मधुमेहावर मधुरतेने मात! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diabetes

जगभरात झपाट्याने वाढणारा रोग म्हणजे मधुमेह. भारतातही समाजातील सर्व स्तरांत आणि लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढताना दिसते आहे.

मधुमेहावर मधुरतेने मात!

जगभरात झपाट्याने वाढणारा रोग म्हणजे मधुमेह. भारतातही समाजातील सर्व स्तरांत आणि लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढताना दिसते आहे. मधुमेह हा प्रमेहाचा एक प्रकार. पण फक्त साखर न खाण्याने आणि साखर मारणारी औषधे घेण्याने यावर उपचार करता येणार नाहीत. मधुमेहाला भस्मासुराची उपमा शोभून दिसेल. भस्मासुराला वर मिळालेला होता की ज्याच्या डोक्यावर तो हात ठेवेल त्याचे भस्म होईल. या वराने भस्मासुर उन्मत्त झाल्यामुळे त्याला मारण्यासाठी श्रीविष्णूंना सुंदर स्त्रीचे रूप घ्यावे लागले होते. नर्तन करणाऱ्या त्या स्त्रीला पाहून भस्मासुराच्या मनात भलतीच आशा उत्पन्न झाली. एवढ्या ठिसूळ कल्पनांवर मनात उत्पन्न झालेली शरीरसंबंधाची इच्छा व नंतर या लैंगिक आकर्षणाच्या तालावर नाचत असताना शेवटी त्याने स्वतःच स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला व त्याचे स्वतःचेच भस्म झाले. असेच काहीसे मधुमेह या रोगाच्या कारणमीमांसेबद्दल म्हणता येईल. शिवाय हा साखरेचा रोग साखरेनेच मरेल. हा साखरेचा रोग, रक्तातील साखर घालवून साखरझोपेत सगळे आलबेल असण्याची स्वप्ने पाहण्याने जाणार नाही तर साखर खाऊनच या साखरेच्या रोगाला मारावे लागेल.

मधुमेह रोग्याच्या शरीरात एक दुष्टचक्र तयार करतो. एक गोष्ट अगदी नक्की आहे की साखरेमुळे शक्ती मिळते. साखर म्हणजेच शरीर म्हणून साखर व शरीर दोघांनाही सिता-सीता असे म्हटले जाते. आत असणारी प्राणसंकल्पना व प्रोग्राम तोच जाणीवरूपी श्रीराम. त्या जाणिवेमुळे शक्तीत रूपांतर होणारे द्रव्य म्हणजेच साखर. शरीरात बाहेरून आलेल्या वेगवेगळ्या द्रव्यांमधली साखर शोषून घेण्याची क्रिया थांबते म्हणजेच शरीर साखर स्वीकारत नाही, या रोगाचे नाव ‘मधुमेह’. शरीराकडून साखर न स्वीकारली गेल्यामुळे ती मूत्रातून बाहेर पडते वा रक्तात साठते, त्यामुळे रक्ताला जडत्व येते, रक्त घट्ट होते. त्यातून उत्पन्न होतात अनेक रोग. एक तर रोगप्रतिकारशक्ती व दैनंदिन व्यवहाराला लागणारी शक्ती शरीराला मिळत नाही व दुसरे म्हणजे रक्तात राहिलेली साखर अनेक प्रकारच्या रोगांना व त्रासांना जन्म देते. हा रोग अक्षरशः मनुष्याला पोखरून टाकणारा, मनुष्याचीच नाही तर आयुष्याची राख-रांगोळी करणारा आहे.

मधुमेहावर सध्याच्या प्रचलित उपाययोजनेमध्ये सहसा रक्तात साठलेली साखर जाळून कमी करण्याकडे प्रवृत्ती असते, पण यामुळे शरीर साखरेतून मिळणाऱ्या शक्तीपासून वंचित राहिल्याने शक्ती हळूहळू कमी होत जाते. मुख्य म्हणजे एकूण मेंदूला व हृदयाला व संपूर्ण चेतासंस्थेला आवश्‍यक असणारी शक्ती न मिळाल्यामुळे हाता-पायाच्या संवेदना कमी होऊ शकतात, रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे यौवनसंबंधामध्ये ताकद कमी पडायला लागते, स्मृतिनाश वा अल्झायमर्ससारखे त्रास होऊ शकतात, पचनक्रिया बिघडते, हदयाचा विस्तार होतो, हृदय कमकुवत होते, मूत्रायशयावर ताण येतो, रक्तदाब वाढू शकतो, हृदयविकार वगैरे होऊ शकतात, असे नाना प्रकारचे विकार होतात. परंतु हे विकार अचानक न होता मध्ये थोडा वेळ मिळतो.

