दूध हे पूर्णान्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Milk

पाऊस पडला नाही म्हणून महादेवाच्या मंदिराचा गाभारा पूर्णपणे दुधाने भरायचा असे सर्व गावकऱ्यांनी ठरविले व दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या आधी सर्वांनी एक एक लोटा दूध गाभाऱ्यात ओतायचे ठरले.

दूध हे पूर्णान्न

पाऊस पडला नाही म्हणून महादेवाच्या मंदिराचा गाभारा पूर्णपणे दुधाने भरायचा असे सर्व गावकऱ्यांनी ठरविले व दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या आधी सर्वांनी एक एक लोटा दूध गाभाऱ्यात ओतायचे ठरले. अशा प्रकारे महादेवाला संकटात टाकले की पाऊस येईल ही सर्वांची अपेक्षा होती. ठरलेल्या दिवशी पुजाऱ्याने दुधात बुडालेला महादेव दिसेल अशा अपेक्षेने सर्वांच्या उपस्थितीत पहाटे मंदिर उघडले तेव्हा दिसले की महादेव पाण्यात बुडालेला आहे, पूर्ण गाभारा पाण्याने भरलेला आहे. सर्व जण दूध टाकणार आहेतच, आपण एक लोटा पाणी टाकले तर फार काही बिघडणार नाही असा विचार सर्वांनी केला व सर्वांनीच एक एक लोटा पाणी टाकले.

एकूण काय तर दुधात पाणी टाकायचे वा पाण्यासारखे दूध प्यायचे ही सवय लोकांना फार पूर्वीपासून लागली असावी. दुधात बोट घालून वर काढल्यावर बोट पांढरे दिसावे म्हणजे बोटाला सर्व बाजूंनी दूध चिकटले तर ते दूध चांगले असते. साधारण दुधात ४-४.५ टक्के फॅट असली तर ते दूध चांगले मानले जाते. दुधाचे भाव तर वाढत राहिले आहेतच परंतु दुधातील फॅटचे प्रमाण कमी होत होत २ टक्क्यांवर आलेले आहे. त्यामुळे दूध तापवल्यावर त्यावर पातळ कागदासारखी साय येते असे दिसते. लोक असेच दूध सेवन करू लागल्याचे दिसते. अधिक प्रमाणात फॅट असलेले दूध प्रकृतीला अहितकर असते, कारण त्यामुळे शरीरातील चरबी वाढते असा सोईस्कर गैरसमज रूढ होऊ लागला.

दूध नसलेले पांढरे पाणी वा पावडर (नॉन डेअरी प्रॉडक्टस्‌) टाकून चहाला रंग आणण्याची शक्कल काही मंडळींनी शोधून काढली. प्रतिष्ठित पंचतारांकित हॉटेलमध्ये वा विमानप्रवासात असे नॉन डेअरी प्रॉडक्टस्‌ दिले जाऊ लागल्यावर काही मंडळींनी रसायने वापरूनच दूध बनविण्याचा प्रयत्न सुरू केला. या सर्वांमुळे चहाला पांढरा रंग येण्याआधी डोळे पांढरे होण्याची वेळ आली. अशी परिस्थिती आल्यावर मात्र लोकांचे डोळे उघडले. आणि सध्या ‘ए २’ म्हणून देशी गाईचं दूध घेण्यासाठी लोकांचा कल वाढू लागला आहे.

भारतीय संस्कृतीची परंपरा

खरेतर भारताला ‘गोकुळा’ची हजारो वर्षांची परंपरा आहे. वैदिक संस्कृतीत, वैदिक वाङ्मयात दूध, लोणी, तुपाचे अनेक ठिकाणी उल्लेख आहेत. पश्र्चिमेकडच्या देशातही चीज बनविण्याची हजारो वर्षांची परंपरा दिसून येते.

दुग्धं समधुरं स्निग्धं वातपित्तहरं सरम्‌ ।

सद्यः शुक्रकरं शीतं सात्म्यं सर्वशरीरिणाम्‌ ॥

...भावप्रकाश

दूध चवीला मधुर, गुणाने स्निग्ध व वातदोष-पित्तदोष कमी करणारे असते, सारक असते, शीत वीर्याचे असते, तत्काळ शुक्रधातूचे पोषण करते व शरीरासाठी अनुकूल असते.

ताज्या दुधाबाबत एक अडचण असते की काढल्यावर काही तासांच्या आत ते तापवावे लागते, अन्यथा ते नासते. त्यामुळे पहाटे उठून गाई-म्हशींचे दूध काढायचे व गिऱ्हाइकांना पुरवायचा हा एक मोठा द्राविडीप्राणायाम असतो. पूर्वी ताजे दूध बाटल्यातून येत असे तेव्हा सकाळी लवकर उठून दूध केंद्रांवरून दूध आणून लगेच तापवणे हे एक नित्याचे काम असे. कपडे धुवायला मशिन, कणीक मळायला मशिन, जिना चढायला लिफ्ट अशा सर्व सुविधा उपलब्ध झाल्या तसतसे लोकांना सकाळी उठून दूध आणायला जाणे अवघड होऊ लागले.

