येतो, कारण कोणते औषध, किती प्रमाणात, कधी, किती दिवस द्यायचे हे वैद्य ठरवतात; तसेच परिचारकाने रुग्णावर काय उपचार करायचे हेही वैद्यच सांगतात. तरीही या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की जर रुग्णच नसला तर बाकीचे तिन्ही आधारस्तंभ निरुपयोगी ठरतात. म्हणूनच योग्य उपचार करण्यामध्ये वैद्यांचे जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व रुग्णाला आहे.

वैद्य, रुग्ण, औषध, परिचारक या सर्वांचा मुख्य उद्देश असतो रुग्णाला बरे करणे. वैद्यांनी अगदी शंभर टक्के परिपूर्ण उपचारांची योजना केली तरी फक्‍त त्यामुळेच संपूर्ण गुण येईल असे नाही, उलट वैद्यांनी घ्यायला सांगितलेली काळजी, पथ्य, अनुशासन यांचे योग्य प्रकारे पालन करणारा रुग्णच उपचार यशस्वी होण्यास महत्त्वाचे योगदान देत असतो. 

मुळात आयुर्वेदशास्त्र पृथ्वीतलावर आले ते प्राणिमात्रांचे कष्ट दूर करून त्यांना मदत करण्यासाठी. चरकसंहितेमधील अगदी पहिल्या अध्यायात एक श्‍लोक आहे, 

अथ मैत्रीपरः पुण्यमायुर्वेदं पुनर्वसु ।
शिष्येभ्यो दत्तवान षड्‌भ्यः सर्वभूतानुकम्पया ।।
...चरक सूत्रस्थान

सर्व प्राणिमात्रांविषयी मैत्रीची भावना असणाऱ्या आत्रेय पुनर्वसूंनी सर्व प्रणिमात्रांवर अनुकंपा करण्याच्या दृष्टीने पुण्यप्रद आयुर्वेदशास्त्राचे ज्ञान आपल्या शिष्यांना दिले.
ज्याच्याशी खरी मैत्री असते, ज्याच्याविषयी अनुकंपा वाटत असते त्याच्यासाठी वेळप्रसंगी स्वतःच्या सुख, आरामाकडे दुर्लक्ष करण्याचीही तयारी असावी लागते. वैद्यांकडे वा डॉक्‍टरांकडे ज्ञान तर असतेच पण त्याचबरोबरीने आपल्याकडे असलेल्या ज्ञानामुळे रुग्णाचे कष्ट, रुग्णाचा रोग दूर होईल ही भावना असणेही आवश्‍यक असते हे या सूत्रातून समजते. 

रुग्णातील उत्तम गुण
रुग्णामध्ये असायला हवा असा गुण म्हणजे स्वतःला होत असलेल्या त्रासाचे, रोगाच्या अवस्थेचे वैद्यांना यथायोग्य निरूपण करणे हा होय. काही रुग्ण त्यांना होत असलेल्या त्रासाचे एवढे मोठे अवडंबर माजवतात की, वैद्यांना उपचाराची योग्य दिशा मिळू शकत नाही. याउलट, काही सोशिक रुग्ण होत असलेला त्रासही वैद्यांना सांगत नाहीत. अर्थात कोणता रुग्ण कसा आहे आणि त्याने सांगितलेल्या कोणत्या गोष्टी गांभीर्याने घ्यायच्या हे अनुभवाने वैद्यांनाही समजत असले तरी, स्वतःहून योग्यरीतीने आपली स्थिती सांगणारा रुग्ण उत्तम असतो. 

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थाचे यथायोग्य पालन करणे हे मनुष्यजन्माचे ईप्सित मानले जाते व या चारही गोष्टी आरोग्याशिवाय मिळवता येत नाहीत. त्यामुळे आरोग्यदान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. दान आणि व्यापार यात जसा फरक आहे तसाच फरक इतर नात्यात आणि वैद्य-रुग्ण या नात्यात आहे. व्यापारामध्ये देवघेव असते, सरळठोक व्यवहार असतो. रुग्ण व वैद्य यांच्यामध्ये मात्र फक्‍त ग्राहक व व्यापारी असे नाते असत नाही. वैद्यांनी जसे प्रेमाने, आपल्या परीने उत्तमोत्तम उपचार करायचे, तसेच रुग्णानेही वैद्यांवर, वैद्यांनी केलेल्या उपचारांवर विश्वास ठेवायला पाहिजे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे वैद्यांनी सांगितलेल्या नियमांचे पालन करायची तयारी ठेवायला पाहिजे. 
रुग्ण कसा असावा याचेही विवेचन आयुर्वेदाने केलेले आहे, 
स्मृतिनिर्देशकारित्वमभीरुत्वमथापि च ।
ज्ञापकत्वं च रोगाणामातुरस्य गुणाः स्मृताः ।।
...चरक 

