esakal | रक्ताची कमतरता व त्यावरील उपाय..
sakal

बोलून बातमी शोधा

Blood

रक्ताची कमतरता व त्यावरील उपाय..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

निःसत्त्व आहार घेण्याने, अपचनाकडे दुर्लक्ष केल्याने, फार मानसिक ताण, अतिजागरणे यामुळेही रक्ताची कमतरता निर्माण होऊ शकते. रक्ताच्या कमतरतेवर उपचार करताना सर्वप्रथम त्याचे कारण बघावे लागते. रक्तवाढीसाठी उपचार करण्याबरोबरीने रक्त तयार होण्यातला किंवा ते शरीरात टिकण्यातला अडथळा शोधून तो दूर करण्यासाठी सर्वप्रथम प्रयत्न करावे लागतात.

रक्त हा शरीरातील एक महत्त्वाचा घटक. आरोग्य टिकविण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती कार्यक्षम ठेवण्यासाठी रक्त अतिशय महत्त्वाचे असते. आयुर्वेदात रक्ताची कार्ये याप्रमाणे सांगितलेली आहेत, `कर्म वर्णप्रसादो मांसपुष्टिर्जीवनं धातूनां पूरणं असंशयं स्पर्शज्ञानं च। ...सुश्रुत शारीरस्थान.’

तेजस्वी वर्ण, मांसादी उत्तरोत्तर धातूंचे पोषण, उत्तम जीवनशक्ती, स्पर्शज्ञान या सर्व गोष्टी रक्तामुळे मिळतात. म्हणूनच आयुर्वेदात रक्त हे शरीराचे मूळ असून रक्ताचे सर्वतोपरी रक्षण करावे असे आवर्जून सांगितलेले दिसते. रक्त कमी झाले तर त्याचा सर्वप्रथम त्वचेच्या तेजस्वितेवर, वर्णावर परिणाम झालेला दिसतो.

  • रक्ताच्या कमतरतेमुळे खालील लक्षणे उत्पन्न होतात

  • त्वचा, नखे, डोळे यांचा स्वाभाविक वर्ण बदलून म्लानता, निस्तेजता येणे.

  • एकंदर शरीरशक्ती कमी होणे.

  • पचन खालावणे, मळमळणे.

  • वीर्यशक्ती, उत्साह, ओजतत्त्व कमी होणे.

स्त्रियांच्या बाबतीत पाळीमध्ये अति प्रमाणात रक्तस्राव झाला किंवा पाळीखेरीज अधून मधून रक्तस्राव होत राहिल्यास रक्ताची कमतरता उद्भवू शकते. त्याचप्रमाणे शरीराच्या कुठल्याही भागातून रक्तस्राव होण्याचा विकार असल्यास, उदा. मूळव्याधीमुळे गुदमार्गाने थोडा थोडा रक्तस्राव होणे, अल्सरमुळे रक्तस्राव होणे वगैरेंमुळेही रक्ताल्पतेची लक्षणे दिसू शकतात. जंतांमुळेही रक्ताची कमतरता निर्माण होऊ शकते. ‘पुरीषजाः क्रिमयः सूक्ष्माः पाण्डुतां जनयति ।...माधवनिदान मधुकोष.’ विष्ठेत तयार होणाऱ्या सूक्ष्म जंतांनी शरीरातील रक्ताचे शोषण केल्यामुळे पांडुता निर्माण होते. बऱ्याच लहान मुलांमध्ये रक्त कमी असण्यामागे हे एक कारण असते. वृक्क म्हणजे मूत्रपिंडांची कार्यक्षमता कमी झाल्यास रक्तात विषद्रव्य साठून रक्त कमी होताना दिसते. शरीरातल्या रोगप्रतिकार यंत्रणेत बिघाड झाल्यानेही रक्ताची कमतरता उद्भवू शकते. निःसत्त्व आहार घेण्याने, अपचनाकडे दुर्लक्ष केल्याने, फार मानसिक ताण, अति जागरणे यामुळेही रक्ताची कमतरता निर्माण होऊ शकते. रक्ताच्या कमतरतेवर उपचार करताना सर्वप्रथम त्याचे कारण बघावे लागते.