आयुष्यात मिळालेले दिवस व ते उपभोगायला लागणारी शक्ती यांचे गणित मात्र व्यस्तच राहते. म्हणजे एक वर्ष व्यवस्थित जगण्याऐवजी माणूस दोन वर्ष जगला पण कार्यक्षमता मात्र फक्त ५० टक्केच राहिली, अशा तऱ्हेने आयुष्य जगावे लागते. साखर ही शरीराची आवश्‍यकता आहे पण समजुतदारपणे स्वतःच्या शरीरात पचली जाईल इतक्या प्रमाणातच खाता येईल. बऱ्याच वेळा हट्टी मुले जेवत नाहीत, म्हणून काही आपण त्यांना उपाशी ठेवत नाही. ‘एक घास काऊचा, एक घास चिऊचा‘ म्हणून त्यांना आपण भरवतोच. त्याचे लक्ष चंद्राकडे लावून त्याच्या नकळत त्याला भरवावे लागते. ‘तुला नको आहे ना, मग रहा उपाशी’ असे म्हटल्यास त्या मुलाचे थोड्या दिवसांनी काय होईल याचा वेगळा विचार करायची गरज नाही. तसेच आपल्या शरीराचे आहे. मूल का जेवत नाही, त्याच्या पोटात जंत झाले आहेत का, त्याच्या छातीत कफ झाला आहे का, जेवणात त्याला न आवडणाऱ्या वस्तू आहेत का, त्याच्या भुकेची वेळ वेगळी आहे का, त्याच्या आवडीचा एखादा गोड-तिखट पदार्थ दिल्यास तो नीट जेवेल का, वगैरेंचा विचार करून शेवटी त्या मुलाला जेवायला घालावेच लागते. तसेच मधुमेह झालेल्या व्यक्तीने शरीरात सहज पचणाऱ्या गोष्टींमधून शरीराला साखर मिळावी अशी योजना करून थोड्या तरी साखरेचे शरीरात परिवर्तन होईल हे पाहावेच लागेल.

शरीराला साखरेपासून १०० टक्के वंचित करून हे काम होणार नाही, तर शरीराला काही मर्यादेत थोडी साखर घेऊन शरीराला साखर पचायला शिकवणे हे पहिले काम आहे. अर्थात त्याबरोबरीने इतर अवयव शक्तिहीन होऊ नयेत यादृष्टीने त्यांना मजबूत करण्यासाठी किंवा मूत्राशयावर अधिक ताण येऊ नये म्हणून त्यांना अधिक शक्तिशाली करण्यासाठीही औषधे घ्यावी लागतात. तसेच रक्तात जमलेली साखर काढण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. आणि शरीराने साखर ओढून घ्यावी म्हणूनही काही औषधे द्यावी लागतात.

पथ्य पाळत असताना कमी साखरेचे पदार्थ वर्ज्य करून चालत नाही तर पदार्थातली साखर शरीर सहजपणे ओढून घेऊ शकेल असे पदार्थ खाणे आवश्‍यक ठरते कारण हा राक्षस मोठा व उन्मत्त आहे. नुसती औषधे खाऊन रक्तातली किती साखर जाळणार किंवा किती पचनशक्ती सुधारणार? म्हणून बरोबरीने शरीरात वीर्यवर्धन करणे, चालणे, योगासन, प्राणायाम या गोष्टी आवश्‍यक असतात.

मानसिक ताण या रोगाचे एक विचित्र गणित तयार करतो. जसजशी शक्ती कमी होईल तसतसा जीवनाचा आनंद लुटण्याची क्षमता कमी होते. कामामधली कार्यक्षमता कमी झाल्यामुळे मानसिक ताण वाढतो. मानसिक ताण वाढला की पचनशक्ती कमी होते, शक्तिव्यय होतो, शरीरात साखर ओढली जात नाही पर्यायाने पुन्हा साखर वाढते. असे एक दुष्टचक्र तयार होते. एरवीही कुणाचा मानसिक ताण खूप वाढला किंवा एखादा मानसिक धक्का बसला तर तयार झालेल्या ताणामुळे शरीरात आळस वाढतो, शरीर मोडल्यासारखे वाटते, अंगात कणकण वाटते. मधुमेह्याच्या बाबतीत तर मानसिक ताण वाढणे म्हणजे भस्मासुराला मदत करण्यासारखेच आहे. तेव्हा ध्यान, स्वास्थ्यसंगीत याद्वारे नेटाने व श्रद्धेने मानसिक ताण कमी करण्याची योजना आखून मधुमेह्याची दिनचर्या ठरवावी लागेल.अशा प्रकारे मधुमेहावर फक्त गोळ्या इंजेक्शनवर विसंबून न राहता आणि जीवनातील गोडवा न घालवता आयुर्वेदाची मदत घेतली तर आयुष्य सुखात जगता येईल.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित.)

टॅग्स :articleDiabeteshealth