आयुर्वेदातील अग्निसंकल्पना

डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)
Friday, 30 December 2016

अन्न सेवन करण्यापूर्वी जसे शिजवणे आवश्‍यक असते, तसे पोटात गेल्यानंतर अग्नीच्या उष्णतेच्या मदतीने पचवणे गरजेचे असते. या दृष्टीने शरीरात पाचकपित्त, अग्नीची योजना केलेली असते. बाह्य वातावरणातील थंड हवामान शरीरातील उष्म्याला वाढवणारे असते, तर उष्ण वातावरणात अग्नीची शक्‍ती त्यामानाने थोडी मंदावत असते

 

पचनाची मुख्य जबाबदारी अग्नीवर असली तरी त्याला मदतीला इतर भावही आवश्‍यक असतात, हे आपण मागच्या वेळी पाहिले. उष्मा, वायू, क्‍लेद, स्नेह, काल, समयोग हे सहा आहारपरिणामकर भाव चरकसंहितेमध्ये समजावलेले आहेत.
आहारपरीणामकरास्त्विमे भावा भवन्ति । तद्यथा उष्मा वायुः क्‍लेदः स्नेहः कालः समयोगश्‍चेति ।।...चरक शारीरस्थान

उष्मा - अन्नधान्य शेतात उगवले तरी ते सर्व जसेच्या तसे सेवन करता येत नाही. ते सेवन करण्यापूर्वी जसे शिजवणे आवश्‍यक असते, तसे पोटात गेल्यानंतर अग्नीच्या उष्णतेच्या मदतीने पचवणे गरजेचे असते. या दृष्टीने शरीरात पाचकपित्त, अग्नीची योजना केलेली असते. बाह्य वातावरणातील थंड हवामान शरीरातील उष्म्याला वाढवणारे असते, तर उष्ण वातावरणात अग्नीची शक्‍ती त्यामानाने थोडी मंदावत असते म्हणून हिवाळ्यात भूक चांगली लागते, पचनशक्‍तीही इतर ऋतूंच्या मानाने अधिक चांगली असते. आहाराची योजना देशाप्रमाणे बदलण्यामागेसुद्धा अग्नीची शक्‍ती विचारात घेतलेली असते म्हणून शीत कटिबंधीय देशात मांसाहार, चीज, क्रीम यासारख्या पचण्यास अवघड गोष्टी खाण्याचा प्रघात असतो, तर उष्ण कटिबंधीय देशात दूध, ताक, तूप अशा पचण्यास त्यामानाने हलक्‍या गोष्टी अधिक प्रचलित असतात, तसेच अग्नीला संधुक्षित करण्यासाठी मसाले, तिखट पदार्थ अधिक प्रमाणात खाण्याची पद्धत असते, अन्यथा, अग्नीची पचनशक्‍ती अपुरी पडू शकते. एकंदरच पचन व्यवस्थित होण्यासाठी शरीरातील अग्नी नीट राहणे अत्यावश्‍यक असते.

वायू - वायू हा सर्व क्रियांचा प्रेरक असतो. पचन करणारा अग्नी असला तरी त्याला पचनाची प्रेरणा वायूकरवी मिळत असते म्हणून पोट अगदी पूर्णपणे भरून जेवू नये, असे आयुर्वेदात सांगितले आहे. पोटाचे तीन भाग आहेत, अशी कल्पना करून त्यातला एक भाग वायूच्या हालचालीसाठी मोकळा ठेवावा असे सांगितले आहे. अगदी तडस लागेपर्यंत पोट भरले तर वायूच्या हालचालीला अवकाश राहत नाही, पर्यायाने अन्नपचन व्यवस्थित होऊ शकत नाही, तसेच व्यवहारात ज्याप्रमाणे निर्वात जागी अग्नी टिकत नाही किंवा अग्नीला फुलवायला फुंकर मारावी लागते त्याप्रमाणे शरीरातही अग्नी कार्यक्षम राहण्यासाठी वायूची उपस्थिती आवश्‍यक असते. अन्नसेवन केले की ते सर्वप्रथम आमाशयात जाते. ते योग्य वेळासाठी आमाशयात धरून ठेवणे, योग्य वेळी लहान आतड्यात जाऊ देणे, जेथे अग्नी असतो त्या भागात योग्य वेळासाठी राहू देणे, नंतर ते पुढे सरकवणे, अन्नातून सारभाग असणारा आहाररस तसेच मलभाग असणारे मळ, मूत्र यांना वेगवेगळे करणे ही सर्व कामे वायूच्या मदतीने होत असतात. आतड्याची गती, मलभाग पुढे नेण्याची प्रक्रिया हीसुद्धा वायूशीच संबंधित असते. अशा प्रकारे वायू हा अन्नपचनातील महत्त्वाचा घटक असतो.

