स्वागत दीपावलीचे... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali Festival

विजयादशमीनंतर सगळ्यांना वेध लागतात ते दीपावलीचे. भारतीय सणांमधील सर्वांत महत्त्वाचा, अनेकविध पैलूंनी साजरा केला जाणारा सण म्हणजे दीपावली.

स्वागत दीपावलीचे...

दीपावली हा प्रकाशाचा, तेजाचा उत्सव, त्यामुळे दारात आकाशकंदील, अंगणात पणत्या, घराला रोषणाई हे अध्याहृत असते. आजकाल सुटसुटीतपणाच्या नावाखाली मेणबत्त्या किंवा विजेवर चालणारे दिवे लावण्याची पद्धत रूढ होते आहे. सजावटीच्या दृष्टीने एखादी स्वदेशी रोषणाईची माळ घराच्या दारावर लावली तरी तिळाच्या तेलाचे दिवे लावण्याला पर्याय नाही.

विजयादशमीनंतर सगळ्यांना वेध लागतात ते दीपावलीचे. भारतीय सणांमधील सर्वांत महत्त्वाचा, अनेकविध पैलूंनी साजरा केला जाणारा सण म्हणजे दीपावली. यात घराची साफसफाई, सुशोभीकरण, फराळ, खरेदी, नातेवाइकांना द्यायच्या भेटवस्तू, पूजा, आतषबाजी, अभ्यंग-उटणे, दिवे, कंदील, किल्ला अशा अनेकविध गोष्टी समाविष्ट असतात आणि म्हणूनच दीपावलीचा आनंद घ्यायचा असेल, दीपावलीच्या उत्सवाच्या निमित्ताने शरीर-मनाला तसेच वातावरणाला होणारा फायदा खरोखरच उपभोगायचा असेल तर तिची तयारीसुद्धा यथासांग करायला हवी. दीपावलीत करायच्या सर्व गोष्टी उगाचच नावापुरत्या न करता खरोखर त्यामागचे तत्त्व समजून घेऊन करायला हव्यात. भारतीय संस्कृतीत सणावारांची योजना आयुर्वेदाच्या सल्ल्यानुसारच केलेली आहे. कधी काय खावे, कोणी किती खावे, ऋतुनुसार कोठल्या देवतेचे पूजन करावे, कुठल्या देवतेला कुठला नैवेद्य दाखवावा या सर्व बाबींचा विचार करून सण कसा साजरा करायचा हे ठरवलेले असते. दीपावली याला अपवाद नाही. दीपावली साजरी करताना तेलाचे दिवे लावण्याची परंपरा तर आहेच, पण अंगाला तेल लावण्याचेही खूप महत्त्व आहे. अंगाला लावायचे तेल तिळाचे पण अग्निसंस्काराने सिद्ध केलेले असणे महत्त्वाचे होय. कारण अग्निसंस्काराने तेल सूक्ष्म झाले की फक्त त्वचेवर न राहता शरीरात आतपर्यंत जिरू शकते, वातदोषाचे शमन करते, सप्तधातूंना पोषण देते. आयुर्वेदात खरं तर ‘अभ्यंगमाचरेत् नित्यम्’ म्हणजे रोज अभ्यंग करावा असे सांगितलेले आहे. आरोग्याला पूरक असणाऱ्या या सवयीची सुरुवात दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर करणे सर्वोत्तम ठरावे.

तेलाच्या पाठोपाठ येते ते उटणे. दीपावलीत तेल व उटणे एकत्र करून लावण्याची प्रथा असते. यामुळे अभ्यंगाच्या बरोबरीने त्वचा स्वच्छ व्हायला, उजळायलाही मदत मिळते. मात्र एरवी रात्री झोपण्यापूर्वी अभ्यंग व सकाळी स्नानाच्या वेळ साबणाऐवजी उटणे वापरता येते. दीपावली हा प्रकाशाचा, तेजाचा उत्सव. त्यामुळे दारात आकाशकंदील, अंगणात पणत्या, घराला रोषणाई हे अध्याहृत असते. आजकाल सुटसुटीतपणाच्या नावाखाली मेणबत्त्या किंवा विजेवर चालणारे दिवे लावण्याची पद्धत रूढ होते आहे. सजावटीच्या दृष्टीने एखादी स्वदेशी रोषणाईची माळ घराच्या दारावर लावली तरी तिळाच्या तेलाचे दिवे लावण्याला पर्याय नाही. बाळाचा जन्म झाला की बाळबाळंतिणीच्या खोलीचे वातावरण शुद्ध राहावे, जंतुसंसर्गाला थारा मिळू नये यासाठी २४ तास अग्नी तेवत असावा असे आयुर्वेदाने सुचविलेले आहे.

