अक्षय आरोग्य!

भारतीय तत्त्वज्ञानात आहार, निद्रा, भय आणि मैथुन या चार गोष्टी मनुष्य आणि पशूमध्ये सामान्य (कॉमन) आहेत, असे सांगितले जाते.
Family
FamilySakal
Summary

भारतीय तत्त्वज्ञानात आहार, निद्रा, भय आणि मैथुन या चार गोष्टी मनुष्य आणि पशूमध्ये सामान्य (कॉमन) आहेत, असे सांगितले जाते.

भारतीय तत्त्वज्ञानात आहार, निद्रा, भय आणि मैथुन या चार गोष्टी मनुष्य आणि पशूमध्ये सामान्य (कॉमन) आहेत, असे सांगितले जाते. यावरून मनुष्याचे मूळ पशुत्वात आहे, हे ध्यानात येते. त्यातला एक भय नावाचा स्तंभ काढून टाकला तर उरलेल्या तीन स्तंभांमुळे जीवन आरोग्यदायी व सुखकर होईल.

तीन ही संख्या खूप महत्त्वाची असते. ब्रह्मा-विष्णू-महेश हे त्रिदेव असोत, वात-पित्त-कफ हे त्रिदोष असोत, सत्त्व-रज-तम हे मनाचे गुण असोत सगळीकडे तीन आकडा येतो. शक्तीचे तीन पाद वा तीन स्तंभ असतात, असे म्हणायला हरकत नाही. विद्युतशक्तीचे लाल-पिवळा-निळा (आर.वाय.बी.) असे तीन स्तंभ आपल्याला माहिती असतात. भगवंतांनी वामनावतार घेऊन त्रिपादभूमी बळीराजाकडे मागितली. ही कथाही आपण जाणतो. आयुर्वेदातही आहार, निद्रा व ब्रह्मचर्य हे तीन आरोग्याचे स्तंभ सांगितले आहेत. ‘आहार-निद्रा-भय-मैथुनं च सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम्।’ भारतीय तत्त्वज्ञानात आहार, निद्रा, भय आणि मैथुन या चार गोष्टी मनुष्य व पशूमध्ये सामान्य (कॉमन) आहेत असे सांगितले जाते. यावरून मनुष्याचे मूळ पशुत्वात आहे हे ध्यानात येते. त्यातला एक भय नावाचा स्तंभ काढून टाकला तर उरलेल्या तीन स्तंभांमुळे जीवन आरोग्यदायी व सुखकर होईल. वामनाने स्वतःचे तिसरे पाऊल बळीराजाच्या डोक्यावर ठेवून त्याला पाताळात गाडून टाकले व आम जनतेला भीतीमुक्त केले. विद्युतशक्तीच्या किंवा शक्तीच्या बरोबर असणाऱ्या चौथ्या पादाला न्यूट्रल असे म्हटले जाते. हा पाद जमिनीत गाडलेला असतो. हा पाद जमिनीत गाडलेला असल्यामुळेच विद्युतशक्तीबरोबर केलेले काम धोकारहित होऊ शकते व जीवनाचा आनंद घेता येतो.

तसेच आरोग्याचे तीन स्तंभ सांभाळत असताना चौथा भयरूपी पाद जर कायम जमिनीत गाडून टाकला तरच नित्य, अक्षय्य आरोग्यमय जीवन जगता येईल. चिंतासजीवाला चितेवर घेऊन जाते असे उगाच म्हटलेले नाही. चिंता सजिवाला जिवंतपणी जाळत राहते तर चिता मृत्यूनंतर. चिंता व भय यांच्यात काहीच फरक नाही. पण भय किंवा चिंता यांना जमिनीत न गाडता उलट जर या भावांनी व्याप्त असले तर जीवन आनंदमय न होता सरतेशेवटी जीवन भूमीत गाडण्याची वेळ येते.

मनुष्यमात्राच्या हलगर्जीपणाने तिन्ही खांबांना कीड लागली व हे तीन खांब आतून पोखरले गेले तर ते शरीररूपी इमारतीला केव्हा खाली पाडतील हे सांगता येतनाही. पण जरी हे तीन खांब मजबूत असले तरी इमारतीला धोका भयरूपी चौथ्या खांबाचा होतो. पहिला स्तंभ जो आहार तो केवळ उदरभरणापुरताच मर्यादित राहिला, फक्त चवीसाठी, आनंदासाठी खायचे, एवढीच आहारासंबंधी कल्पना ठेवली तर जीवनाचा कालावधी जगण्यासाठी वेगळाच आराखडा तयार होतो. तिसरा खांब असलेल्या मैथुनात विपर्यास केल्यामुळे एक तर लोकसंख्येचा विस्फोट होऊ शकतो किंवा बालके शारीरिक व मानसिक रोग घेऊन जन्माला येऊ शकतात. एवढ्या सगळ्यांची पोटे भरायची म्हणजे अन्नाचा आभास उत्पन्न करणे ओघानेच आले. उत्पन्न अधिकाधिक यावे या दृष्टीने तयार केलेल्या अन्नात मग कस नसतो, वीर्य नसते. असे अन्न केवळ पोटाची खळगी भरण्याच्या उपयोगाचे असते. आहाराच्या खांबाला पोखरणारा मोठा भुंगा म्हणजे जे मिळते आहे त्यावर समाधान मानून अन्न विषयुक्त व रोग उत्पन्न करणारे असले तरी त्याचाच आहारात समावेश करणे. आधुनिक जीवनात आहारशास्त्राविषयी चुकीचे मार्गदर्शन केले जात आहे. योग्य आहार घ्यावा असे एखाद्याला वाटले तरी योग्य म्हणजे काय हे चुकीच्या शास्त्राने ठरविले जात असल्याने आहाराचा संपूर्ण खांब, पर्यायाने संपूर्ण शरीर पोखरले जाऊ शकते.

