
आरोग्यशास्त्र सांगते, पावसाळ्यात अग्नी मंदावलेला असतो, चेतनाशक्ती, वीर्यशक्ती इतर ऋतूंच्या तुलनेत कमी झालेल्या असतात.
आरोग्याचे व्रत!
- भाग्यश्री झोपे
आषाढ महिना सुरू झाला की वेध लागतात आषाढी एकादशीचे. महाराष्ट्राचे वैशिष्ठ्य समजली जाणारी पंढरीची वारी आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी आतुर झालेली असते, पावसानेसुद्धा जोर धरलेला असतो. या सगळ्याच्या बरोबरीने घराघरांत तयारी सुरू होते ती व्रतवैकल्याची, चातुर्मासाची! भारतीय संस्कृती व आयुर्वेद यांची सांगड प्रत्येक गोष्टीत दिसते. अभ्यंग, लंघन, एक वेळ भोजन, उद्वर्तन (उटणे) अशा अनेक आयुर्वेदोक्त उपचारांचा उल्लेख व्रतवैकल्यादी सांस्कृतिक कार्यक्रमात केलेला असतो. चंदन, तुळशी, दूर्वा, कोहळा, आघाडा आणि वेगवेगळी पत्री या सर्व औषधी वनस्पतींनाही व्रतामध्ये महत्त्वाचे स्थान असते. जणू शक्य तितके निसर्गाच्या सान्निध्यात येता यावे आणि निसर्ग तत्त्वांचे पालन व्हावे व आरोग्य चांगले राहावे म्हणूनच आपल्या संस्कृतीने सर्व व्रतांची योजना केलेली आहे. चातुर्मास म्हणजे चार महिन्यांचा काळ. आषाढातील देवशयनी एकादशीपासून ते कार्तिकातील प्रबोधिनी एकादशीपर्यंत चातुर्मास समजला जातो. शयनी एकादशीपासून भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागाच्या शय्येवर निद्रा घेतात म्हणून ही ‘शयनी’ एकादशी असे समजले जाते. श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे सांगतात त्याप्रमाणे विष्णू ही वर्तमानाची देवता, शरीरातील सर्व हलनचलनाशी संबंधित यंत्रणेवर नियंत्रण ठेवणारी देवता, प्राणीमात्रांच्या शरीरात वैश्र्वानररूपी अग्नीच्या रूपाने राहणारी देवता.
आरोग्यशास्त्र सांगते, पावसाळ्यात अग्नी मंदावलेला असतो, चेतनाशक्ती, वीर्यशक्ती इतर ऋतूंच्या तुलनेत कमी झालेल्या असतात. याचा परिणाम म्हणून आपणही ताकद, उत्साह, भूक कमी झालेली अनुभवतो. कुणाला दमा, कुणाला सांधेदुखी, कुणाला जुलाब अशा अनेक तक्रारी उद्भवताना दिसतात. पण हे होऊ नये यासाठी आयुर्वेदाने जे उपाय सुचवले तेच भारतीय संस्कृतीने चातुर्मासात नियम म्हणून सांगितले. आषाढापासून ते कार्तिकात येणाऱ्या दीपावलीपर्यंत सांभाळायची काही महत्त्वाची आरोग्यव्रते याप्रमाणे सांगता येतील. पावसाळ्यामध्ये अग्नी मंदावत असल्याने पचनसंस्थेवर ताण येऊ नये या दृष्टीने एक वेळ भोजन सुचविले आहे. आयुर्वेदातही वर्षा ऋतूत पचण्यास हलका व कमी प्रमाणात आहार घ्यायला सांगितले आहे.
ज्या दिवशी खूप पावसामुळे सूर्यदर्शन होणार नाही त्या दिवशी शक्यतोवर जेवण करू नये असेही सांगितले आहे. एरवी दुपारी पचण्यास हलके, अग्निप्रदीपन करणारे अन्न घेऊन संध्याकाळच्या जेवणात कधी मुगाचे कढण, कधी मिरी, तमालपत्र, दालचिनी, आले वगैरे टाकून तयार केलेली पातळ मुगाची खिचडी, कधी ज्वारीची भाकरी व भाजी असे अन्न घेणे. फार भूक लागली नसेल तर काहीही न खाणे किंवा साळीच्या-ज्वारीच्या लाह्या खाणे उत्तम होय. दुपारच्या जेवणातही फुलका किंवा भाकरी, मुगाचे वरण-भात, वेलवर्गीय फळभाज्यांपेकी एखादी तुपाची जिरे, हळद, हिंग, धणे, आमसूल, कढीपत्ता, आले, चवीपुरती लाल मिरची वगैरेंची फोडणी देऊन तयार केलेली भाजी, आमसुलाचे सार, जेवणानंतर आले-पुदिना लावून तयार केलेला मठ्ठा अशा गोष्टींचा अंतर्भाव करणे चांगले. या दिवसांमध्ये जड म्हणजे पचण्यास अवघड अन्न अर्थातच निषिद्ध असते. म्हणूनच संपूर्ण चातुर्मासात मांसाहार केला जात नाही. उलट प्रकृतीला अनुकूल असे साधे-हलके अन्न सेवन करणे अपेक्षित असते.