शहरांची अतोनात वाढ झाल्यामुळे गाई-म्हशी राहत्या वस्तीपासून दूरवर गेल्या, पर्यायाने दूध-दुभतेही माणसापासून दूर गेले. त्यामुळे दूध अधिक कसे टिकेल याचा प्रयत्न होऊ लागला आणि महिनोन्‌ महिने न तापवता टिकणारे दूध खोक्यात मिळू लागले. परंतु हे दूध सेवन केल्यावर महिनोन्‌ महिने न पचता पोटात राहू लागले. कच्च्या दुधावरचे क्रीम काढून घेऊन त्यापासून पुढे सर्व पदार्थ बनवून सामान्यांना उपलब्ध करून देणे हा व्यवसाय सुरू झाला. दुधाचा महापूर आल्यासारखे वाटले तरी सामान्यांना खरे दूध-दुभते दुर्मिळ झाले. उपलब्ध असलेल्या दुधाचा शरीराला काडीमात्र उपयोग राहिला नाही. दुधात प्राणिज अन्झाईम्स असल्याने दूध वाळवणे खूप अवघड असते. पण काही विशिष्ट पद्धतीने दुधाची पावडर बनवणे सुरू झाले. या दुधाच्या पावडरपासून बनविलेले दूध पचणे अवघड असते.

आरोग्यावर परिणाम

दूध तापवून वेगळ्या केलेल्या सायीला विरजण लावून बनविलेले दही घुसळून लोणी व त्यापासून तूप बनविणे ही खरी लोणी व तूप बनविण्याची भारतीय पारंपरिक पद्धत आहे. दही बनविण्यासाठी वापरलेला संस्कार म्हणजे विरजण प्राणिज बॅक्टेरिया असलेले असणे आवश्‍यक असते. दूध-तुपाची शुद्ध, सेंद्रिय, साजूक वगैरे विशेषणे लावून जाहिरात करणे सोपे असते, परंतु खरोखरच पारंपरिक पद्धतीने तूप बनवणे, गाईला कोणताही अनैसर्गिक संप्ररके वगैरे न देता दूध मिळवणे खूप अवघड असते. सोईच्या दृष्टीने किंवा अधिक नफा मिळवण्याच्या दृष्टीने गुरांना भलतेच खाद्य देणे, नंतर दूध थोडेसे तापवून क्रीम काढून घेणे, त्या क्रीमवर प्रक्रिया करून लोणी-तूप वगैरे बनविणे हेच मुळात चुकीचे व अशुद्ध म्हणावे लागेल.

या सर्व क्रिया रासायनिक पद्धतीने सुरू झाल्या ज्यामुळे सर्व प्रक्रिया चटकन होऊ लागल्या व त्यापासून बनविलेल्या लोणी-तुपाचे दुर्गुणही लक्षात येईनासे झाले. मात्र असे पदार्थ सेवन केल्यावर त्याचे दुष्परिणाम होणे अटळ होते. दूध-दुभते न मिळाल्यामुळे माणसाला आरोग्य पारखे झालेच, परंतु त्याचबरोबर चुकीचे दूध-दुभते सेवन केल्यामुळे अनेक प्रकारचे रोग दिसू लागले. खाल्लेल्या अन्नाचे शक्तीत रूपांतर होईपर्यंत जी सप्तधातूंची वाढ होणे अपेक्षित असते ती वाढ न होता असंतुलन होऊन रोग वाढीला लागले. रोगांची लक्षणे दूर होतील अशी औषधे शोधली गेली, परंतु रोग आटोक्यात येईनासे झाले.

भारतीय परंपरेत दुधाला पूर्णान्न समजले जाते. पहिले सहा महिने मातेचं स्तन्य हे जसं अमृतोपम असते आणि त्याची सर दुसऱ्या आकाशालाही येऊ शकत नाही, तसे नंतर गाईच्या किंवा म्हशीच्या दुधाला कोणताही पर्याय नसतो. दूध दिवसा पिणे चांगले असते. रात्री दूध प्यायचे असले तर इतर जेवण वर्ज्य करून नुसतेच दूध प्यावे असे आयुर्वेदात सांगितलेले आहे.

थोडक्यात देशी गाईचे किंवा म्हशीचे प्रक्रिया न केलेले चांगले दूध घराघरांत आले तर घरातील प्रत्येकाचे आरोग्य उत्तम राहील, दुधापासून बनविलेले ताक, लोणी व तूप या गोष्टी सुद्धा आरोग्याला हातभारच लावतील.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित.)

टॅग्स :articleMilkFamily Doctor