माहात्म्य तुळशीचे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tulasi

फुप्फुसे, हृदय, रक्ताभिसरणाशी संबंधित असलेली अनेक औषधे तुळशीचा रस व मधाच्या अनुपानाबरोबर घ्यायला सांगितलेली असतात.

माहात्म्य तुळशीचे!

फुप्फुसे, हृदय, रक्ताभिसरणाशी संबंधित असलेली अनेक औषधे तुळशीचा रस व मधाच्या अनुपानाबरोबर घ्यायला सांगितलेली असतात. तुळशी अंगणात लावल्यावर दुष्ट शक्ती घरात येत नाहीत, या पारंपरिक विचारधारेचा पडताळा पाहण्यासाठी तुळशीच्या झाडातून उत्सर्जित होणाऱ्या वायूंबद्दल विचारणा केल्यावर तुळशीतून ओझोन खूप प्रमाणात बाहेर पडतो असे कळले. विषद्रव्य ओढून बाजूला करण्याचे व वातावरणाची शुद्धी करण्याचे काम तुळशी करते असे लक्षात आले.

वनस्पतींमध्ये जीव असतो, त्यांच्यावर वातावरणाचा परिणाम होत असतो हे सिद्ध होण्यासाठी १९०१ साल उजाडावे लागले. योगायोगाने जगदीशचंद्र बोस या भारतीय शास्त्रज्ञांनी त्यावेळेला प्रयोगाच्या आधारे ही कल्पना जगासमोर मांडली. मात्र भारतीय संस्कृतीमध्ये, भारतीय परंपरेमध्ये वनस्पतींना भावना असतात, त्या आपल्या घरातील सदस्याप्रमाणे असतात, इतकेच नाही तर प्रत्यक्ष परमेश्र्वराशी ज्यांचे नाते जुळू शकते अशा उच्च स्थानी असतात हा विचार रुजवण्यासाठी तुळशी विवाह ही परंपरा रुढ झाली असावी. महाभारतात एक कथा आहे, एकदा असे ठरले की श्रीकृष्णांच्या वजनाएवढी सोने-नाणे-रत्ने वाटली वा दान केली तरच एका ऋणातून श्रीकृष्ण मुक्त होतील. तराजूच्या एका पारड्यात श्रीकृष्णांना बसविले व दुसऱ्या पारड्यात राजवाड्यातील सर्व संपत्ती आणून टाकली पण एक तसूभरही पारडे व गेले नाही. मग राण्यांनी स्वतःच्या अंगावरचे दागिनेही टाकले पण श्रीकृष्णांचे पारडे उचलले गेले नाही. सर्वजण चिंताग्रस्त झाले. मग कुणीतरी सुचविले की तुळशी श्रीकृष्णांना प्रिय आहे तेव्हा तुळशीचे पान रत्नांच्या पारड्यात टाकावे. आश्र्चर्य म्हणजे, तुळशीचे पान रत्नसंपदेच्या पारड्यात टाकल्याबरेबर श्रीकृष्णांचा पारडे वर गेले व तुला पूर्ण झाली. शेवटी एक अपरिहार्यता म्हणून दिलेली संपत्ती व त्याच्या बदल्यात प्रेमाने दिलेली एक छोटीशी भेट यांची तुलना करता प्रेमाने दिलेली भेट अधिक श्रेष्ठ ठरते. नुसते प्रेमाचे महत्त्व सांगण्यासाठी ही कथा सांगितली जात नाही तर तुळशीच्या पानात असलेल्या गुणांचे महत्त्व कळावे ह्यादृष्टीने या प्रसंगाची योजना केलेली आहे.

अनेक गुणांनी युक्त तुळशी प्रत्येकाच्या घरी मागच्या व पुढच्या दारी असावी म्हणजे त्या घरात दुष्ट शक्तींचा प्रवेश होत नाही. या सर्व कथा ऐकल्यावर मनात असा एक विचार आला की तुळशीत सोने खरोखरच असते का? की तिचे महत्त्व सोन्याइतके आहे असे समजले गेले. तुळशीच्या पानांमधील सोने काढणे तर खूप अवघड गोष्ट असावी. पण हेही तितकेच खरे आहे की शाळिग्राम शिलेवर सुवर्णाची कसोटी लागते. शाळिग्राम शिलेवर तुळशी वाहण्याचा नेमका प्रघात भारतीय परंपरेत सापडतो. पोटात दिलेले सुवर्ण अन्नासाररखे काम न करता, अन्नाचे रूपांतर शक्तीत करण्यासाठी एका मध्यस्थासारखे (कॅटलिस्टसारखे) काम करते. सुवर्णामुळे प्राणशक्ती अधिक आकर्षित होते.

