सुखी जीवनाचा मार्ग... | Way to a Happy Life | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Happy Life
सुखी जीवनाचा मार्ग...

सुखी जीवनाचा मार्ग...

संसाराच्या पसाऱ्यात जणू काही सर्व जबाबदारी माझ्यावरच आहे, मीच सर्व गोष्टी करणारा आहे, सर्व काही माझ्या मनासारखेच व्हायला पाहिजे, ही भावना मनुष्याच्या मनात एकदा का बळावली की मनासारखे झाले नाही की क्रोध उत्पन्न होतो, क्रोधातून मोह, मोहातून स्मृतिविभ्रम, त्यातून बुद्धिनाश आणि सरते शेवटी संपूर्ण विनाश होतो. अर्थात, मुळात मिळालेल्या विशेष सिद्धींमध्ये अडथळा उत्पन्न होतो आणि मनुष्य मनुष्यत्वापासून, स्वधर्मापासून दूर जाऊ लागतो.

श्रीमद्‌भगवद्‌गीता हा सुखी जीवनासाठी आवश्यक अशा सर्व प्रकारच्या मार्गदर्शनाचा अमूल्य ठेवा होय. संपूर्ण विश्र्वात समत्व राखण्यासाठी प्रत्यक्ष परमपुरुष परमात्मा श्रीकृष्णांनी सांगितलेले गेयरूपातील ज्ञान म्हणजे श्रीमद्‌भगवद्‌गीता. वेदवाङ्मय असो किंवा भगवद्‌गीता, गेय व संगीयमय असण्यामागचे कारण असे की संगीतात स्पंदनांमार्फत, नादलहरींमार्फत संकल्पना सरळ आत पोचण्यासाठी क्षमता असते. वेद-उपनिषदांतील ज्ञानाचे सार असणारी भगवद्‌गीता संगीतबद्ध करून गायली किंवा ऐकली तर खूप फायदा होऊ शकतो. जीवन सुखी असायला हवे असेल तर त्यासाठी संतुलन महत्त्वाचे होय. आयुर्वेदात ‘समदोषः समाग्निश्र्च समधातु मलक्रियाः’ असे सांगितलेले आहे. म्हणजे वात-पित्त- कफ हे दोष समत्वामध्ये, जाठराग्नीपासून धात्वग्नींपर्यंतचे सर्व अग्नी समत्वामध्ये, मलमूत्रादी मल समत्वामध्ये असणे आवश्‍यक आहेत, पण त्याहीपलीकडे जाऊन आत्मा, इंद्रिये, मन हे सुद्धा समत्वात असावीत असे सांगितले आहे. एखादा मनुष्य सज्जन असला पण त्याला एखादा आजार असला किंवा एखादा मनुष्य धष्टपुष्ट, ताकदवान असला पण डोक्याने तिरकस असला तर त्याचेही आरोग्य चांगले आहे असे म्हणता येणार नाही. शरीर, इंद्रियव्यापार, कर्म करण्याची शक्ती, विश्र्वातून आनंद घेण्याची शक्ती, समाजातील इतरांबरोबर नांदण्याची शक्ती, विश्र्व पुढे चालू राहावे म्हणून प्रजोत्पादनाची शक्ती या सर्व गोष्टी समत्वात असल्या पाहिजेत. म्हणूनच श्रीमद्‌भगवद्‌गीतेतही म्हटले आहे, ''समत्वं योग उच्यते'' ! ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ या न्यायाप्रमाणे व्यक्तीच्या जीवनात संतुलन हवे, तसेच ते ब्रह्मांडातही हवे. जोपर्यंत संपूर्ण ब्रह्मांडामध्ये फिरणारे ग्रह, नक्षत्र, तारे आपापल्या कक्षेत, आपापल्या आसाभोवती नियमात फिरत राहतात व त्या सर्वांचे मिळून एक संतुलन असते तोपर्यंत सर्व सुंदर असते, तोपर्यंत विश्र्वाचे आरोग्य उत्तम राहते असे म्हणायला हरकत नाही.

