आयुर्वेदातील अग्नी संकल्पना

डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)
Friday, 16 December 2016

अन्नाचे पचन होण्यासाठी तसेच त्यानंतर शरीरातील रसरक्‍तादी धातू नीट तयार होण्यासाठी आणि पांचभौतिक आहाराच्या माध्यमातून पोषण होण्यासाठी शरीरात एकूण तेरा अग्नी असतात.

शरीराचे दैनंदिन कार्य चालविण्यासाठी शरीरात अनेक तत्त्वांची योजना केलेली असते. त्यापैकी अती महत्त्वाच्या तत्त्वातील एक तत्त्व म्हणजे शरीरस्थ अग्नी.
अग्निं रक्षेत प्रयत्नतः ।

असे आयुर्वेदातील संहितांमध्ये वेगवेगळ्या संदर्भात अनेकदा सांगितलेले आहे. प्रयत्नपूर्वक ज्याची निगा राखायला हवी, काळजी घ्यायला हवी ते तत्त्व म्हणजे अग्नी. आयुर्वेदात अग्नीला "भगवान' उपाधी दिलेली आहे. अग्नीचे महत्त्व ठसविण्याच्या दृष्टिकोनातून श्रीमद्‌भगवद्‌गीतेत भगवान श्रीकृष्ण स्वतः प्रत्येक मनुष्यमात्राच्या शरीरात अग्नीच्या रूपाने राहतात असे सांगतात,
अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः ।प्राणापानसमायुक्‍तः पचाम्यन्नं चतुर्विधम्‌ ।।श्री.म.भ. 15-14।।

प्राणीमात्रांच्या शरीरात मी स्वतः अग्नीच्या रूपाने आश्रय घेऊन राहतो आणि प्राण-अपानाच्या मदतीने चतुर्विध अन्नाचे पचन करतो.

तेव्हा परमेश्वराला द्यायचे अन्न आपण जितके काळजीपूर्वक, शुद्धतेची व चांगल्या प्रतीची काळजी घेऊन अर्पण करू, तेवढीच काळजी आपण स्वतः अन्न सेवन करताना घ्यायला पाहिजे. हे चतुर्विध अन्न कोणते?

अशित - चावून खायचे अन्न, उदा. पोळी, भाकरी, भात वगैरे
पीत - गिळायचे अन्न, उदा. पेज, कढी, सूप, पाणी वगैरे
लीढ - चाटून खायचे अन्न, उदा. मोरब्बा, लोणचे वगैरे
खादित - तोडून खायचे अन्न. उदा. लाडू, चिक्‍की वगैरे.

अन्न नीट पचावे असे वाटत असेल तर ते या चार प्रकारचे असायला हवे. फक्‍त पातळ गोष्टीच खाल्ल्या किंवा पातळ भाजी, कढी, आमटी वगैरेशिवाय नुसतीच कोरडी भाजी-पोळी खाल्ली किंवा नेहमीचा आहार न घेता लाडू, चिक्की यांसारखे कडक पदार्थच खाल्ले तर ते अन्न पचायला अवघड असते.

तत्राग्निहेतुः आहारात्‌ न हि अपक्वाद्‌ रसादयः ।।....चरक चिकित्सास्थान
अग्नीची कार्यक्षमता उत्तम हवी असेल तर आहार चांगला घ्यायला हवा. आहार चांगला नसला (म्हणजे पचायला जड, प्रकृतीला प्रतिकूल, शिळा, विरुद्ध, संस्कार न करता तयार केलेला असला) तर तो अग्नीद्वारा पचू शकत नाही. आणि त्यातून रस, रक्‍तादी धातू योग्य प्रकारे तयार होऊ शकत नाही. परिणामतः शरीरशक्‍ती कमी होणे, रोगप्रतिकारशक्‍ती खालावणे, रक्‍त कमी झाल्याने शरीर निस्तेज होणे वगैरे लक्षणे दिसू शकतात.

तेव्हा आहाराचे पचन व्यवस्थित झालेच पाहिजे, आरोग्य टिकण्यासाठी, दीर्घायुष्यासाठी हे अनिवार्य आहे, हा आयुर्वेदाचा सर्वश्रेष्ठ सिद्धांत आहे. अन्नाचे पचन होण्यासाठी तसेच त्यानंतर शरीरातील रसरक्‍तादी धातू नीट तयार होण्यासाठी आणि पांचभौतिक आहाराच्या माध्यमातून पोषण होण्यासाठी शरीरात एकूण तेरा अग्नी असतात. यापैकी जाठराग्नी हा मुख्य अग्नी असून, तो इतर सर्व अग्नींचा आधार आहे. म्हणजे जोपर्यंत जाठराग्नी उत्तम असतो, तोपर्यंत इतर अग्नीही उत्तम राहतात. हे तेरा अग्नी पुढीलप्रमाणे होत,

जाठराग्नी - जठरात म्हणजे लहान आतड्याच्या सुरवातीच्या भागात राहून सेवन केलेल्या अन्नाला पचविणारा तो जाठराग्नी. हा संख्येने एक आणि सर्वांत महत्त्वाचा असतो.

धात्वग्नी - हे संख्येने सात असतात. प्रत्येक धातूचा आपापला एक-एक अग्नी असतो आणि यांच्या माध्यमातून शरीरातील सातही धातू योग्य प्रमाणात तयार होत असतात.
भूताग्नी - हे संख्येत पाच असतात. पार्थिवाग्नी आहारातील पार्थिव भागाचे पचन करतो, आप्याग्नी आहारातील जलांशाचे पचन करतो. अशा प्रकारे प्रत्येक महाभूताचा अग्नी स्वतःच्या गुणांनी युक्‍त आहाराचे पचन करत असतो.

जाठराग्नी आणि भूताग्नीकडून आहाराचे योग्य प्रकारे पचन झाले तर त्यापासून तयार होणारा आहाररस हा तेजोमय, परममूक्ष्म आणि आहाराचे सारस्वरूप असतो असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. या आहाररसात शरीरातील प्रत्येक इंद्रियाला, प्रत्येक पेशीला परिपोषित करण्यासाठी आवश्‍यक असणारे गुण असतात. हा आहाररस हृदयातून संपूर्ण शरीरात पोचतो आणि शरीराला तृप्त करतो, शरीरधातूंची पूर्ती करतो, शरीराचे धारण करतो, शरीराची वृद्धी होण्यासाठी मदत करतो. आहाररस हृदयातून संपूर्ण शरीरात पोचवण्याची जबाबदारी व्यान वायूवर असते. व्यानवायू हा संपूर्ण शरीराला व्यापून असल्याने तो आहाररस सूक्ष्मातील सूक्ष्म पेशीपर्यंत अखंडपणे पोचवू शकतो.
पचनक्रिया नक्की कशी होते, त्यासाठी कोणकोणते भाव गरजेचे असतात, याची माहिती आपण पुढच्या वेळी पाहू.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ayurveda