सूर्यप्रकाशातील शक्तीचे विद्युतशक्तीत परिवर्तन करण्यासाठी सुरुवातीला झालेल्या प्रयोगात सोने चढविलेला पत्राच वापरला होता. भारतीय परंपरेत तर मंदिराच्या कळसातच नव्हे तर मंदिराच्या पायापासून कळसापर्यंत, काही ठिकाणी तर देवाच्या मूर्तीवरही सोन्याचा लेप चढवितात. लंकेतील व द्वारकेतील घराघरांवर सोन्याचे पत्र होते असे म्हणतात. हे घरांवरचे पत्रे म्हणजे सूर्यशक्ती ओढून घेणारे पॅनेल्स अशी दाट शक्यता आहे. सुवर्ण साधारणतः धातू रूपात उपलब्ध असते त्याऐवजी तुळशीमधील वनस्पतीज सोने असावे. धातूरूपातील सुवर्णापेक्षा वनस्पतीज सोने अधिक प्रभावी असावे, त्यामुळे प्राणशक्ती आकर्षित करणारी, शरीरातील रक्ताभिसरण वाढविणारी, हृदयाला बल्य असणारी, फुप्फुसांमधील कफदोष कमी करून त्या ठिकाणी रक्त शुद्ध करण्याची प्रक्रिया वाढविणारी तुळशी महत्त्वाची ठरते.

तुळशीच्या बुंध्याभोवतीची साधी काळी माती विषारी माशी, किडा वगैरे चावल्यास लावली तर उपयोग होतो. तुळशीचा रस मधाबरोबर दिल्यास सर्दी पडश्‍यावर उत्तम इलाज आहे. फुप्फुसे, हृदय, रक्ताभिसरणाशी संबंधित असलेली अनेक औषधे तुळशीचा रस व मधाच्या अनुपानाबरोबर घ्यायला सांगितलेली असतात. तुळशी अंगणात लावल्यावर दुष्ट शक्ती घरात येत नाहीत, या पारंपिरक विचारधारेचा पडताळा पाहण्यासाठी तुळशीच्या झाडातून उत्सर्जित होणाऱ्या वायूंबद्दल विचारणा केल्यावर तुळशीतून ओझोन खूप प्रमाणात बाहेर पडतो असे कळले. विषद्रव्य ओढून बाजूला करण्याचे व वातावरणाची शुद्धी करण्याचे काम तुळशी करते असे लक्षात आले. दोन मीटर द दोन मीटर जागेच्या चारही बाजूला तुळशीची रोपे लावून आतल्या मोकळ्या जागेत हृदयाच्या वा श्र्वसनाच्या तक्रारी असलेल्या रोग्याला रोज नियमाने बसविल्यास त्यांच्या प्रकृतीत सुधारणा आढळते. म्हणूनच तुळशी असलेल्या ठिकाणी दुष्ट शक्तींचा (व्हायरसचा) वास नसतो असे म्हटले जाते.

देवाला वाहिलेल्या फुलांचे निर्माल्य होते पण देवाला तुळशी वाहिल्यास तिचे निर्माल्य होत नाही अशी एक पारंपरिक समजूत ऐकिवात होती त्याचा पडताळा पाहण्यासाठी मी एक प्रयोग करण्याचे ठरविले व पानाच्या खाली व वर असे दोन्ही बाजूला विद्युत प्रोब जोडले व स्किन रेझिटन्स मोजण्यासाठी असलेले यंत्र घेऊन वेगवेगळ्या झाडांवर प्रयोग केले व आलेख काढले. इतर वनस्पतींच्या बाबतीत प्रयोग चालू असताना आलेखावरून झाड जिवंत आहे असे कळत असे परंतु ज्या पानावर प्रयोग चालू आहे त्या पानाची फांदी झाडापासून कापल्यावर लगेचच पानात प्राणशक्ती नाही असे आलेखावरून कळत असे. म्हणजे झाडापासून वेगळ्या केलेल्या पानातील प्राणशक्ती लगेचच नष्ट होते.