एखादा बारीकसा ग्रह कक्षेच्या बाहेर गेला तर मोठा अनर्थ ओढवू शकतो व भीती उत्पन्न करतो. मनुष्य आणि निसर्ग यांच्यातही संतुलन असावे लागते. ऋतुचक्र सुरळीत राहण्यासाठी, वेळेवर पाऊस, वेळेवर थंडी, योग्य तेवढी गर्मी या सगळ्या गोष्टी संतुलनावरच अवलंबून असतात. आहार, निद्रा, भय आणि मैथुन हे चार भाव सर्व प्राणिमात्रांना लागू असतात. या चार गोष्टी नीट सांभाळल्या तर प्राणी ज्याप्रमाणे आयुष्य जगतात, त्याप्रमाणे मनुष्यही जगू शकतो, संसार करू शकतो. परंतु मनुष्याला या चार गोष्टींपलीकडे एक महत्त्वाची गोष्ट मिळालेली आहे ती म्हणजे प्रगत मेंदू. विश्र्व समजून घेता यावे यासाठी मनुष्याला मन, बुद्धी, अहंकार या गोष्टी मिळालेल्या आहेत. तसेच चैतन्याचे भान राहण्यासाठी, चैतन्याशी संबंध जोडून पूर्णत्वाकडे व समाधानाकडे जाण्यासाठी त्याला वेगळी शक्ती, वेगळी जाणीवही मिळालेली आहे.

श्रीमद्‌भगवद्‌गीतेत या शक्तीला प्राप्त करण्याचाही मार्ग दाखवला आहे. श्रीमद्‌भगवद्‌गीतेच्या सुरुवातीला सांगितले आहे, ‘दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम्‌’ म्हणजे मनुष्यमात्राच्या भोवती उत्पन्न झालेला किंवा त्यानेच उत्पन्न केलेला सर्व पसारा, मग तो घरादाराचा असेल, जमीनजुमल्याचा असेल, पैशाअडक्याचा असेल, नात्यागोत्यांचा असेल, व्यवसाय नोकरीचा असेल, माझा (स्वजनं - ममत्व भाव) आहे असे मनुष्य मानतो. मनुष्याचे सर्व काही स्वतःभोवती फिरत असते. मात्र यातच सर्व आजारांचे मूळ असलेले दिसते. संसाराच्या या पसाऱ्यात जणू काही सर्व जबाबदारी माझ्यावरच आहे, मीच सर्व गोष्टी करणारा आहे, सर्व काही माझ्या मनासारखेच व्हायला पाहिजे ही भावना मनुष्याच्या मनात एकदा का बळावली की मनासारखे झाले नाही की क्रोध उत्पन्न होतो, क्रोधातून मोह, मोहातून स्मृतिविभ्रम, त्यातून बुद्धिनाश आणि सरते शेवटी संपूर्ण विनाश होतो. अर्थात मुळात मिळालेल्या विशेष सिद्धींमध्ये अडथळा उत्पन्न होतो आणि मनुष्य मनुष्यत्वापासून, स्वधर्मापासून दूर जाऊ लागतो.

श्रीमद्‌भगवद्‌गीता सांगते, ‘ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्‌ माम्‌ अनुस्मरन्‌ । यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम्‌’ ॥८-१३।। ‘माझे सर्व सांगणे मी ॐ या एका अक्षरात सांगितले. त्याच्याशी समरस होऊन ॐकार गावा’. फक्त मी- माझे- मला या अहंभावात न गुरफटता परमेश्र्वर काय म्हणतो आहे हे समजून घ्यावे, परमेश्र्वराची विश्र्वाबद्दल काय कल्पना आहे हे समजून घेऊन आतल्या स्वशी संभाषणात, संवादात राहणारी प्रज्ञा जागृत करण्याचा किंवा त्या प्रज्ञेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा असे श्रीमद्भगवद्गीतेत सांगितलेले आहे. भौतिक व भौतिकाच्या पलीकडे असलेले अस्तित्व यांचे समत्व साधून जीवन आनंदी करण्याचा, आरोग्यवान करण्याचा संदेश श्रीमद्भगवद्गीतेत दिलेला आहे.

भगवंत म्हणतात, ‘अहं वैश्र्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः’ म्हणजे अन्न पचविण्याचे काम मी स्वतः करतो, निदान त्यात तरी ढवळाढवळ करू नका. पचन ही शरीरात निसर्गतः आलेली शक्ती आहे, त्यात चुकीचे खाऊन अडथळा आणू नका, नैसर्गिक राहा, स्वतःच्या प्रकृतीला मानवेल तेच आणि तेवढ्या प्रमाणातच खा, योग्य वेळी व पुरेसे झोपा, इंद्रियांवर संयम ठेवा. एकदा का हे समत्व साधता आले की जीवनात आरोग्य, सुख-समाधान, मनःशक्ती या सगळ्याच गोष्टींचा आनंद घेता येईल.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या विपुल लेखनातून संकलित)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :article
loading image
go to top