मूळव्याध ! Hemorrhoids | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मूळव्याध !
मूळव्याध !

मूळव्याध !

- डॉ. अनिल गांधी (पुणे), M.S. , FICS , FIAP., FACG (USA)

मूळव्याध किंवा त्याअनुषंगाने होणाऱ्या त्रासावर खुलेपणाने चर्चा करणे आपण टाळतो, अथवा याबद्दल बोलण्याचा अनेकांना संकोच वाटतो. परंतु हा आजार अनेक जणांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसत असल्याने आपण त्याची पूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे.

गुद्‌द्वारातून रक्त येणे किंवा तेथे दुखणे अशी लक्षणे असतील तर आपल्याला मूळव्याध झाला असा सर्वसाधारण माणसांचा समज असतो. पण आधुनिक वैद्यकीय ज्ञानानुसार गुद्‌द्वारातून रक्त येणे किंवा तेथे वेदना होणे अशी लक्षणे अनेक प्रकारच्या व्याधीत आढळतात असे दिसून येते. यात फिशर, पाईल्स (हिमऱ्हॉइड्स), फिस्च्युला, रेक्टल पॉलिप, म्युकोजल प्रोलॅप्स, रेक्टल प्रोलॅप्स, रेक्टल ट्यूमर्स-बिनाईन (नॉन कॅन्सरस) आणि कॅन्सरस अशा अनेक व्याधींमधे असे दुखणे किंवा गुदद्वारातून रक्त येणे ही लक्षणे असू शकतात. या सर्व व्याधी शस्त्रक्रियेने बऱ्या होऊ शकतात. पण या सर्व व्याधींना रुग्ण फक्त मूळव्याध असेच संबोधतात. अर्थात यांपैकी एका व्याधीचे ऑपरेशन केले तर ती बरी होते पण भविष्यात या संचांपैकी दुसरी व्याधी झाली तर रुग्णाच्या लेखी मूळव्याध परत झाला आहे असाच गैरसमज होतो. म्हणजेच ऑपरेशन करूनही मूळव्याध परत होतो या गैरसमजास खतपाणी मिळते. गम्मत अशी की अ‍ॅपेंडीसायटीस मुळे पोट दुखल्यास ऑॅपरेशन करून हा आजार बरा होतो. त्यानंतर इतर अनेक कारणांनी पोट दुखू शकते. उदा. मूत्रमार्गातील खडा, पित्ताशयातील खडा, अल्सर, पॅन्क्रियाटायटीस व इतर अनेक कारणांनी पोट दुखले तर अ‍ॅपेंडीक्सच्या ऑपरेशनचा उपयोग झाला नाही असे मात्र रुग्णांना वाटत नाही. फिशर, पाईल्स, प्रोलॅप्स, फिस्च्युला असे गुरुद्वाराशी होणारे आजार सामान्यपणे बद्धकोष्ठतेमुळे (कॉन्स्टीपेशन) होतात असे म्हणणे इष्ट होईल. हे सर्व आजार काही कुटुंबात अनेक पिढ्यांमध्ये आढळले तरी ते ते आनुवंशिक आजार नसतात. पण अशा कुटुंबातील जेवणा-खाण्याचा सवयींमुळे असू शकतात. ज्या कुटुंबात पालेभाज्या, गाजर, फळे आणि इतर तंतुमय पदार्थ कमी प्रमाणात खाण्यात येतात अशा व्यक्तींना हे सर्व आजार होण्याची शक्यता जास्त असते हे मात्र खरे. जे लोक नॉनव्हेज खातात त्यांच्यात असे आजार बद्धकोष्ठतेमुळे जास्त प्रमाणात आढळतात. पण त्याचा संबंध नॉनव्हेज खाण्याशी नसून अशा लोकांच्या आहारात पालेभाज्या, गाजर अशा तंतुमय पदार्थांची कमतरता हे असते. या व्याधी संचामधील एकेक आजाराविषयी थोडक्यात माहिती देणे इष्ट होईल.