ब्रह्मचर्य याचा अर्थ सर्व मनुष्यमात्रात, प्राणिमात्रात व्यापून राहिलेले सर्वव्यापी ब्रह्म समजून घेऊन, त्याचा आदर करून त्याच्याप्रती समत्वभाव ठेवून वागणे. तूर्त जरी हा अर्थ बाजूला ठेवला, ब्रह्मचर्य याचा अर्थ मैथुनापुरता मर्यादित केला तरी रात्रंदिवस उत्तेजना व त्या उत्तेजनेसाठी लागणारा शारीरिक उन्माद एवढेच जगण्याचे ध्येय असे ठरविले तर कीड ह्या दुसऱ्या खांबालाही पोखरू शकते. डोंगर फोडणाऱ्या जेसीबीसारख्या मोठ्या यंत्रांची जाहिरात करायची असली तरी याच्याशी काडीमात्र संबंध नसणारी, तोकडे कपडे घातलेली अर्धनग्न स्त्री चित्रात दाखविल्याशिवाय जाहिरात पूर्ण होत नाही. खेळाडूंना चेतना आणण्यासाठी व त्यांना हुरूप यावा या दृष्टीने स्त्री-पुरुषांच्या हुंदड नृत्याचीच योजना केलेली दिसते. अशा रीतीने आज हा तिसरा खांब पोखरला जात आहे असे मोठ्या प्रमाणावर आढळते. साधारणतः या दोन खांबांना कीड लागली तर तिसऱ्या खांबाला कीड लागणे अगदी सोपे असते. वरच्या दोन्ही खांबातील कीड तिसऱ्या निद्रारूपी खांबाला लागून मनुष्यमात्राची झोप उडणे साहजिकच ठरते. शिवाय चौथ्या खांबाची योजना व व्यवस्थापन लक्षात घेतले नाही, म्हणजे भीती घालविण्यासाठी आत्मविश्वास व श्रद्धा जोपासली नाही, भीतिरूपी चौथ्या खांबाला जमिनीत गाडले नाही तर तो थडग्यातून वर आलेल्या पिशाच्चासारखा चिंता व भीती उत्पन्न करून निद्रा तर येऊ देत नाहीच, पण या खांबालाही कीड लागते. गुढीपाडव्याच्या दिवशी चांगले आरोग्य जगण्याचा संकल्प करायचा राहून गेले असल्यास संकल्प करण्यासाठी अक्षय्यतृतीयेचा मुहूर्तही मोठा व चांगला आहे.

आरोग्यासाठी आहार, ब्रह्मचर्य, निद्रा या तीन जीवनविभागांवर खास काम करण्याचा संकल्प करायला पाहिजे. सत्त्व, वीर्य, रसयुक्त व स्वतःच्या प्रकृतीला अनुकूल असणारे, प्रेमाने तयार केलेले, ऋतुमानाला अनुकूल अन्न मोजक्या प्रमाणात सेवन करणे, ब्रह्मचर्य व त्याच्याशी संबंधित असलेले मैथुन यामुळे आनंदाची परिसीमा गाठता येईल व कुठल्याही प्रकारे शारीरिक शक्तीचा ऱ्हास होणार नाही, यासाठी मैथुनाचा अतिरेक टाळून ह्या अद्वितीय निसर्गशक्तीच्या कामरूपी सरितेला धरण बांधून जर शक्ती व्यवस्थित वापरली व त्या शक्तीचा व सिद्धीचा सर्वांच्या सुखासाठी वापर केला तर ब्रह्मचर्याचा खांब मजबूत होऊ शकतो. कुठलीही क्रिया न करायला लावता किंवा संपूर्ण जीवनशक्ती व बुद्धी वगैरे सर्व संकल्पना ज्यात पुनर्निर्मित व प्रेरणा घेऊन पुन्हा उठतील अशी संपूर्ण परावलंबनमुक्त निद्रा सर्वांना मिळू शकते. निरोगी शरीर व ब्रह्मचर्य भीतीला कुठेच जागा देत नाही. अशा व्यक्तीला शांत झोप म्हणजेच परमेश्वराचा आशीर्वाद साहजिकच मिळतो. तेव्हा असे हे अक्षय्य आरोग्याचे तीन स्तंभ जीवन सुखकर करतील, यात काही शंका नाही.

(श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांच्या विपुल लेखनातून संकलित)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com