त्रिगुणात्मक त्रिमूर्ती... ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Trimurti
त्रिगुणात्मक त्रिमूर्ती... !

त्रिगुणात्मक त्रिमूर्ती... !

श्रीदत्तात्रेयांचे वर्णन ‘त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा’ या शब्दांत केले जाते. जसे शरीरातील त्रिदोष असतात, मनाचे त्रिगुण असतात, आयुर्वेदाची त्रिसूत्री असते, तसेच जीवनाच्याही तीन बाजू असतात. एक बाजू शरीराचे भौतिक व्यापार चालवते, दुसरी बाजू भावनिक व्यवहार चालवते आणि तिसरी बाजू सर्वांना अंतर्भूत करून सर्वांच्या कल्याणाचा म्हणजेच अध्यात्माचा विचार करते.

आज आहे सद्‌गुरु श्रीदत्तात्रेयजयंती. भारतीय संस्कृतीमध्ये अनेक देवदेवतांच्या संकल्पना रुजलेल्या आहेत. श्रीदत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू व महेश या तिघांच्यासंयोगातून तयार झालेले असले तरी त्यांना ‘सद्‌गुरु’ ही परमोच्च उपाधी मिळालेली आहे. आपल्या शरीरातील सगळ्यात ‘गुरु’ अवयव म्हणजे मेंदू. शरीरात सर्वांत वरच्या बाजूला त्याचे स्थान आहे म्हणून श्रीमद्‌भगवद्‌गीतेत ऊर्ध्वमूलमधःशाखं म्हणजे मूळ वरती व फांद्या खाली असणाऱ्या अश्र्वत्थ वृक्षाची उपमा मनुष्यशरीराला दिलेली आहे. मेंदूमुळेच सर्व जीवनव्यापार चालू शकतात. डावा मेंदू, उजवा मेंदू व मागचा मेंदू असे मेंदूचे मुख्य तीन विभाग केले जातात. जो शिकवतो तो शिक्षक किंवा गुरु. मेंदू एक प्रकारे गुरुचे किंवा शिक्षकाचे कामही करत असतो. परंतु या तिन्ही विभागांना मिळून विश्र्वाचे ज्ञान घेण्याची तसेच ते ज्ञान अनुभवण्याची क्षमता असते. परमशांतीचा अनुभव घेण्याची क्षमता या तीन भागांमध्ये असल्यामुळे पूर्ण मेंदू हा जणू श्रीसद्‌गुरुंचे काम करतो. श्रीदत्तात्रेयांचे वर्णन ‘त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा’ या शब्दांत केले जाते. जसे शरीरातील त्रिदोष असतात, मनाचे त्रिगुण असतात, आयुर्वेदाची त्रिसूत्री असते, तसेच जीवनाच्याही तीन बाजू असतात. एक बाजू शरीराचे भौतिक व्यापार चालवते. दुसरी बाजू भावनिक व्यवहार चालवते आणि तिसरी बाजू सर्वांना अंतर्भूत करून सर्वांच्या कल्याणाचा म्हणजेच अध्यात्माचा विचार करते. या तीन बाजू ज्या एका बिंदूत मिळतात तो बिंदू या तिन्ही बाजूंवर लक्ष ठेवू शकतो, इतकेच नाही तर तिन्ही बाजूंचा एकसमयावच्छेदेकरून निर्णय घेऊ शकतो. या तीनही बाजूंमध्ये समत्व असले तरच जीवन व्यवस्थित चालते.

