पाठदुखी 

डॉ. आनंद कवी
Friday, 31 January 2020

सध्याच्या काळात पाठदुखी कधी पाठ धरेल हे सांगता येत नाही. पाठदुखी आपल्या पाठीमागे लागू नये यासाठी आधीच प्रयत्न करायला हवेत आणि जर पाठदुखी सुरू झालीच तर ती सोसत न बसता वेळीच त्यावर उपचार करून घ्यायला हवेत. 
 

सध्याच्या काळात पाठदुखी कधी पाठ धरेल हे सांगता येत नाही. पाठदुखी आपल्या पाठीमागे लागू नये यासाठी आधीच प्रयत्न करायला हवेत आणि जर पाठदुखी सुरू झालीच तर ती सोसत न बसता वेळीच त्यावर उपचार करून घ्यायला हवेत. 
 

पाठदुखी आणि सायटिका या अगदी सर्रास आढळणाऱ्या आरोग्य समस्या झाल्या आहेत. किंबहुना सर्दीनंतर हेच आजार सर्वाधिक प्रमाणात आढळतात. असे म्हणतात, की जगभरातील सत्तर टक्के लोकांना आयुष्यात एकदा तरी पाठीच्या खालच्या भागाच्या आणि पायांच्या दुखण्याला (सायटिका) सामोरे जावे लागते. बहुतेक रुग्णांमध्ये या वेदना कमी कालावधीसाठी असतात. औषधे व काही काळ आराम करून यावर उपचार करता येतात; पण काही रुग्णांना असह्य वेदनांना सामोरे जावे लागते. गंभीर प्रकरणांमध्ये पाठीच्या कण्यातील नसा सुजतात आणि त्यांचा दाह होतो. काही वेळा नसा आकुंचनही पावतात, त्यामुळे पायांना बधिरपणा येतो आणि अशक्तपणा जाणवतो. अशा परिस्थितीत हालचाल करणे आणि दैनंदिन कामे करणे कठीण होऊन जाते. 

मणक्याचे स्खलन म्हणजे काय? 
आपला पाठीचा कणा विशिष्ट प्रकारे हाडांनी तयार झालेला आहे. पाठीचा कणा व मज्जातंतूंच्या आवागमनासाठी तो एक संरक्षक नळी तयार करतो. पाठीच्या कण्याची हाडे मणक्यांनी विभक्त झालेली असतात. मणके हे उशांसारखे किंवा शॉक अॅबसॉर्बिंग पॅड्ससारखे काम करतात. पण मणक्यांचे स्खलन (स्लीप डिस्क) होते. जेव्हा हे मणके फाटतात, तेव्हा जेलीसारखे न्यूक्लेअस त्यांच्यातून मोकळे होते आणि ते पाठीच्या कण्याच्या नसांना स्पर्श करते, त्यामुळे प्रचंड वेदना होतात. या नसांच्या मार्गातील पायाच्या भागात लहरी उत्पन्न होतात. या वेदनेचा संबंध पायांच्या बधिरपणाशी किंवा अशक्तपणाशी असू शकतो. 

उपचार काय? 
पाठीच्या कण्याचे तज्ज्ञ शल्यविशारद कदाचित शस्त्रक्रिया करण्यास सांगतील या भीतीने आणि पाठीच्या कण्याच्या शस्त्रक्रियेच्या भीतीने बहुतेक रुग्ण ‘सेल्फ-मेडिकेशन’ (स्वतःच्या विचाराने औषधे घेणे), योगासने, फिजिओथेरपी आणि इतर उपचारांचा अवलंब करतात. नसांना आलेली सूज आणि दाह कमी झाल्यामुळे त्यांच्यापैकी काहींना दिलासा मिळतो; पण हा दिलासा केवळ तात्पुरता असतो आणि काही रुग्णांची परिस्थिती अधिक गंभीर होते. त्यावर तातडीने उपचार करण्याची आवश्यकता असते आणि काही रुग्ण तर डॉक्टरकडे येण्यास इतका विलंब लावतात, की तोपर्यंत नसांचे कायमस्वरूपी नुकसान झालेले असते. 
रुग्णाची सखोल तपासणी करून वेदनेचे मूळ कारण शोधले जाते. वेदना कशामुळे उत्पन्न होत आहे याचा तपास केला जातो, वेदना सतत का होत आहे हे शोधण्याचा प्रयत्न होतो. शस्त्रक्रिया टाळता येऊ शकते का व कशी टाळली जाईल हे पहिल्यांदा पाहिले जाते. जर शस्त्रक्रिया आवश्यक असेल, तर सुरक्षित पर्याय कोणता हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. शस्त्रक्रिया करून उपचार करायचे, की शस्त्रक्रियेविना उपचार करायचे हे ठरविण्याचा अधिकार रुग्णाचाच असतो. 