रक्तवाढीसाठी उपचार करण्याबरोबरीने रक्त तयार होण्यातला किंवा ते शरीरात टिकण्यातला अडथळा शोधून तो दूर करण्यासाठी सर्वप्रथम प्रयत्न करावे लागतात. उदा. स्त्रियांसाठी पाळीच्या वेळी अधिक रक्तस्राव होत असल्यास रक्तवाढी बरोबरच रक्तस्राव थांबवण्यासाठी उपाययोजना करावी लागते; जंत झाले असल्यास कृमीनाशक औषधे देऊन उपचार करावे लागतात. जनुकीय बिघाडामुळे होणाऱ्या थॅलिसिमियासारख्या दुष्कर विकारात रक्ताग्नी वाढवून रक्तधातूची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करता येतात. तसेच पुढच्या बालकाला जन्मजात दोष येऊ नयेत म्हणून गर्भधारणे अगोदरपासून प्रयत्न करता येतात. गर्भारपणात स्त्रीच्या रक्तधातूवर तिचे स्वतःचे व गर्भाचे असे दोघांचे पोषण करण्याची जबाबदारी असल्याने गर्भवतीला अगोदरपासून रक्तवाढीसाठी आहार-औषधे दिली जातात. गर्भवतीचे रक्त फार कमी असले तर त्यामुळे गर्भाच्या विकासावरही परिणाम होऊ शकतो. शिवाय बाळंत होतानाही विविध समस्या उद्भवू शकतात. रक्तधातू सशक्त बनवण्यासाठी किंवा रक्तवाढीसाठी नैसर्गिक आहार व औषधांचा वापर करणे चांगले. काळ्या मनुका, खजूर, डाळिंब, सफरचंद, पालक, केशर, आवळा, गूळ वगैरे गोष्टींचा आहारात नियमित समावेश असू द्यावा. स्वयंपाक करताना लोखंडाची कढई, तवा, पळी वापरण्यानेही रक्तवाढीला मदत मिळते. पांडुरोगावर उपचार म्हणून लोखंडाच्या भांड्याचा उपयोग करायचा संदर्भ आयुर्वेदाच्या ग्रंथातही सापडतो.

‘लोहपात्रे श्रृतं क्षीरं सप्ताहं पथ्यभोजनः। पिबेत्पाण्डवामयी शोषी ग्रहणीदोषपीडितः॥...चक्रदत्त.’ लोखंडाच्या भांड्यात क्षीरपाक (म्हणजे पाण्यासह उकळलेले दूध) पिऊन पथ्याने राहिले असता पांडुरोग, शोष, ग्रहणी या विकारांसाठी उपयोगी पडते. लोहभस्म, मंडुरभस्म, सुवर्णमाक्षिक भस्म, नवायास लोह वगैरे आयुर्वेदिक योगही रक्तवाढीसाठी उत्तम असतात. रक्तधातूच्या पोषणासाठी सॅन रोझ, धात्री रसायन वगैरे रसायन कल्पांचाही चांगला उपयोग होतो, सशक्त रक्तधातूबरोबरच एकंदर आरोग्याचा, तेजस्वितेचाही लाभ होतो. याखेरीज द्राक्षासव, पुनर्नवामंडूर, धात्र्यारिष्ट वगैरे आयुर्वेदातल्या योगांचाही रक्ताची कमतरता भरून येण्यासाठी चांगला उपयोग होतो. रक्ताचे प्रमाण कमी झाले किंवा रक्तधातूची सारता, वीर्यता टिकवली नाही तर विविध रक्तविकार उदा. त्वचारोग, विविध ॲलर्जी, अंगावर पित्ताच्या गांधी उठणे वगैरे त्रास होण्याची शक्यता वाढते. रक्ताल्पतेलाच चुकीच्या आहार-विहाराची विशेषतः पित्तदोष वाढवणाऱ्या कारणांची जोड मिळाली तर असे त्रास हमखास होऊ शकतात. त्यामुळे रक्ताचे प्रमाण, रक्ताची सारता, रक्ताची शुद्धता नीट राखली जाण्यासाठी सुरुवातीपासूनच योग्य ती काळजी घेणे श्रेयस्कर होय.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या विपुल लेखनातून संकलित)

loading image
go to top