चातुर्मासात अनेक व्रतवैकल्यांमध्ये पिंपळ व तुळशी या वनस्पतींचा समावेश केलेला आहे. आयुर्वेदात तर कायमच वृक्षांना पूजनीय मानले जाते. औषध म्हणून वनस्पती उपटण्यापूर्वी त्यांची पूजा केली जाते. औषध बनविताना विशिष्ट मंत्र म्हणून वनस्पती आत टाकल्या जातात. चातुर्मासात व्रत म्हणून याच दोन वनस्पती निवडण्यामागे आरोग्याचा विचार महत्त्वाचा दिसतो. तुळस कफ-वातशामक असते, जंतुनाशक असते, अग्नीस उत्तेजित करते, सर्दी-खोकला-ताप-भूक न लागणे वगैरे पावसाळ्यात उद्भवू शकणाऱ्या विकारांवर रामबाण असते. तुळशीच्या नुसत्या अस्तित्वाने किंवा तुळशीच्या केवळ संपर्कात आल्यानेसुद्धा आरोग्याचे रक्षण होऊ शकते, भूतबाधा वगैरे नष्ट होऊ शकते असे आयुर्वेदात सांगितले आहे. म्हणूनच चातुर्मासात तुळशीची पूजा-अर्चा, तुळशीला प्रदक्षिणा घालायला सांगितले आहे. पिंपळ हाही सर्वांच्या परिचयाचा असतो. पिंपळाची साल स्तंभन करणारी म्हणजेच जुलाब, उलट्या, आव पडणे वगैरे विकारात औषध म्हणून वापरली जाते. पावसाळ्यात नेमके हेच विकार होण्याची शक्यता सर्वाधिक असते म्हणून चातुर्मासात पिंपळाच्या झाडाची पूजा-सेवा करायला सांगितली असावी, जेणेकरून पिंपळाच्या संपर्कात राहिल्याने शक्यतो हे विकार होणारच नाहीत.
अग्नी मंदावलेला असताना चातुर्मासात भारतीय संस्कृतीनुसार मौन किंवा कमीत कमी बोलणे हेसुद्धा सुचवले जाते. सध्याच्या आधुनिक व धकाधकीच्या जीवनात संपूर्ण मौन पाळणे अशक्यप्राय असले तरी निदान अगदी आवश्यक आहे तेवढेच बोलणे, वायफळ गप्पा न मारणे, इतरांची निंदा-नालस्ती न करणे या प्रकारे तरी मौन सांभाळता येऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीतून मौनधारणाचे प्रयोजन शक्ती- ऱ्हास होऊ न देणे असे असते. कारण बोलण्यामुळे खूप शक्ती खर्च होत असते. आयुर्वेदात एक सूत्र आहे, ‘व्यायामजागराध्वस्त्रीहास्यभाष्यादि साहसम्। गजं सिंह इवार्षन् भजन्नति विनश्यति॥’ व्यायाम, जागरण, प्रवास, मैथुन, हास्य व बोलणे यांचा अतिरेक केल्यास हत्तीवर हल्ला करणाऱ्या सिंहाप्रमाणे मनुष्याचा नाश होतो.
आषाढातील अमावस्येला दीपपूजा केली जाते. दीप हे प्रकाशाचे, तेजाचे, अग्नीचे रूप असते. शिवाय दीपदर्शन हे मंगलदायक समजले जाते. वर्षाऋतूमुळे मंदावलेल्या अग्नीला उत्तेजना मिळावी, कमी झालेली शरीरशक्ती पुन्हा ताजीतवानी व्हावी म्हणून याचा उपयोग होत असतो. श्रावणात मंगळागौरीच्या व भाद्रपदात हरितालिकेच्या निमित्ताने २१ पत्रींशी संबंध येतो. या सर्व पत्रींच्या संपर्काने आणि पूजेनंतर दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून या पत्रींचा काढा करून पिण्याची प्रथा असल्याने आरोग्य नीट राहण्यास मदत मिळते. श्रावणातील पंचमी म्हणजे नागपंचमी. या दिवशी स्त्रिया हातावर मेंदी काढतात. या महिन्यामध्ये शरीरात पित्त साठण्याची सुरुवात झालेली असते. हाता-पायांच्या तळव्यांवर मेंदी लावणे हे पित्तशामक असते.
श्रावण-भाद्रपदात अशा प्रकारे पित्त साठूच दिले नाही तर नंतर येणाऱ्या शरद ऋतूत पित्ताचा त्रास होत नाही. हरितालिकेच्या दिवशी स्त्रिया फक्त फलाहार करतात. फळे रसधातुपोषक असतात तसेच प्रकृतीनुरूप व योग्य प्रमाणात घेतल्यास विषद्रव्ये काढून टाकण्याचेही काम करतात. या दृष्टीने एक दिवस केवळ फलाहार उत्तम असतो. आश्र्विनातील ललितापंचमीच्या दिवशी ललितादेवीची दूर्वा वाहून पूजा केली जाते. आश्र्विन-कार्तिक हे दोन महिने शरद ऋतूचे असतात. दूर्वा खुडणे, दूर्वांच्या संपर्कात राहणे पित्तशामक असते. शरदात वाढलेले पित्त कमी व्हावे म्हणून शीतल गुणाच्या दूर्वा वाहून ललितादेवीची पूजा केली जाते. कार्तिक महिन्याच्या सुरुवातीला दीपावलीचा सण येतो. तो साजरा करताना तेलाचे दिवे लावणे, फटाके फोडणे, फराळाच्या विशिष्ट पदार्थांचा अस्वाद घेणे, घरादाराची सजावट करणे वगैरे गोष्टी केल्या जातात कारण तेव्हा पाऊस कमी झालेला असतो किंवा थांबलेला असतो आणि शरीरातील अग्नी प्रदीप्त झालेला असतो. तोपर्यंत मात्र जर चातुर्मासातील आरोग्यव्रते सांभाळली तर पावसाळ्यात तर आरोग्य उत्तम राहीलच, पण येणाऱ्या दीपावलीचे तेज अंतर्बाह्य अनुभवता येईल.
Web Title: Bhagyashri Jhope Writes Health
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..