फिशर : बद्धकोष्ठतेमुळे संडासला खडा होणे व त्यामुळे जोर करावा लागणे (कण्हणे, कुंथणे) ओघानेच येते. अशा वेळी गुदद्वाराची (एनस) त्वचा ताणल्याने आणि खरवडल्याने तेथे जखम होते. कुठलीही जखम बरी होण्यासाठी त्या भागाला विश्रांतीची गरज असते. पण या त्वचेखालच्या संडासवर नियंत्रण ठेवणाऱ्या स्नायूंची (स्फिंगटर) सतत गॅस (पाद) निघताना व संडासचे वेळी स्नायू आकुंचन प्रसरण होत असल्याने फिशरच्या जखमेच्या कडा दोन्ही बाजूस ताणल्या जातात. त्यामुळे ही जखम सहजी बरी होत नाही. या भागातील त्वचा खूपच संवेदनशील (सेन्सीटिव्ह) असल्यामुळे ही जखम वेदनादायक असते. त्यातून अनेक वेळा कमी अधिक प्रमाणात रक्तही येते. विशेषतः संडास करते वेळीही वेदना होणे व रक्त येणे हा त्रास होतो. जेव्हा ही जखम दीर्घ काळ असते तेव्हा या जखमेच्या वर एक रेक्टल पॉलिप वाढतो तसेच बाहेरील भागाच्या त्वचेवरही एक मोडासारखी वाढ होते. छोट्याश्या शस्त्रक्रियेने फिशर पूर्णपणे बरे होऊ शकते. ऑपरेशन केल्याच्या क्षणापासून वेदना खूप कमी झाल्याने आपण सर्जरी खूप आधी केली असती तर बराच त्रास वाचला असता अशी भावना अनेक रुग्ण ऑपरेशन नंतर व्यक्त करताना आढळतात. वेळेत सर्जरी केली नाही तर या जखमेतून विष्ठेमधील सूक्ष्म जंतू प्रवेश करून तेथे गळू (अ‍ॅब्सेस) होण्याची शक्यता असते. हे गळू बाहेरच्या त्वचेतून आणि गुदाशयाच्या आतील बाजूस फुटून जो ट्रॅक तयार होतो त्या भगेंद्र (फिस्च्युला) म्हणतात. हा वेदनादायक असतो. त्यासाठी फिशरच्या मानाने जास्त मोठी शस्त्रक्रिया करावी लागते. जखम भरून येण्यासही दीर्घकाळ लागतो. फिशरच्या रुग्णांमधे असे भगेंद्र होण्याची शक्यता साधारणपणे चार टक्के रुग्णांमधे आढळते.

मूळव्याध (पाइल्स) : शास्त्रीय भाषेत याला हिमऱ्हॉइड्स असे संबोधले जाते. त्यात प्रामुख्याने इन्टर्नल हिमऱ्हॉइड्स आणि काही रुग्णांत एक्सर्टनल हिमऱ्हॉइड्स आढळतात. गुदद्वाराच्या नीला (व्हेन्स) जेव्हा फुगतात (व्हेरिकॉसिटी) तेव्हा त्यांना हिमऱ्हॉइड्स म्हटले जाते. त्या गुदाशयाच्या शेवटच्या भागात अंतत्वचेच्या (म्युकोजा) खाली असतात. या व्याधीच्या चार पायऱ्या (स्टेजेस) असतात. पहिल्यात संडासच्या वेळी फक्त रक्त येते. दुसऱ्या पायरीत संडासच्या वेळी हिमऱ्हॉइड्स बाहेर डोकावतात व रक्त पडते मात्र वेदना होत नाहीत. संडास झाल्यावर कोंब आपोआप परत आत जातात. तिसऱ्या पायरीवर मात्र कोंब हाताने आत ढकलावे लागतात.

चौथ्या पायरीवर मात्र त्या खूप सुजलेल्या असतात, ढकलूनही परत आत जात नाहीत आणि खूप वेदनादायकही असतात. पहिल्या दोन पायऱ्यांवर त्यांच्याभोवती म्युकोजाखाली इंजेक्शनचा उपयोग होतो. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या पायरीवरच्या हिमऱ्हॉइड्ससाठी ऑपरेशन करणे गरजेचे असते.

फिशर असो, हिमऱ्हॉइड्स किंवा गुदद्वाराचे इतर आजार, जरूर असेल तेव्हा शस्त्रक्रियेने ते बरे होतात आणि तोच आजार परत होण्याची शक्यता जवळ जवळ नसते. तरीही रुग्णाने आहारात पालेभाज्या, गाजर आणि फळांचा मुबलक समावेश केला तर त्याला या भागात होणाऱ्या इतर व्याधी दूर ठेवता येतील. तसेच त्याच्या कुटुंबातील लोकांनाही अशा आहाराने या व्याधी होण्यापासून दूर ठेवता येईल.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :article
loading image
go to top