संयाव आयुर्वेदिक करंजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karanji

अर्धचंद्राकार, सोनेरी रंगाच्या, खुसखुशीत करंज्या दिवाळीत खायला मिळाल्या तर मनाला खूप आनंद होतो.

संयाव आयुर्वेदिक करंजी

अर्धचंद्राकार, सोनेरी रंगाच्या, खुसखुशीत करंज्या दिवाळीत खायला मिळाल्या तर मनाला खूप आनंद होतो. आयुर्वेदानुसार संयाव म्हणजे करंज्या धातुवर्धक, वृष्य (शुक्रधातू वाढविण्यास मदत करणाऱ्या), शरीराला ताकद देणाऱ्या, हृदयाला हितकर, सारक (पोट साफ करणाऱ्या), मोडलेली हाडे भरून काढणाऱ्या, तसेच वातदोषशामक असतात.

साहित्य

 • बारीक रवा - एक वाटी

 • सेंद्रिय मैदा - एक वाटी

 • गरम तूप - चार चमचे

 • दूध - एक वाटी

 • मीठ - चिमूटभर

 • सारणाकरता नारळाचा चव - एका नारळाचा

 • खडीसाखरेची पूड - दीड वाटी

 • वेलची पूड - अर्धा चमचा

 • लवंग पूड - पाव चमचा

 • केशर पूड - एक अष्टमांश चमचा

 • भाजलेला रवा - एक मोठा चमचा

 • भीमसेनी कापूर - एक चिमूट

 • तळण्यासाठी तूप - अंदाजे अर्धा किलो

कृती

1) रवा, मैदा व चमूटभर मीठ एकत्र करून त्यात मोहन म्हणून चार चमचे गरम केलेले तूप घालावे. सर्व घटक नीट मिसळून घ्यावे. नंतर थोडे थोडे दूध घालून पीठ घट्ट मळावे. त्यावर ओले केलेले पातळ फडके घालून कणीक बाजूला ठेवून द्यावी.

2) सारणाकरता कल्हई केलेल्या जाड बुडाच्या पितळेच्या पातेल्यात ओले खोबरे घालून थोडे भाजावे. त्यात भाजलेला रवा व खडीसाखरेची पूड घालून मंद आचेवर ठेवावे. कलथ्याने मिश्रण हलवत राहावे. मिश्रण पातेल्याच्या कडा सोडू लागल्यावर आचेवरून पातेले उतरवून त्यात वेलची पूड, लवंग पूड, केशर पूड व भीमसेनी कापूर घालून मिसळून घ्यावे. इच्छा असल्यास चारोळ्या किंवा मनुका घालता येतात.

3) वर तयार केलेले पीठ पुन्हा नीट मळून एकसारखे घ्यावे व त्याच्या सुपारीएवढ्या गोळ्या कराव्या. गोळी पोळपाटावर पातळ लाटून घ्यावी.

4) लाटलेल्या पुरीच्या अर्ध्या भागावर एक चमचा सारण ठेवावे. पुरीच्या कडेवर दुधाचे बोट लावून घ्यावे. पुरीचा उरलेला अर्धा भाग सारणावर उलटा करून, कडा दाबून चंद्राकृती करंज्या तयार कराव्या. कटरने कापल्यास किनार अधिक चांगली दिसते. अशा प्रकारे सगळ्या करंज्या करून ओलसर फडक्याखाली ठेवाव्या.

5) जाड बुडाच्या लोखंडी कढईत साधारण अर्धा किलो तूप मंद आचेवर तापवायला ठेवावे. तूप तापल्यावर दोन-तीन करंज्या तुपात टाकून सोनेरी रंगावर तळून घ्याव्या. वरील मिश्रणाच्या साधारण १५-२० करंज्या होतात. हवाबंद डब्यात ठेवल्यास एक आठवडा टिकू शकतात.

सूचना

 • बारीक रवा नसल्यास जाड रवा मिक्सरमधून फिरवून घ्यावा किंवा मैद्याचे प्रमाण वाढवावे.

 • कोणी मदतीला असल्यास एका व्यक्तीने करंज्या कराव्या व दुसऱ्या व्यक्तीने तळाव्यात.