आरोग्यासाठी आहाराचे योगदान

आरोग्य चांगले राहावे ही प्रत्येकाचीच इच्छा असते. पण मनुष्य आजारी का पडतो? तर आयुर्वेदात, ‘प्रज्ञापराध’ हे मनुष्याला रोग होण्याचे मुख्य कारण सांगितलेले आहे.
diet to health
diet to healthsakal

आरोग्य चांगले राहावे ही प्रत्येकाचीच इच्छा असते. पण मनुष्य आजारी का पडतो? तर आयुर्वेदात, ‘प्रज्ञापराध’ हे मनुष्याला रोग होण्याचे मुख्य कारण सांगितलेले आहे. प्रज्ञापराधाची व्याप्ती खूप मोठी असली तरी कोणत्याही चुकीच्या विचाराचे प्रात्यक्षिकरण मुख्यत्वे आहारातूनच होत असते.

आहार म्हणजे अन्न असे जरी ढोबळमानाने म्हटले जात असले तरी आपल्या पाचही इंद्रियांच्याद्वारा जे काही शरीरात स्वीकारले जाते ते सर्व आहाराच्या अंतर्गत येत असते. त्या त्या इंद्रियाचा विषय म्हणजे त्या त्या इंद्रियाचा आहार असे समजायला हरकत नाही, परंतु मुखाद्वारे घेतलेल्या आणि जिभेद्वारे चाखलेल्या आहाराकडे आपले अधिक लक्ष असते, कारण अन्नाचे सेवन केल्याशिवाय आपण जगू शकत नाही. नवजात बालकालाही भूक लागली की रडायचे एवढे कळत असते. जणू ‘मला अन्न हवे’ ही गोष्ट मुलाला जन्मापासूनच कळायला लागते.

आपण सर्वच आपली अशी एक विशेष प्रकृती घेऊन आलेलो असतो. आणि खरं तर त्यानुसार आपल्याला एक प्रकारची नैसर्गिक किंवा उपजत अशी आवड-निवडही असते, पण नंतर नंतर मन डोईजड होऊ लागले की ही उपजत जाणीव मागे पडते आणि माणसाचे मन अन्नाची निवड करू लागते.

‘मला अमुक आवडते’, ‘तमुक आवडत नाही’, ‘एखादी वस्तू मला आजच्या आज खायचीच आहे’ किंवा ‘सगळ्या मित्र-मैत्रीणींच्या डब्यात असते म्हणून मलाही हवे’ अशा गोष्टी एकदा सुरू झाल्या की पचनसंस्थेची फार मोठी अडचण होते. उदा. कफप्रवृत्तीच्या माणसाला दूध वा केळे आवडत नसले तर तो शरीराच्या संरक्षणासाठी शरीराने नैसर्गिकपणे सुचविलेला निर्णय असतो.

परंतु बऱ्याच वेळा आवडी-निवडीचा संबंध शरीरप्रकृतीशी न राहता मनाशी जोडला जातो व त्यामुळे खाण्या-पिण्यात चुका सुरू होतात. एखाादी वस्तू आवडली की ती मर्यादेबाहेर खाल्ली जाते व एखादी वस्तू आवडत नसल्यास ती टाळली जाते. या दोन्हींमुळे दोष व धातू असंतुलित होतात.

जोपर्यंत शरीरात कोणत्याही मोठ्या रोगाने स्थान प्राप्त केलेले नसते तोपर्यंत स्वतःच्या प्रकृतीला न मानवणारे अन्न क्वचित प्रसंगी खाल्ले तरी चालून जाते. जोपर्यंत शरीराला कुठलाही रोग झाला नाही तोपर्यंत चौरस अन्न मिळाले नाही, केवळ आवडीच्या वस्तू खाल्ल्या तरी कदाचित त्रास होत नाही. परंतु हे सुद्धा खरे की बहुतेक सर्व आजार अनियमित, अवेळी व अतिमात्रेत खाण्याने होत असतात आणि या जिभेला लावलेल्या सवयी आजार झाल्यावर फार त्रासदायक होतात.

आजारपणात काय खावे, काय नाही यासंबंधीचे मार्गदर्शन ऐन वेळी सुद्धा मिळू शकते. परंतु आजारी पडल्यानंतर पूर्वी लागलेल्या सवयींमुळे पथ्य पाळता येत नाही, त्यामुळे कुपथ्य होत राहते आणि रोगावर मात करणे अवघड होत जाते. बहुतेक आजारात लंघन औषधाप्रमाणे उपयोगी पडत असले तरी बहुतेकांना लंघन करणे जमत नाही.

रात्रीचे जेवण बंद करण्याने किंवा रात्रीच्या वेळी सूप वगैरे द्रवाहार घेण्याने शरीरात उद्भवलेल्या रोगावर ताबडतोब नियंत्रण मिळविता येते. परंतु दिवसभर कामात गुंतल्यामुळे रात्री भरपेट जेवायची सवय लागली की रात्री हलका आहार घेणे वा न जेवता झोपणे अवघड होते. बहुतेकांना आवडीची वस्तू कुपथ्यात मोडणारी असली तर ती टाळणे अवघड होते.