यावरूनही तेलाचा दिवा लावण्याने वातावरण शुद्ध होण्यात, विशेषतः पावसाळ्यात हवेतील दमटपणामुळे शक्तिशाली झालेल्या जीवजंतूंचा प्रभाव कमी व्हावा आणि हवा शुद्ध व्हावी यासाठी नक्कीच मदत होत असावी ही लक्षात घेता येईल. त्यासाठी लागणाऱ्या मातीच्या पणत्या, चांगल्या प्रतीचे तिळाचे तेल आधीपासूनच घरात आणून ठेवणे चांगले. फराळ ही तर दिवाळीची यू. एस्. पी (USP). सकाळी नाश्त्याला इडली, डोसा, पोहे अशा एखाद्या गरम-गरम पदार्थाबरोबर मध्ये ठेवलेल्या फराळाची ताटामधील चकली, कडबोळी, लोणी, लाडू असे आपल्याला हवे ते घेऊन खाणे ही फराळाची गंमत. मात्र सध्या लोकांनी खाण्याची धास्ती घेतलेली दिसते.

“दिवाळी येते आहे, फराळ वगैरे सांभाळून करा; खूप मेहनत करून उतरवलेले दोन किलो वजन पुन्हा दिवाळीत वाढणार नाही याकडे लक्ष ठेवा” असे सल्ले हल्ली ऐकू येतात. यातच भर म्हणून गेली काही वर्षे दिवाळीच्या सुमारास भेसळीचा राक्षस व व्हायरस सगळीकडे पसरलेला दिसतो. डाळ, गूळ, तिखट, तेल, दूध वगैरे पदार्थांमध्ये भेसळ येऊ लागली तर मावा, तूप, दूध वगैरे पदार्थ तर बनावटी स्वरूपात मिळू लागले आणि दिवाळीची पणती तेवण्याऐवजी मंद होत गेली. असे म्हणतात की उपसा झाला नाही तर विहीर आटते. तसेच पचनशक्ती खाण्या-पिण्याच्या सवयीवर टिकून राहते. तेव्हा प्रत्येकाने प्रकृतीपरीक्षण करवून घेऊन मानवणारे पदार्थ योग्य मात्रेत अवश्‍य खावेत.

पचन झाले तरच शक्ती मिळते. नुसत्या प्रोटिन, व्हिटॅमिन, कॅलरी यांचा विचार करून केलेल्या आहारामुळे हलके हलके शक्ती कमी होते. चेहरा निस्तेज होऊ लागतो. नटनट्या किंवा सांपत्तिक सुविधा असणाऱ्यांचे एक बरे असते की त्यांना हव्या त्या वेळी मेक-अपमुळे चेहऱ्यावर तेज आणता येते व चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या डॉक्टरांकडे जाऊन काढून टाकता येतात. सर्वसामान्यांनी काय करावे? शरीराचा कायाकल्प करण्यासाठी पंचकर्मासारखा विधी करता येतो, पण ताकदीसाठी त्याने काय करावे? खाण्याने कोलेस्टेरॉल वाढते, आर्टरीज भरतात, वजन वाढते, रक्तदाब, मधुमेह असे रोग होण्याची शक्यता वाढते असे एकदा डोक्यात बसले की मग समोर आलेला कुठलाही पदार्थ आपला शत्रू आहे, तो खाल्ल्याने आपले नुकसान होणार आहे असेच मनात येते.

त्यामुळे तो पदार्थ खाल्ला जात नाही किंवा खाल्ला तरी पचत नाही. परंतु दीपावलीच्या फराळातील जिन्नस योग्य प्रकारे केले व योग्य प्रमाणात व योग्य वेळी सेवन केले तर अत्यंत आरोग्यदायी असतात. दीपावलीचा सण व्यवस्थित साजरा व्हावा व कुठलीही भीती न बाळगता जेवणखाण व्यवस्थित व्हावे यासाठी वस्तू खरेदी करत असताना त्यात भेसळ नाही याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे.

वस्तूत जास्त कस असला तर त्यासाठी चार पैसे अधिक लागतात हेही लक्षात ठेवावे. पाककौशल्य दाखविण्याची संधी उत्सवांमुळे मिळते असे समजले तर दीपावलीच्या सणाचा आनंद सर्वांनाच घेता येईल. या दीपावलीच्या शुभमुहूर्तावर भेसळीचा व भ्रष्टाचाराचा नरकासुर मरावा व पुन्हा प्राचीन भारतीय परंपरेतील दूध-तूप वगैरे अमृतमय अन्न सेवन करून अग्नितेजाची व कर्मप्रतिष्ठेची श्रद्धा वाढावी तसेच दीपावली व येणारे नूतन वर्ष आरोग्य, मैत्री, समृद्धी, धनसंपदा व उत्कर्ष यांनी परिपूर्ण जावो हीच प्रार्थना.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित.)