अन्नाद् भवन्ति भूतानि! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Food

योग्य अन्न हे औषधाप्रमाणे शरीराला मदत करते, तर प्रकृतीनुरूप औषध अन्नाप्रमाणे सहजतेने शरीरात सामावले जाते, शरीरधारणाचे काम करते.

अन्नाद् भवन्ति भूतानि!

अन्न, वस्त्र, निवारा या मनुष्याच्या प्राथमिक गरजा असतात. अन्नामध्ये पाणी अंतर्भूत असतेच. अन्नपाण्यापासून तयार झालेल्या शरीराचे संरक्षण करण्यासाठी असते वस्त्र आणि बाह्य वातावरणापासून संरक्षण करण्यासाठी, जीवन जगण्यासाठी स्वच्छ, चांगले अवकाश प्रदान करण्यासाठी असतो निवारा. यातील सर्वांत महत्त्वाचे असते अन्न. देह पंचमहाभूतांपासून म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांच्यापासून तयार झालेला आहे. मनुष्याच्या शरीरात जलतत्त्वाचे व पृथ्वीतत्त्वाचे आधिक्य असल्यामुळे त्याला अन्न-पाणी मिळत राहणे आवश्‍यक आहे. अस्तित्वाच्या अशाही काही पातळ्या आहेत, जेथे असलेल्यांचे देह वायुतत्त्वप्रधान असतात. सद्गुरु श्रीदत्तात्रेयांसारखे काही व्यक्तिमत्व पूर्णतः आकाशतत्त्वाचे देह असलेले आणि त्यामुळे ते दिगंबर, निर्गुण, निराकार महाशक्ती धारण करणारे असतात आणि भक्ताने आठवण केल्यावर त्वरित प्रकट होऊन मार्गदर्शन करतात. आयुर्वेदात अन्न व औषध यांच्यात फरक केलेला दिसत नाही.

योग्य अन्न हे औषधाप्रमाणे शरीराला मदत करते, तर प्रकृतीनुरूप औषध अन्नाप्रमाणे सहजतेने शरीरात सामावले जाते, शरीरधारणाचे काम करते. थोडक्यात, प्रत्येकाने ‘आहारयोजना’ जाणीवपूर्वक करायला हवी. सध्या मनाचे-जिभेचे चोचले पुरवण्यासाठी रोज काही तरी नवीन खाल्ले जाते, मग प्रकृतीला ते मानवते की नाही याकडे लक्ष दिले जात नाही. चविष्ट हवे या नावाखाली यम्मी यम्मी अन्नाच्या शोधात भटकणारी मंडळी असतात. रोज नवीन पदार्थ तयार केले जातात, रोज कुठल्यातरी वेगळ्या देशातील, वेगळ्या खंडातील पदार्थ सेवन केले जातात, पण यातून क्षणाचा आनंद मिळाला तरी होणारे नुकसान दीर्घकाळपर्यंत टिकणारे असू शकते. जगभर फिरायला हरकत नाही, जगभरातील अन्न खायलाही हरकत नाही, परंतु ते खात असताना त्या अन्नाचा स्वभाव व आपल्या शरीराचा स्वभाव लक्षात घेऊन ते अन्न आपल्या शरीराला मानवणारे आहे का, ते आपल्या शरीरासाठी सुखकर होणार आहे का, याचा विचार करणे आवश्‍यक आहे.

वेद मनुष्याच्या उत्पत्तीपासून ते आजपर्यंत आहेत. जीवन म्हणजे काय, ते कसे जगावे, जेव्हा जीवन संपते तेव्हा शरीर पंचमहाभूतांत कसे विलीन होते, त्याचे अस्तित्व कसे राहते या सगळ्यांचे मार्गदर्शन वेदांमध्ये केलेले आढळते. वेदांनी हजारों वर्षांपूर्वी आहारासंबंधी सांगतिलेल्या शास्त्रात आजही काहीही बदल करावा लागत नाही. हे शास्त्र विशिष्ट देशासाठी किंवा विशिष्ट पाककृतीपुरते सांगितलेले नाही. प्रत्येक वस्तूचा गुणधर्म, त्यात असलेले सप्तधातूंचे भाव आणि वात-पित्त-कफादी गुण यात सांगितले आहेत. शिवाय व्यक्तीची प्रकृती, रोग वगैरेंचा विचार करून मार्गदर्शन केलेले आहे. अन्न खाताना आनंद व्हावा, ते चविष्ट असावे या हेतूने अन्न शिजवताना त्याचे संतुलन कसे करायचे, मूळ वस्तूत असलेले दोष कसे घालवायचे व गुण कसे वाढवायचे, घरातील प्रत्येकाच्या प्रकृतीला (कोणाला मोठा त्रास असल्यास त्याला सोडून) मानवेल यासाठी काय करावे याचा विचार आयुर्वेदशास्त्राने केला.

