esakal | पाण्यातील प्रसूती
sakal

बोलून बातमी शोधा

Water maternity

बाळाचा जन्म ही आनंददायी घटना असली तरी त्यासाठीच्या प्रसूतीच्या कळा त्रासदायक असतात. या कळांचा त्रास कमी करण्यासाठी वॉटर बर्थ सुविधा उपयुक्त आहे.

पाण्यातील प्रसूती

sakal_logo
By
डॉ. राजेश्वरी पवार

बाळाचा जन्म ही आनंददायी घटना असली तरी त्यासाठीच्या प्रसूतीच्या कळा त्रासदायक असतात. या कळांचा त्रास कमी करण्यासाठी वॉटर बर्थ सुविधा उपयुक्त आहे.

`वॉटर बर्थ'' या शब्दांनीच उत्सुकता निर्माण होते. नेमके काय असते? गर्भवती स्त्री माता होण्याच्या प्रक्रियेत कोमट पाण्याने भरलेल्या ‘पूल''मध्ये प्रसूती कळा देत असते आणि प्रसूतीची प्रक्रिया अंशतः किंवा पूर्णपणे करते, तेव्हा त्याला ‘वॉटर बर्थ'' म्हणतात. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) रुग्णालयांत किंवा  प्रसूतीगृहांमध्ये अशा प्रकारचे ‘बर्थ पूल्स'' असतात. अर्थात या प्रसूतीगृहांचे स्वरूप पारंपरिक नसते. तेथे रुग्णालयांसारखेही वातावरण नसते, तर घरासारखे असते. घरातलीच अधिकची खोली असे त्याचे स्वरूप असते. पाण्यातील प्रसूतीचे काही फायदे आहेत.

पहिला फायदा म्हणजे गर्भवती स्त्रीला वेदनेपासून मुक्ती मिळते. जेव्हा प्रसूती कळांना सुरुवात झालेल्या माता कोमट पाण्यात असतात आणि प्रसूती कळा सुरू होतात तेव्हा त्या कोमट पाण्यामुळे त्यांना खूप बरे वाटते आणि शांत वाटते. त्यामुळे त्यांना वेदनाशामक औषधांची गरज भासत नाही. त्यांच्या रक्ताभिसरणामध्ये सुधारणा होते. पाठीचे, तसेच योनी व गुदद्वार या भागातील स्नायू मोकळे होतात. प्रसूती कळा येत असलेली माता ‘रिलॅक्स'' झाली की, आकुंचन सहज होते आणि प्रसूतीची प्रक्रिया सुकर होते.

सर्वसामान्य रुग्णालयामध्ये प्रसूतीची खाट ही मर्यादित असते आणि माता केवळ अर्धवट उठून बसू शकते. अर्थात उठून चालूही शकते. पण काही स्त्रियांना प्रसूती कळा सुरू झाल्यावर चालावेसे वाटते. गरोदर माता ‘वॉटर बर्थिंग सूट''मध्ये असेल तर प्रसूतीच्या पहिल्या टप्प्यात त्यांना हालचालीसाठी अधिक स्वातंत्र्य मिळते. त्याचप्रमाणे या सुविधा वापरणाऱ्या स्त्रियांचा योनीमार्ग व गुदद्वारामधील मांसल भाग फाटण्याची शक्‍यताही कमी असते. या उती अधिक लवचिक असतात आणि परिणामी गर्भाशयातील बाळाचा जननमार्गिकेमधून (बर्थिंग कॅनल) सहजपणे प्रवास होऊन ते अलगद बाहेर येते.

काही महिला तर प्रसूतीचा दुसरा टप्पासुद्धा पाण्यातच पार पाडतात. गर्भाशयातील भ्रूणसुद्धा नऊ महिने पाण्यातच (गर्भजल) असते. म्हणूनच बाळासाठी पाण्यातून बाहेर येणे हे नैसर्गिकच असते. पण ते धोकादायकही ठरू शकते. कारण बाळ गर्भाशयातही श्वास घेत असले तरी जन्मल्यानंतर बाळाने पहिला श्वास घेतल्यावर ‘मेकोनिअम ऍस्पिरेशन'' होऊ शकते आणि प्राणघातक ''मेकोनिअम ऍस्पिरेशन सिन्ड्रोम'' किंवा न्यूमोनिया होऊ शकतो. ''मेकोनिअम ऍस्पिरेशन सिन्ड्रोम'' म्हणजे बाळाच्या फुफ्फुसात व आतड्यात विशिष्ट प्रकारचा गडद हिरवा मल तयार होतो. म्हणूनच प्रसूतीचा दुसरा टप्पा म्हणजेच गर्भाशय ग्रीवा (सर्व्हिक्‍स) पूर्ण प्रसरण पावण्यापासून ते बाळ बाहेर येण्यापर्यंतची प्रक्रिया ‘बर्थिंग पूल''मध्ये करू नये. त्याचप्रमाणे भ्रूणावर लक्ष ठेवणे म्हणजे हृदयाच्या ठोक्‍यांची गती तपासणे आणि आकुंचन प्रक्रियेची नोंद पाण्यात शक्‍य नसते. म्हणून दुसरा टप्पा सुरू होताच मातेला लगेच पाण्याबाहेर येऊन बेडवर जावे लागते, जेणेकरून तिच्या न जन्मलेल्या बाळाची तपासणी करता येईल.

ज्या गरोदर मातांच्या पोटात जुळी बाळे असतील किंवा आधी ''लोअर सेगमेंट सिझेरिअन सेक्‍शन'' झालेले असेल किंवा रक्तदाब वाढलेला असेल किंवा इतर गुंतागुंत झालेली असेल तर अशा स्त्रियांना बर्थिंग पूल न वापरण्याचे सूचित करण्यात येते.

ज्या गरोदर मातांना कोणताही वैद्यकीय धोका नसतो, त्यांनी प्रसूतीचा पहिला टप्पा बर्थिंग पूलमध्ये करणे योग्य ठरेल. बाळाचा जन्म मात्र ''पाण्यात'' होऊ देण्यापेक्षा कोरड्या जागी (ड्राय लॅंड)वर होईल असे पाहावे.