पण असाच प्रयोग तुळशीच्या रोपांवर केल्यावर असे आढळून आले की तुळशीची फांदी झाडापासून कापल्यावरसुद्धा त्याच्या प्राणशक्तीच्या आलेखात कुठलाही बदल होत नाही, पान व फांदी जिवंत असल्याचा पुरावा आलेखाद्वारे रेखांकित होत राहतो. एकांतात ठेवलेल्या तुळशीच्या झाडाला त्या ठिकाणी अचानक प्रवेश केलेल्या व्यक्तीबद्दलची नोंद घेता येत असे, म्हणजेच आलेखाच्या नोंदीत फरक व सातत्य दिसत असे. तसेच संगीताचा परिणामही सुस्पष्ट दिसत असे. तुळशीची उपयुक्तता लक्षात घेऊन कार्तिक महिन्यात एकादशीपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत श्रीकृष्ण व तुळसी यांचे लग्न लावण्याची पद्धत रूढ आहे. कृष्ण ही आकर्षणाची देवता आहे. प्रथम म्हटल्याप्रमाणे रक्ताभिसरण व तुळशी या दोन गोष्टी एकत्र आल्या की रक्ताची शुद्धी होतेच व रक्ताभिसरणालाही मदत होते. आयुर्वेदात तुळशीचे माहात्म्य खूपच मोठे आहे.

तुळशी सूर्यप्रकाशातील सर्व शक्ती अधिक ओढते म्हणून जास्त सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी तुळशी अधिक काळपट होते. अशी तुळस अधिक शक्तिशाली मानली जाते. प्रयोगाखातर कृष्णतुळशीचे रोप थंड प्रदेशात लावल्यानंतर काही दिवसांनी तिचा रंग बदलून हिरवी झाली. अजून काही दिवसांनंतर पाने रुंद, पसरट व मऊ झाली. त्यामुळे तुळस, रानतुळस, बेसिल ही सर्व एकाच कुटुंबातील भावंडे म्हणायला हरकत नाही. ऋतुमानाप्रमाणे किंवा भौगोलिक परिस्थितीनुसार त्यात फरक झालेले दिसतात. जर्मनी, इटली किंवा इतर युरोपियन देशांमध्ये बेसिलचे चूर्ण सूप वगैरेंत वापरण्याची पद्धत रूढ आहे. अशी रीतीने परदेशातसुद्धा तुळशीचा आरोग्यासाठी उपयोग केला जातो.

कुठल्याही वस्तूवर तुळशीचे पान ठेवणे म्हणजे ती वस्तू अर्पण केली गेली आहे असे समजले जाते. म्हणजेच सर्व वनस्पतींमध्ये तुळशीची किंमत अधिक असल्यामुळे शेवटी तुळशीचे पान ठेवले तर इतर सर्व वस्तू तुच्छ ठरतात. म्हणून ‘घरादारावर तुळस ठेवणे’ असा वाक्प्रचार प्रचलित आहे. देवाला नैवेद्य अर्पण करत असताना अपवित्र शक्ती वा दुष्ट शक्ती अन्नाला लागू नयेत यादृष्टीने अन्नावर तुळशीचे पान ठेवण्याची पद्धत रूढ झालेली दिसते. बऱ्याच ठिकाणी मरणाच्या वेळी तोंडात गंगाजल सोडण्याची व तुळशीचे पान ठेवण्याची पद्धत दिसून येते तीही तुळशीत असलेल्या प्राणशक्तीमुळेच!! तेव्हा सर्व वनस्पतींवर प्रेम करून, त्यांना मानवी जीवनात मानाचे स्थान देण्याची आठवण करून देणारी, किंबहुना वनस्पतींना मनुष्याचा दर्जा देण्यातच माणसाची माणुसकी आहे हे अधोरेखित करणारी तुळशी विवाहाची प्रथा जपणे हे सर्वांचे कर्तव्य होय.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित.)