रसरशीत रसायन... आवळा! Amla Fruit | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amla Fruit
रसरशीत रसायन... आवळा!

रसरशीत रसायन... आवळा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

केवळ आवळ्याच्या फळातच रसायनाचे गुण आहेत असे नव्हे, तर आवळ्याच्या झाडाच्या वातावरणातही हा गुण आलेला दिसतो. त्यामुळे आवळ्याच्या झाडाच्या सान्निध्यात राहिल्यानेही पित्तशमन, रक्तसंवर्धन, रक्ताभिसरण वाढून शरीराला ‘रसायनाचे’असे फायदे मिळतात. म्हणूनच आवळीपूजनाच्या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली बसावे, विश्रांती घ्यावी, तेथे बसून काही खावे, जेणेकरून झाडाच्या आजूबाजूला असलेल्या प्राणशक्तीचा उपयोग होईल, अशी प्रथा असलेली दिसते.

आयुर्वेदाच्या अष्टांगांमध्ये रसायन आणि वाजीकरण हे दोन महत्त्वाचे विभाग. सळसळते तारुण्य, जीवन जगण्याची ऊर्मी, उत्साह, सर्जनशक्ती या सर्वांसाठी रसादी धातू, विशेषतः वीर्यधातू संपन्न असावे लागतात आणि त्यासाठी जीवनात रस असावा लागतो. रसायनयोजना योग्य तऱ्हेने केली तर वीर्यवृद्धी होते. शरीरातील संपूर्ण चलनवलन, शरीरातील संपूर्ण चलनवलन व पेशीपेशीमधील किंवा सर्व अंतर्गत अवयवरचनेतील संदेश देवाण-घेवाणसुद्धा रसायनामुळेच व्यवस्थित चालते. जगण्यातील रस हा पण व्यक्ती-व्यक्तीतील संपर्क व संवाद ह्यामुळेच वाढतो व त्यासाठी आवश्‍यकता असते ताकदवान व निरोगी चेतासंस्थेची. ह्या सर्व कार्यासाठी उत्तम पर्याय आहे ‘आवळा’!

कार्तिक महिन्यात एकादशी ते पौर्णिमा या काळात आवळ्याच्या झाडाचे पूजन करण्याची परंपरा आहे. आत्मसंतुलनमध्ये आवळीपूजन झाल्यानंतरच आवळ्यापासून औषधे तयार करण्याची प्रक्रिया सुरू होते. विशेषतः ज्या औषधांमध्ये ताजे आवळे वापरले जातात. उदा. च्यवनप्राश, धात्री रसायन किंवा आवळ्याच्या रसाच्या भावना देऊन करायची औषधे, ही सर्व आवळीपूजनंतरच केली जातात. आवळ्याचे अनेक प्रकार असतात. डोंगरी आवळ्यात बी मोठी असते, गर त्यामानाने कमी असतो व गरात धागे अधिक असतात. हे आवळे चवीला अधिक तुरट असतात. काही प्रकारचे आवळे मोठे रसरसशीत, अधिक गर व अधिक रस असणारे असतात. अपरिपक्व म्हणजे नीट न वाढलेले आवळे व झाडावरून गळून खाली पडून वाळलेले आवळे औषधाच्या दृष्टीने एवढेसे उपयोगी नसतात. असे आवळे वाळवून आवळकाठी वा आवळकाठीचे चूर्ण म्हणून विकले जाते किंवा त्यांना भिजत घालून च्यवनप्राशसारख्या रसायनात वापरलेले दिसतात. मात्र अशा दर्जाचे आवळे वापरल्यामुळे अशा वस्तूंची उपयोगिता व गुण खूपच कमी होतात. त्यामुळे, औषधांचे उत्पादन करतेवेळी आवळे रसरशीत व ताजे हवेत.