सखोल मूल्यमापन आणि एमआरआय स्कॅन केल्यानंतर उपचारांचे नियोजन केले जाते. समस्येचे गांभीर्य लक्षात घेत सुरुवातीला औषधांनी व विश्रांतीची शिफारस करून उपचार करण्यात येतात. सौम्य प्रकरणांमध्ये व्यायाम सुचविण्यात येतात. मध्यम स्वरूपाच्या वेदना होत असतील तर ‘नर्व्ह इंजेक्शन्स’ किंवा ‘स्पायनल इंजेक्शन्स’ देण्यात येतात. पारंपरिक उपचारांना दाद न देणाऱ्या किंवा रचनात्मक बदल करणे आवश्यक असलेल्या काही रुग्णांवर ‘लोकल अनेस्थेशिया’ देऊन टाकेरहित एण्डोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यात येते. लोकल अनेस्थेशिया देऊन पाठीची टाकेरहित शस्त्रक्रिया आता चांगलीच विकसित झाली आहे. पाठीच्या कण्याच्या शस्त्रक्रियेत एक क्रांती घडवून आणणारी ही एक दिवसाची शस्त्रक्रिया आहे. या शस्त्रक्रियेत, प्रभावित मणक्यापर्यंत बाजूने स्नायू व ऊती फुगवून एण्डोस्कोप घालण्यात येतो. या प्रक्रियेत पाठीच्या कण्याची नैसर्गिक रचना व स्थैर्याचे संवर्धन करण्यात येते. कारण या प्रक्रियेत स्नायू व हाडे कापली जात नाहीत. त्वचेला केला जाणारा छेद अत्यंत छोटा (म्हणजे साधारण सात-आठ मिलिमीटर) असतो, तो नैसर्गिकपणे बुजतो आणि रक्तसुद्धा वाहून जात नाही. 

एण्डोस्कोप आणि लेझर 
एण्डोस्कोपमुळे आतील भागाची परिस्थिती व्यवस्थित कळते, त्यामुळे बाहेर आलेला, स्खलन झालेला किंवा हर्निया झालेला मणक्याचा भाग काढून टाकणे शक्य होते. त्याचप्रमाणे गंभीर स्वरूपाचे स्खलन आणि अस्थैर्य किंवा स्क्रू किंवा रॉड (शीग) यामुळे होणारे फ्युजन टाळले जाते. लेझर आणि रेडियो फ्रिक्वेन्सी उपकरणे कठोर ऊतींना निमुळती करतात आणि नसांना दाबणाऱ्या हाडांच्या अतिरिक्त वाढीसाठी वापरली जातात, त्यामुळे पारंपरिक शस्त्रक्रियेमध्ये जशी हाडे कापावी लागतात, तसे न करता या भागांपर्यंत पोहोचता येते. 

विशिष्ट भागापुरती (लोकल अनेस्थेशिया) भूल देऊन जागृतावस्थेत असलेल्या रुग्णावर शस्त्रक्रिया केली जाते. या तंत्राचा सर्वांत मोठा फायदा हाच आहे. ही शस्त्रक्रिया करताना जागृतावस्थेत असल्यामुळे रुग्ण त्याला होणाऱ्या वेदनेबद्दल डॉक्टरांना सांगू शकतो, त्यामुळे ही शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित होते आणि वेदना निर्माण करणाऱ्या ऊतीला लक्ष्य करता येते. तसेच, पाठीच्या कण्यातील नाजूक भागांना टाळता येते. संपूर्ण वा पाठीच्या कण्याला भूल देऊन केलेल्या शस्त्रक्रियांमध्ये हे शक्य नसते. 

त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार किंवा श्वासाचे विकार असलेल्या, प्रमाणापेक्षा अधिक वजन असलेल्या व्यक्तींसाठीही ही सुरक्षित शस्त्रक्रिया आहे. अशा प्रकारचे आजार असलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करणे एरव्ही अधिक आव्हानात्मक असते. 