क्‍लेद - म्हणजे ओलावा. अन्न शिजवायचे असो किंवा शरीरात गेल्यावर पचवायचे असो, त्यात योग्य प्रमाणात पाणी किंवा जलांश मिसळणे आवश्‍यक असते. पाण्याशिवाय अग्निसंस्कार करायचा प्रयत्न केला, तर अन्न जळून जाईल, जसे नुसते तांदूळ भांड्यात ठेवून शिजवायचा प्रयत्न केला, तर त्यातून भात तयार होणार नाही, उलट काही वेळात तांदूळ जळून जातील. तांदळाच्या दुप्पट प्रमाणात पाणी मिसळले आणि त्याला योग्य प्रमाणात आच मिळाली, तरच चांगला भात तयार होऊ शकतो. भाजी, भाकरी, पोळी, अगदी पापड बनवायचे असले तरी त्याला पाण्याचा स्पर्श व्हावाच लागतो. काही भाज्या बनविताना बाहेरून पाणी मिसळावे लागले नाही तरी त्यांच्यात स्वभावतःच पाणी असते. उदा. दुधी, भोपळा वगैरे. याच तत्त्वावर शरीरात अन्नाचे पचन होत असताना त्यात आमाशयात असणारा क्‍लेदक कफ आणि अन्नातील द्रवांश तसेच पाणी मिसळणे आवश्‍यक असते, तसेच ते योग्य प्रमाणात मिसळले जाणेही तेवढेच आवश्‍यक असते. भात बनविण्यासाठी दोन किंवा तीन पट पाणी टाकावे लागते. एकदम दहा पट पाणी टाकून चालत नाही. त्याचप्रमाणे आहाराबरोबर पाणी किंवा पातळ पदार्थ योग्य प्रमाणात घेणे आवश्‍यक असते. जेवणापूर्वी जर ढसाढसा पाणी प्यायले किंवा जेवताना खूप पाणी प्यायले तर हा अधिक प्रमाणातील द्रवांश पचविण्यासाठी अग्नीची ताकद अधिक प्रमाणात खर्च होईल आणि अगदीच कोरडे कोरडे अन्न खाल्ले तरी जलांशाच्या अभावाने त्याचे योग्य प्रकारे पचन होऊ शकणार नाही.

क्‍लेद म्हणजे ओलावा. अन्नाला योग्य प्रमाणात ओलावा देणारा तो क्‍लेदक कफ. हा कफाचा प्रकार तोंडात लाळेच्या रूपात तर आमाशयात क्‍लेदक कफ म्हणून प्रकट होत असतो. अन्नाच्या दर्शनाने किंवा सुगंधाने किंवा कधी कधी नुसत्या स्मरणानेसुद्धा तोंडाला पाणी सुटते हा अनुभव सर्वांचाच असतो. अन्नपचन व्यवस्थित व्हावे यासाठी निसर्गाने केलेली ही योजना असते. मात्र जसे प्रमाणाबाहेर पाणी पिऊन चालत नाही, तसेच अन्न सेवन झाल्यावर लाळ सुटण्याची क्रिया हलके हलके कमी होऊन थांबावी यासाठी जेवणाच्या शेवटी तुरट रसयुक्‍त ताक, सुपारी वगैरे खाण्याची पद्धत असते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ayurveda