स्वातंत्र्याचा खरा अनुभव ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

health freedom

आरोग्य असो की सौंदर्य, ते अनुभवताना स्वातंत्र्याची जोड असावी लागते. कुठलेही बंधन हे पारतंत्र्याची आठवण करून देते.

स्वातंत्र्याचा खरा अनुभव !

खरे आरोग्य व सौंदर्य अनुभवायचे असेल, तर आंतरिक सौंदर्याचा विचार केला पाहिजे. आंतरिक सौंदर्यासाठी दोन गोष्टी लागतात, एक म्हणजे आतल्या पचनसंस्थेपासून स्त्री-पुरुषांचे भेद, स्वभाव उत्पन्न करणाऱ्या अग्नीला, तसेच हृदय, फुप्फुसे वगैरे महत्त्वाच्या अवयनांना आणि ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिये ह्यांना मिळणारी प्रेरणा आणि त्याबरोबरीने चांगले काम करण्याची इच्छा, श्रमप्रतिष्ठा, दुसऱ्याला मदत करण्याची, दुसऱ्यावर प्रेम करण्याची संकल्पना!

आरोग्य असो की सौंदर्य, ते अनुभवताना स्वातंत्र्याची जोड असावी लागते. कुठलेही बंधन हे पारतंत्र्याची आठवण करून देते. सौंदर्यप्रसाधने वापरून वा पार्लरमध्ये तास न् तास घालवून मिळविलेलं उसनं सौंदर्य असो किंवा रोगाची लक्षणं जाणवणार नाहीत अशी औषधं घेऊन मिळविलेलं आरोग्य असो, त्यात स्वातंत्र्याचा अनुभव असणार नाही हे नक्की.

एखादी व्यक्ती दिसायला सुंदर असते, पण जोपर्यंत डोळ्यांत तेज नसेल, डोळ्यांतून वात्सल्य, प्रेम पाझरत नसेल, कांती छान, तेजस्वी नसेल तोपर्यंत त्याला खरे सौंदर्य म्हणता येत नाही. संस्कृत साहित्यात स्तनांचे, दंडांचे, मांड्यांचे, स्त्रियांच्या केशसंभाराचे, पुरुषाच्या भरदार छातीचे, त्याच्या रुंद खांद्याचे, त्याच्या उभ्या राहण्याच्या ऐटीचे, डौलदारपणाचे वर्णन केलेले असते. असे सौंदर्य आरोग्याशिवाय मिळत नाही. गीतरामायणातील एक गाण्यात विश्र्वामित्र प्रभु रामचंद्रांना त्राटिकावधाच्या वेळी ‘होऊ दे पौर्णिमा शौर्यचंद्रा’ असे म्हणतात. पौर्णिमेच्या शौर्यचंद्राप्रमाणे सौंदर्याचा, आरोग्याचा चंद्र हवा असेल तर त्यासाठी मुळापासून प्रयत्न करावे लागतील.

सौंदर्याची आवश्‍यकताही असते कारण ज्या ठिकाणी सौंदर्य आहे त्या ठिकाणी मंगलमय वातावरण, सुविचार जोडलेले असू शकतात. घर सजविणे, मनुष्याने उत्तमोत्तम वस्त्रालंकार घालणे, सुंदर दिसण्याचा प्रयत्न करणे ही एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. मात्र त्यासाठी नुसता भरमसाठ खर्च करणे, सौंदर्यप्रसाधनांवर अवलंबून राहणे हा योग्य उपाय नव्हे. खरे आरोग्य व सौंदर्य अनुभवायचे असेल तर आंतरिक सौंदर्याचा विचार केला पाहिजे. आंतरिक सौंदर्यासाठी दोन गोष्टी लागतात, एक म्हणजे आतल्या पचनसंस्थेपासून, स्त्री-पुरुषांचे भेद, स्वभाव उत्पन्न करणाऱ्या अग्नीला (हॉर्मोन्सच्या संतुलनाला जबाबदार असणारे तत्त्व), तसेच हृदय, फुप्फुसे, वगैरे महत्त्वाच्या अवयनांना आणि ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिये ह्यांना मिळणारी प्रेरणा आणि त्याबरोबरीने चांगले काम करण्याची इच्छा, श्रमप्रतिष्ठा, दुसऱ्याला मदत करण्याची, दुसऱ्यावर प्रेम करण्याची संकल्पना या दोन्ही विभागात जेव्हा व्यवस्थित संतुलन होईल तेव्हा आंतरिक आरोग्य उत्तम असेल व या आंतरिक आरोग्याचा पडसाद बाह्यशरीरावर उमटून कुठल्याही सौंदर्यप्रसाधनाशिवाय शरीर सुंदर दिसायला लागेल.