मात्र सहसा इंद्रिये एका कुठल्यातरी बाजूला ओढत ठेवतात आणि माणसाचे जीवन भरकटत जाते. असे होऊ नये म्हणून सर्वसमावेशक मार्गदर्शनाची गरज असते. हे मार्गदर्शन जे करतात ते सद्‌गुरु! मेंदूच्या तीनही भागांवर नियंत्रण ठेवणाऱ्या परमोच्च स्थानावर सद्‌गुरुंची सत्ता असते. श्रीदत्तात्रेय स्मर्तृगामी आहेत असे म्हटले जाते म्हणजे स्मरण केल्याक्षणी ते प्रकट होतात. आपली जाणीव, संपूर्ण विश्र्वाशी जोडलेले अस्तित्व असे जे काही आपण म्हणतो ती अवस्था सद्‌गुरुंच्या उपस्थितीमध्ये किंवा त्यांचे स्मरण केल्याबरोबर लक्षात येते. वस्तुतः त्यांच्या प्रभावानेच सर्व चालत असते परंतु त्याकडे आपले लक्ष नसते. दिव्याचा उजेड किती पडला, बल्ब किती मोठा आहे, किती दाबाने वीज येते आहे वगैरे गोष्टी आपल्याला समजतात, परंतु यामागे असलेल्या विजेकडे आपले लक्ष जात नाही. जसे वीज आहे की नाही हे पाहणे आवश्‍यक असते तसे प्रत्येकाने जाणिवेवर लक्ष ठेवून, सद्‌गुरुंच्या चरणी लक्ष ठेवून कार्य करावे, ते कार्य शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक या कुठल्याही प्रकारचे असो. केलेले कार्य जोपर्यंत परमोच्च जाणिवेला, म्हणजे सद्‌गुरुंच्या चरणी अर्पण होत नाही तोपर्यंत आयुष्य भटकते, आयुष्यात दोष उत्पन्न होतो. अशा वेळी कुठल्याही प्रकारचे समाधान न मिळाल्यामुळे तीच ती गोष्ट पुन्हा पुन्हा करावीशी वाटते.

पुन्हा पुन्हा कराव्या लागणाऱ्या गोष्टींतून किंवा पुन्हा पुन्हा जगाव्या लागणाऱ्या आयुष्यातून सुटका सद्‌गुरुंमुळे होऊ शकते. पुनर्जन्म घ्यावा लागला तरी हरकत नाही पण पुन्हा पुन्हा तेच अनुभव घेण्याची, त्याच अडचणींत जगण्याची आवश्‍यकता नाही. यातून सुटका सद्‌गुरुंच्या मार्गदर्शनामुळे होऊ शकते. ‘ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे’ म्हणजे प्रत्येक गोष्ट करत असताना परमेश्र्वराचे स्मरण असावे. उदा., फूल तोडत असताना फूल तयार होण्यासाठी असलेला परमेश्र्वरी हात दिसावा, अन्न खात असताना ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ हे लक्षात यावे. अशा तऱ्हेने प्रत्येक वेळी परमेश्र्वरावर लक्ष ठेवले तर आयुष्य आनंदमय होऊ शकते. देवतांना आवाहन करण्यासाठी आपल्या मेंदूत देवतांचे स्थान उत्पन्न केलेले असते. या स्थानांपैकी श्रीदत्तात्रेयांचे स्थान परमोच्च आहे. या ठिकाणी समाधीचा अनुभव घेता येतो, समत्व साधता येते आणि जीवन आरोग्यमय, आनंदमय करता येते. अशा या श्रीदत्तात्रेयांचे ज्या दिवशी विश्र्वाला भान झाले तो त्यांचा जन्मदिवस म्हणजे श्रीदत्तात्रेयजयंती. ज्या दिवशी द्वैत संपले, असूया संपली तेव्हा अनसूयेच्या घरात जन्म झाल्याचा हा दिवस. आयुष्य आनंदमय, आरोग्यमय व्हावे यासाठी सद्‌गुरुंचा आशीर्वाद कसा उपयोगी पडेल यादृष्टीने उपासना करायचा हा दिवस व त्यानिमित्ताने श्रीदत्तात्रेयांचे विशेष स्मरण.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या विपुल लेखनातून संकलित)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :article
loading image
go to top