तेव्हा कुठल्या पदार्थात काय मिसळावे, पदार्थ किती वेळ शिजवावा, पाणी घालून शिजवावा की दूध घालून शिजवावा, शिजवण्यापूर्वी पदार्थ धुवून घ्यावा की भाजून घ्यावा वगैरे अनेक प्रकारचे मार्गदर्शन या शास्त्रात केलेले आढळते. उदा. मुगाच्या डाळीचे वरण करताना त्याला साजेशा, समान गुणधर्माच्या तुपाची फोडणी द्यावी, तुपाच्या फोडणीत जिरे घालावे तर तेलाच्या फोडणीत मोहरी वापरावी, फोडणी देताना तेल असो वा तूप, ते फार तापणार नाही पण जिरे-मोहरी कच्ची राहणार नाही याची काळजी घ्यावी, तेला- तुपाची शुद्धी करण्यासाठी हळद फोडणीतच टाकावी, भाज्या-वरण-भात वगैरे बनविताना कुकरचा वापर न करता भांड्याचाच वापर करावा, आजारी व्यक्ती असेल तर गहू, तांदूळ अगोदर तुपावर भाजून घ्यावेत अशा अनेक गोष्टी शास्त्रात समजावलेल्या असतात, परंपरेने घराघरात सांभाळल्या जात असतात. पण हे नियम न पाळता बनविलेले तयार अन्न बाहेरून ऑर्डर करून रोज खाण्याने आरोग्य सुरक्षित कसे राहील? चरकसंहितेतील चिकित्सास्थानाच्या पहिल्याच अध्यायात सांगितले आहे, " सर्वे शारीरदोषाः भवन्ति ग्राम्याहारात्‌ ।" सर्व दोष, सर्व रोग हे ग्राम्याहारातून उत्पन्न होत असतात. ग्राम म्हणजे गाव किंवा शहर. तेव्हा गावात किंवा शहरात सरसकट उपलब्ध असणाऱ्या किंवा सोयीपरत्वे, आवडीच्या म्हणून ज्या गोष्टी खाल्ल्या जातात त्या ग्राम्याहारात मोडतात, आणि त्या रोगाला कारण ठरतात.

ग्राम्याहारात त्यावेळी अंतर्भूत केलेल्या गोष्टी म्हणजे आंबट, खारट, तिखट पदार्थ, सुकवलेल्या भाज्या, सुकवलेले मांसाहारी पदार्थ, तिळाचे चूर्ण, मैद्यासारख्या पिठापासून बनविलेले पदार्थ, पाण्यात भिजवून मोड आणलेली धान्ये, एक वर्ष होण्यापूर्वी खाल्लेली धान्ये व कडधान्ये, रूक्ष पदार्थ, क्षारयुक्त पदार्थ, शरीरात गेल्यावर जलीय अंश वाढविणारे पदार्थ, शिळे पदार्थ वगैरे. म्हणजेच प्रकृती कोणतीही असो, ग्राम्याहारात उल्लेख केलेल्या गोष्टींपासून दूर राहणेच श्रेयस्कर. आयुर्वेदात सांगितले आहे, ‘आत्मानं अभिसमीक्ष्य भुञ्जीत’ म्हणजे आपली प्रकृती समजून घेऊन त्यासाठी अनुकूल काय, प्रतिकूल काय हे लक्षात घेऊन त्यानुसार आहारयोजना करावी. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ हे लक्षात घेतले तर हे काम तितकेसे सोपे नाही हे समजेल. यासाठी एकदा तज्ज्ञ वैद्यांना भेटून प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे उत्तम होय. जीवनाचा आनंद व अनुभव उत्तम आरोग्यवान शरीरानेच घेता येतो, तेव्हा यासाठी सहायक आहाराची योजना जाणीवपूर्वक करणेच श्रेयस्कर होय.

(श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांच्या विपुल लेखनातून संकलित)

Web Title: Article Writes Food Clothing Shelter Basic Needs

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :articlefood newsclothes