ही शस्त्रक्रिया टाकेरहित आणि विशिष्ट भागापुरती भूल देऊन करण्यात येत असल्याने वेदनांपासून लगेचच दिलासा मिळतो. तसेच, तो वेगाने मिळतो. अनेक रुग्ण शस्त्रक्रियेच्या दिवशीच आपल्या पायावर चालत जातात. अर्थात, हे त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीवर अवलंबून असते. या शस्त्रक्रियेमध्ये अतिदक्षता विभागात दाखल व्हावे लागत नाही. रुग्णालयामध्ये अनेक दिवस वास्तव्यही करावे लागत नाही. युरिनरी कॅथेटर्सची आवश्यकता नसते. दीर्घकालीन इंजेक्शन्स किंवा तीव्र मात्रेची अँटिबायोटिक्स घ्यावी लागत नाहीत. यासाठी फॉलो-अप ड्रेसिंगचीही गरज नसते. या सगळ्यामुळे ही शस्त्रक्रिया वाजवी खर्चात होते आणि परवडणारी असते. 

अलीकडेच अमेरिकेत काम करणाऱ्या एका भारतीय सॉफ्टवेअर इंजिनिअरला स्लीप डिस्कचा गंभीर स्वरूपाचा त्रास झाला, त्याला पाठीत प्रचंड वेदना होत होत्या, पायात बधिरपणा होता व अशक्तपणाही होता. अमेरिकेतील शल्यविशारदाने त्याला पाठीच्या कण्याची शस्त्रक्रिया करून पाठीच्या कण्यात स्क्रू आणि रॉड बसविण्याचा सल्ला दिला. या शस्त्रक्रियेमध्ये असलेली जोखीमही समजावून सांगितली. हे समजल्यावर तो प्रचंड घाबरला, पण तो भारतात परतला. भारतात त्याच्यावर टाकेरहित एण्डोस्कोपिक शस्त्रक्रिया केली गेली. त्याच संध्याकाळी तो वेदनारहित चालू शकत होता. घरी महिनाभर विश्रांती घेतल्यावर तो अमेरिकेत परतला आणि काम करू लागला. 

शस्त्रक्रिया का करायला हवी? 
• पाठदुखीचा त्रास असेल किंवा ती वेदना पायांपर्यंत जात असेल. 

• मांडीत, गुडघ्यात वेदना होत असतील. 

• मांडी घालून बसणे कठीण जात असेल किंवा पाय ताठ करण्याची गरज भासत असेल. 

• टाचेत वेदना होत असेल किंवा सकाळी उठताना वेदना होत असतील. 

• पायात किंवा पोटऱ्यांमध्ये वेदना होऊन झोपमोड होत असेल किंवा पायात गोळे येत असतील. 

• पाठदुखी किंवा कुशीवर वळल्यामुळे झोप व्यवस्थित होत नसेल. 

• थंड हवामान सहन होत नसेल किंवा पंख्याखाली झोप येत नसेल. 

• उभे राहिल्यामुळे किंवा चालल्यामुळे पायात गोळे येत असतील, पाय दुखत असतील. 

• बधिरपणा किंवा मुंग्या येत असतील, तळव्यांची आग होत असेल. 

• पाय, पाऊल किंवा पायाच्या बोटांमध्ये अशक्तपणा किंवा पादत्राणे पायातून निसटत असतील. 

• मूत्रासंबंधित किंवा मलविसर्जनाच्या समस्या. 

• तुम्ही एमआरआय चाचणी केली असेल किंवा स्पायनल वा एपिड्युरल (मेंदूच्या आवरणाबाहेरील) इंजेक्शन घेतले असेल. 

• तुम्हाला पाठीच्या कण्यावरील शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल. 

• तुमच्या पाठीच्या मणक्यांचे स्खलन झाले असेल. 

असे काही असेल, तर गंभीर स्वरूपाचे नुकसान टाळण्यासाठी योग्य चाचण्या, निदान आणि उपचार वेळीच करवून घ्यायला हवेत. सर्व प्रकारचे मणक्यांचे स्खलन, मणक्यांचा हर्निया, सूज, असाधारण बाक, असाधारण वाढ, अस्थिबंधांचा संकोच झाल्यास टाकेरहित एण्डोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यात येते. पाठीची शस्त्रक्रिया करूनही दिलासा न मिळालेल्या रुग्णांवर ही शस्त्रक्रिया करता येऊ शकते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Backpain article write by Dr Anand Kavee