मात्र आहाराच्या बाबतीत सावधानता बाळगली तर रोग होणारच नाही असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. यादृष्टीने आणि समजा जर काही अस्वास्थ्याची लक्षणे जाणवू लागलीच तर खालील उपाय लवकरात लवकर सुरू करणे चांगले.

पिण्याचे पाणी उकळून घेणे - उकळी फुटल्यावर १५-२० मिनिटे व्यवस्थित उकळलेले व चौपदरी कापडातून गाळून घेतलेले पाणी पचण्याच्या दृष्टीने सोपे असते व शुद्ध असते. आजारपणात अजून नव्याने जंतुसंसर्ग होऊ नये म्हणूनही उकळलेले पाणी पिणे उत्तम असते. त्यातही वात-कफदोषामुळे रोग झालेला असल्यास उकळलेले गरम पाणी पिणे उत्तम असते. पित्तदोषाचे प्राधान्य असल्यास उकळलेले थंड पाणी प्यायले तरी चालते.

ताजे व शिजवलेले, स्वच्छता व शुद्धतेची काळजी घेऊन बनविलेले अन्न खाणे : कच्चे अन्न शिजविलेल्या अन्नापेक्षा पचण्याच्या दृष्टीने अवघड असते, शिवाय कच्च्या अन्नातून रासायनिक खते, रासायनिक द्रव्ये पोटात जाण्याचे प्रमाण बरेच जास्ती असते.

ताजे अन्न म्हणजे पुन्हा पुन्हा गरम न केलेले अन्न पचण्याच्या दृष्टीने चांगले असते, तसेच आतील सत्त्व टिकविण्याच्या दृष्टीनेही चांगले असते. फ्रीजमध्ये टिकविलेले वा प्रिझर्वेटिव्हज्‌ टाकून टिकविलेले अन्न रासायनिक दृष्ट्या चांगले असते तरी त्यातील सत्त्व कमी झालेले असते. शिवाय ते शरीरातून ताज्या अन्नाप्रमाणे स्वीकारलेही जात नाही.

तेलाचा वापर कमीत कमी करणे : तेलाचा अति प्रमाणात वापर हा निरोगी व्यक्तीसाठीही अहितकर असतो. त्यामुळे आजारी व्यक्तीचे खाणे बनविताना तेलाऐवजी घरी बनविलेल्या साजूक तुपाचा योग्य प्रमाणात वापर करणे चांगले असते. साजूक तुपात बनविलेले अन्न रुचकरही लागते, शिवाय साजूक तुपामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळाली की रोग बरा होण्यासही अप्रत्यक्षरीत्या उपयोग होताना दिसतो.

सुके, निःसत्त्व, थंड झालेले अन्न न खाता द्रवप्रधान, सत्त्वयुक्त व गरम अन्न खाणे : आयुर्वेदात म्हटले आहे, ‘शीतं शुष्कं च दुर्जरम्‌’ म्हणजे थंड व सुके अन्न पचायला अवघड असते या उलट सहज खाता येईल इतके उष्ण अन्न व द्रवप्रधान अन्न पचायला सोपे असते.

जेवणाच्या वेळा सांभाळणे : संध्याकाळचे जेवण फार उशिरा करणे इष्ट नसते. संध्याकाळी सूप, खिचडीसारखे हलके अन्न खाणे योग्य असते. प्रकृतीनुरूप भाज्या, मूग, तांदूळ, नाचणी सत्त्व, रवा, यासारख्या पथ्यकर द्रव्यांपासून बनविलेले सूप संध्याकाळच्या जेवणामध्ये उत्तम असते. मुगाची पातळ खिचडी किंवा मुगाचे कढण व भात असेही पदार्थ संध्याकाळच्या जेवणात असू शकतात.

आरोग्यासाठी चांगले म्हणजे चवीला मिळमिळीत असा एक गैरसमज जनमानसात असतो पण टोमॅटो, चिंचेच्या ऐवजी लिंबू, कोकम; तिखट वा मिरचीच्याऐवजी आले; साध्या मिठाऐवजी सैंधव मीठ; शेंगदाण्याऐवजी खोबरे; बेसनाच्या ऐवजी मुगाचे पीठ; मोहरी, हिंग, मिरी वगैरे तीक्ष्ण मसाल्याच्या पदार्थांऐवजी जिरे, धण्याची पूड, दालचिनी, हळद, पुदिना यासारखे सौम्य पदार्थ वापरून अन्नपदार्थ निश्र्चितपणे रुचकर बनवता येतात.

अशा प्रकारे आहाराच्या बाबतीत जरा दक्षता घेतली तर आरोग्याचे रक्षणही होऊ शकते आणि रोग झालाच तर त्यापासून मुक्तता मिळणेही सोपे होईल हे नक्की.

श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com