रुग्णाची स्मरणशक्‍ती चांगली असावी. कारण कशामुळे त्रास झाला, काय केल्यावर बरे वाटले हे रुग्णाच्या लक्षात राहिले तर तो वैद्यांना तसे सांगू शकतो, तसेच त्यानुसार स्वतःच्या आहार-आचरणात बदल करू शकतो. 

रुग्णामध्ये असावा असा दुसरा गुण म्हणजे वैद्यांच्या आज्ञेचे पालन करण्याची प्रवृत्ती असणे. वैद्यांनी सांगितलेली खाण्या-पिण्याची पथ्ये, आचरणात करावयाचे बदल किंवा अंगाला तेल लावणे, वेळेवर नियमितपणे औषधे घेणे यांसारख्या गोष्टी रुग्णाने मनापासून पाळणेही अत्यावश्‍यक असते. 

तिसरी आवश्‍यक गोष्ट म्हणजे रुग्णाने निर्भय असावे. ‘विषादे रोगवर्धनम्‌’ म्हणजे विषाद, चिंता, दुःखी अवस्था रोग वाढविण्यास कारणीभूत ठरते. म्हणूनच रुग्णाने मनाचा धीर कायम ठेवावा, मनाची उमेद जोपर्यंत कायम आहे तोपर्यंत रोग बरा होण्याची शक्‍यता सर्वाधिक असते. 

वैद्याने उपचार करण्यात कधीही मागे राहू नये असे आयुर्वेद शास्त्र सांगते. 

क्वचित्‌ धर्म क्वचित्‌ मैत्री क्वचित्‌ अर्थ क्वचित्‌ यशः ।
कर्माभ्यासं क्वचित्‌ चेति चिकित्सा नास्ति निष्फला ।।

उपचार करण्याने कधी कर्तव्य पूर्ण केल्याचे समाधान मिळते, कधी मैत्री होते, कधी पैसा मिळतो, कधी यश मिळते, कधी यातील काही जमले नाही तरी अनुभव गाठीशी येतो. थोडक्‍यात सांगायचे म्हणजे उपचार कधीच निष्फळ जात नाहीत. मात्र याची दुसरी बाजूसुद्धा आयुर्वेद परखडपणे मांडतो. 
आर्तं च नृपसद्वैद्यैर्द्विष्टं तद्वेषिणं द्विषम्‌ ।
चण्डं शोकातुरं भीरुं कृतघ्नं वैद्यमानिनम्‌ ।।
हीनोपकरणं व्यग्रमविधेयं गतायुषम्‌ ।।...अष्टांगसंग्रह सूत्रस्थान

- जो रुग्ण सज्जन व्यक्‍ती, वैद्य, राजा यांच्याविषयी द्वेष बाळगतो त्यावर वैद्यांनी उपचार करू नयेत. तसेच सज्जन व प्रतिष्ठित व्यक्‍तींचे मत ज्यांच्याबद्दल वाईट असते त्यांच्यावरही उपचार करू नयेत.
- अतिशय अहंकारी, उद्धट स्वभावाच्या रुग्णांवरही वैद्यांनी उपचार करू नयेत.
- मनाने अतिशय भित्र्या असणाऱ्या व्यक्‍तीवर, कृतघ्न व्यक्‍तीवर व वैद्य नसूनही स्वतःला वैद्य समजणाऱ्या व्यक्‍तीवर उपचार करू नयेत.
- ज्याच्याजवळ उपचार करून घेण्यासाठी वेळ नाही, योग्य साधने आणण्याची तयारी नाही, तसेच ज्याचे आयुष्य संपले आहे अशावरही वैद्यांनी उपचार करू नयेत. 
तेव्हा वैद्य आणि रुग्ण या दोघांनीही नात्यातील विश्वास जपण्याचा आपल्या परीने प्रयत्न केले तर रोगाची अकारण भीती दूर होईल आणि दोघांचे एकत्रित प्रयत्न हे कुठल्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठी महत्त्वाचे ठरतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Relationship to Faith