आवळा स्वयंपाकघरातही वापरता येतो. ‘अम्लफलेषु श्रेयम्‌’ म्हणजे सर्व आंबट फळांमध्ये आवळा श्रेष्ठ सांगितला असल्याने चटणी, लोणचे, सुपारी करण्यासाठी आवळ्यासारखे दुसरे उत्तम फळ नाही. साखरेच्या पाकात मुरलेला आवळा म्हणजे मोरावळासुद्धा सर्वांच्या परिचयाचा असतो. पूर्ण आवळे टोचे मारून गरम पाण्यात किंचित वाफवून साखरेच्या पाकात टाकून किंवा किसून साखरेच्या पाकात टाकून मोरावळा केला जातो. मोरावळा करण्याची कृती कोणतीही असली तरी मोरावळा मुरू देणे म्हणजेच जुना होऊ देणे खूप महत्त्वाचे असते. म्हणून जुना मोरावळा गुणांमध्ये श्रेष्ठ असतो. पित्तशामक म्हणून मोरावळ्याचा खूप उपयोग होतो. वाढलेले पित्त, मग ते उन्हाळ्यातील असो वा इतर ऋतूतील, नेहमीच त्रास देते व ते मेंदूचे व डोळ्यांचे अधिक नुकसान करते. अशा वेळी मोरावळ्याचा खूप उपयोग होतो. यकृत व्यवस्थित काम करत नसल्यास किंवा यकृताचा आकार वाढत असल्यास मोरावळ्याचा चांगला उपयोग होतो. अशा वेळी दिवसातून दोनदा मोरावळा खाण्याने खूप उपयोग होताना दिसतो. केवळ आवळ्याच्या फळातच रसायनाचे गुण आहेत असे नव्हे तर आवळ्याच्या झाडाच्या वातावरणातही हा गुण आलेला दिसतो. त्यामुळे आवळ्याच्या झाडाच्या सान्निध्यात राहिल्यानेही पित्तशमन, रक्तसंवर्धन, रक्ताभिसरण वाढून शरीराला ‘रसायनाचे’असे फायदे मिळतात. म्हणूनच आवळीपूजनाच्या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली बसावे, विश्रांती घ्यावी, तेथे बसून काही खावे, जेणेकरून झाडाच्या आजूबाजूला असलेल्या प्राणशक्तीचा उपयोग होईल, अशी प्रथा असलेली दिसते.

भगवान विष्णूंना जशी तुळशी प्रिय आहे, तसा त्यांना आवळाही प्रिय आहे. म्हणून आवळ्याच्या झाडाखाली बसून विष्णुपूजन केल्याने पुण्य मिळते असे म्हणतात. आवळ्याचे अनेक उपयोग आहेत. खूप उचकी लागत असेल आणि पाणी, साखर वगैरे खाऊनही थांबत नसेल तर आवळ्याचा रस मधात मिसळून थोडा थोडा घेण्याचा उपयोग होतो. आवळा आम्लपित्तावर प्रभावी असतो. आवळ्याचा रस दोन चमचे, दोन चिमूट जिरे पूड आणि चवीनुसार खडीसाखर मिसळून सकाळ-संध्याकाळ घेतल्यास १५ दिवसात आम्लपित्ताचा त्रास थांबतो. पित्त वाढल्याने चक्कर येत असेल तर त्यावरही आवळ्याचा रस दोन चमचे खडीसाखरे सह घेण्याचा उपयोग होतो. भूक लागावी, पचन व्यवस्थित व्हावे, तोंडाला रुची यावी यासाठी आवळ्याच्या पाचक वड्या किंवा गोळ्या करता येतात. आवळे वाफवून घ्यावेत, त्यांचा गर वेगळा करावा. या गरात जिरे, मिरे, पिंपळी, धणे, सुंठ, दालचिनी, सैंधव मीठ, काळे मीठ यांची बारीक पूड घालावी व त्याच्या वड्या किंवा गोळ्या करून वाळवून ठेवाव्यात. ही वडी किंवा गोळी चघळून खाण्यास उत्तम असते. असा हा बहुगुणी, रसायनी, तारुण्य देणारा, नवजीवन देणारा आवळा, आवळ्यापासून बनविलेला मोरावळा व पूर्ण रसायनात रूपांतर केलेले ‘संतुलन च्यवनप्राश’, ‘संतुलन आत्मप्राश’, ‘संतुलन सुहृदप्राश’ असे अनेक प्रकारचे प्राश मनुष्याला आयुष्यवृद्धी व शांती देण्यासाठी खूपच उपयोगी पडताना दिसतात.

(श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांच्या विपुल लेखनातून संकलित)

loading image
go to top