बंधन कुणालाच नको असते. कुठलेही व्यंग एक प्रकारचे बंधनच असते. सहा बोटे असलेली माणसे एक बोट लपविण्याचा प्रयत्न करतात किंवा एक डोळा लहान असला वा एका गालावर काळा डाग असला तर फोटो काढताना कायम दुसऱ्या बाजूने काढला जाईल असे पाहण्याचा प्रयत्न केला जातो. कुठलाही रोग तर मनुष्याला पूर्णतः परस्वाधीन करतो. रोगापासून सुटका, रोगापासून मुक्ती मिळावी ही सगळ्यांचीच कल्पना असते म्हणून रोग होऊ नये म्हणून प्रयत्न करावा व रोग झालाच तर त्यापासून मुक्ती मिळविण्याचाही प्रयत्न करावा. बाह्यजगात जसे एखाद्या देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी व्यक्तीच्या जीवनमानात काहीच फरक पडलेला नसतो, एक सरकार गेले व दुसरे आले एवढ्याच आनंदात राहून जल्लोष करत राहणे एवढेच सुख. शत्रूपासून मिळणारे दुःख एक वेळ स्वीकारले जाते कारण त्याच्याशी लढायचा निर्णय घेतलेला असतो पण आप्तस्वकीयांपासून दुःख मिळते तेव्हा मनुष्य फार व्यथित होतो.

स्वातंत्र्यानंतर सत्तेत येणाऱ्या आपल्या माणसांनी भ्रष्टाचार केला तर वाईट वाटते. स्वतंत्रता व्यक्तिगत पातळीवर अनुभवता आली तरच खरे सुख. रोगाला कुठेतरी बाजूला सारणे, रोगाची लक्षणे दिसू नयेत एवढा प्रयत्न करणे, रोगाचे जंतू मारणे यावर अवलंबून न राहता आरोग्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वतः घ्यायला हवी आनंद, आरोग्य, आत्मविश्वास ह्या गोष्टी दुसऱ्याने देऊन चालत नाहीत, त्या स्वतःच्या स्वतःलाच मिळवाव्या लागतात. आरोग्यासाठी लवकर उठणे, चालायला जाणे, स्नानादी नित्यकर्मे व्यवस्थित करणे, व्यायाम-योग करणे, प्रार्थना करणे, दिवसातून थोडे तरी संगीत ऐकणे वगैरेच्या माध्यमातून मन रिलॅक्स ठेवणे, आपल्या प्रकृतीला मानवणारे अन्न खाणे, आपल्या वयाला शोभेल अशीच कर्मे करणे, चार मित्रमंडळीत रमणे, प्रवासाला जाणे, उपजीविकेचे काम मन लावून करणे, स्वतःची, राष्ट्राची व देशाची प्रगती होईल यासाठी हातभार लावणे अशा गोष्टी आवश्‍यक असतात. असे केल्यासच मनुष्याला संपूर्ण आरोग्याचा अनुभव घेता येतो. यासाठी आयुर्वेदाने सुचवलेले काही महत्त्वाचे उपाय थोडक्यात याप्रमाणे सांगता येतील

अग्नी सुस्थितीत राहण्यासाठी आहार-योजना काळजीपूर्वक करणे महत्त्वाचे होय, विशेषतः आहार प्रकृतीनुरूप असण्याकडे तसेच सातही धातूंचे पोषण करण्यास समर्थ असण्याकडे लक्ष ठेवायला हवे. काय खावे, कधी खावे, किती प्रमाणात खावे, अन्न कसे शिजवावे, कोणत्या गोष्टी एकत्र करू नयेत, ऋतुनुसार आहारात काय बदल करावा वगैरे सर्व गोष्टी आयुर्वेदाने इतक्या काळजीपूर्वक व विस्तृतपणे सांगितलेल्या आहेत की त्या प्रत्यक्षात आणणाऱ्या मनुष्याचे आरोग्यरूपी स्वातंत्र्य कुणीही हिरावून शकणार नाही.

रक्त, शुक्र हे धातू तसेच ओज सुस्थितीत राहण्यासाठी आयुर्वेदाने सांगितलेल्या रसायनांचे नियमित सेवन करणे उत्तम. मांसधातू व अस्थीधातू मजबूत होण्यासाठी योग्य आहाराबरोबरच व्यायामाचीही मोठी आवश्‍यकता असते, त्या दृष्टीनेही प्रकृतीनुरूप व्यायामाचा रोजच्या दिनक्रमात अंतर्भाव करणे गरजेचे होय.

दिनचर्येत समाविष्ट केलेला अभ्यंग हा आपणहून करता येईल असा अत्यंत साधा पण आरोग्याचे स्वातंत्र्य कायम ठेवणारा प्रभावी उपचार आहे. नियमित अभ्यंगाने वातदोष तर संतुलित होतोच, पण सतेज, निरोगी त्वचेचा लाभ होतो, धातू दृढ होतात, शरीरशक्ती वाढते, थकवा दूर होतो, डोळ्यांची ताकद वाढते, स्टॅमिना वाढतो, एकंदरीतच आरोग्याचा, तारुण्याचा, स्फूर्तीचा लाभ होतो. रोज करावयाचे असे हे अभ्यंग सकाळी स्नानाच्या अगोदर किमान दीड तास किंवा रात्री झोपण्यापूर्वी आपले आपण स्वतंत्रपणे करता येते.

थोडक्यात, आरोग्याचे स्वातंत्र्य हा निसर्गाने दिलेला एक सहज भाव आहे. त्याचे रोगरूपी पारतंत्र्यापासून रक्षण करणे, रोगाचा हल्ला झालाच तर तो समर्थपणेपरतवून लावणे व स्वतंत्रपणे निर्भयपणे जीवनाचा आनंद घेणे आपल्याच हातात आहे.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या विपुल लेखनातून संकलित.)

Web Title: Article Writes Freedom Health Beauty

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :beautyarticlehealth