गुण रक्‍ताचा 

डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)
Friday, 17 February 2017

अन्नरसापासून शरीरात रक्‍त तयार होणे हा एक मोठा चमत्कार आहे. अन्नपचन करविण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वर वैश्वानर अग्नी - जाठराग्नी - संप्रेरकाच्या रूपाने शरीरात असतो. याचाच हा चमत्कार असतो. प्रत्येकाला या अग्नीचे संरक्षण करणे आवश्‍यक असते. ज्या रक्‍तावर जीवन अवलंबून आहे, त्या रक्‍ताचे विज्ञान हे निव्वळ भौतिकी विज्ञान नसावे, तर ते अधिभौतिकी, क्वांटम फिजिक्‍स यांच्यातील सूत्रांवर अवलंबून असावे म्हणून "रक्‍ताचा गुण' हा शब्द वापरात आला. या रक्‍ताचे नुसते दोषांपासून, रोगांपासून रक्षण करणे पुरेसे नाही, तर त्याचे गुणमूल्यांकन करून त्याचे गुण वाढवण्याचा प्रयत्न करणे, हेच मनुष्याच्या उत्क्रांतीला सहायक ठरेल. 

"रक्‍त' हा शब्द नुसता ऐकला तरी बऱ्याच जणांना घाबरल्यासारखे होते, त्यांचे डोळे मोठे होतात, भीती वाटते. रक्‍त जोपर्यंत शरीरात वाहत असते तोपर्यंत ते शरीराला प्राणशक्‍ती पुरवून माणसाच्या जिवंतपणाची लक्षणे दाखवते, कार्य करण्यासाठी आवश्‍यक असणारी ऊर्जाही पुरवते. शरीराच्या धमन्यांमधून बंदिस्तपणे वाहणारे रक्‍त बाहेरच्या वातावरणाच्या संबंधात आले, की घाबरायला होणे साहजिक असते, कारण त्यामुळे कुठले रोगजंतू, कुठला व्हायरस, कुठला रोग शरीरात प्रवेश करेल याची शाश्वती नसते. 

शरीरातील प्रत्येक अवयवाचे महत्त्व असतेच. डोळ्यांना दिसत नसले तर किती गैरसोय होते हे त्या व्यक्‍तीलाच माहिती असते. कानांनी ऐकू आले नाही तरी पंचाईत होते. पायाने व्यक्‍ती अधू असली तरी अडचण होते; परंतु सर्वांत मोठी अडचण रक्‍ताच्या असंतुलनामुळे होऊ शकते म्हणून रक्‍त हेच जीवनासाठी सर्वांत किमती रसायन आहे. 
पांढरे दूध असो किंवा कुठल्याही रंगाच्या फळाचा रस असो तो सेवन केल्यावर त्याचे रूपांतर लाल रंगाच्या रक्‍तात होते. रक्‍तापासून पुढे मांस, चरबी, हाडे वगैरे धातू तयार होतात यात फारसे आश्‍चर्य वाटण्यासारखे नसते; परंतु अन्नरसापासून शरीरात रक्‍त तयार होणे हा एक मोठा चमत्कार आहे. अन्नपचन करविण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वर वैश्वानर अग्नी - जाठराग्नी - संप्रेरकाच्या रूपाने शरीरात असतो. याचाच हा चमत्कार असतो. प्रत्येकाला या अग्नीचे संरक्षण करणे आवश्‍यक असते.
 
असे म्हणतात, की जेव्हा पहिल्यांदा अग्नी प्रकट करण्याची क्रिया सापडली तेव्हा तो अग्नी किंवा त्याही पूर्वी आकाशातून उल्का पडल्यावर जमिनीवर उत्पन्न झालेला अग्नी साठवून ठेवण्यासाठी अग्निहोत्राची संकल्पना अस्तित्वात आली. त्यासाठी आवश्‍यकता भासली ती घराची व उत्तम नियमनाची. असे आहे बाह्य अग्नीचे महत्त्व. हेच महत्त्व शरीरात अन्नापासून रक्‍त बनविणाऱ्या अग्नीला मिळाले नाही तरच नवल. शरीरात रक्‍ताचे प्रमाण किती आहे, त्यात लाल-पांढऱ्या पेशी किती आहेत वगैरे सर्व संख्यात्मक माहिती विविध यंत्रांच्या साह्याने उपलब्ध होऊ शकते; परंतु रक्‍ताचा गुण कुठल्याही यंत्राने मोजता येत नाही. 

ज्या रक्‍तावर जीवन अवलंबून आहे त्या रक्‍ताचे विज्ञान हे निव्वळ भौतिकी विज्ञान नसावे तर ते अधिभौतिकी, क्वांटम फिजिक्‍स यांच्यातील सूत्रांवर अवलंबून असावे म्हणून "रक्‍ताचा गुण' हा शब्द वापरात आला. असे म्हणतात, वाघासारख्या श्वापदाला मानवी रक्‍ताची चटक लागली, तर तो वाघ मनुष्याच्या शिकारीसाठी कायम प्रयत्नशील राहतो, तेव्हा रक्‍ताला चवही असते. चव केवळ रक्‍तात असलेल्या रासायनिक द्रव्यांवर अवलंबून असेल की त्या रक्‍तात असलेल्या स्वभावावर अवलंबून असेल हाही विचार करायला हरकत नाही. 

रक्‍ताला काही चव असेल का? चव असेल असेच म्हणावे लागेल. त्या चवीमुळेच वेगवेगळ्या प्राण्यांच्या मांसाची चव वेगवेगळी असते व त्यामुळेच विशिष्ट प्राण्याचे मांस विशिष्ट लोकांना आवडते. त्याच्या रक्‍ताचा तो गुणच आहे असे म्हटले जाते म्हणजे व्यक्‍ती ज्या रक्‍तापासून उत्पन्न झाली, त्या व्यक्‍तीच्या पूर्वजांनी ज्या तऱ्हेने आयुष्य जगले तसे आयुष्य जगण्याकडे प्रवृत्ती असणे याला रक्‍ताचा गुण समजले जाते. राजघराण्यातील व्यक्‍तींच्या रक्‍ताला "विशेष रक्‍त' किंवा "निळ्या रंगाचे रक्‍त' असे म्हटले जात असे आणि या रक्‍ताचा गुण टिकावा म्हणून त्यांचा संबंध अल्पबुद्धी, हीनबुद्धी, कुबुद्धी, अनैतिकता, इतरांना त्रास होईल अशी वागणूक असणाऱ्या लोकांशी येणार नाही, अशी काळजी घेतली जात असे. पोलिस खात्यातील विशिष्ट कुत्र्यांना वासाचे शिक्षण दिल्यानंतर कुत्र्याला माणसाच्या शरीराचा म्हणजेच रक्‍ताचा किंवा त्या व्यक्‍तीचा स्पर्श झालेली वस्तू असेल त्याचा, त्या स्थळाचा वास दिला तर संबंधित व्यक्‍तीला शोधून काढून तेथपर्यंत पोचू शकतात.
 
बऱ्याच वेळा, ऍप्टिट्यूड टेस्ट (म्हणजे मूल लहान असतानाच त्याचा रस कुठल्या कामाकडे आहे याचा अंदाज घेणे) घेतल्या जातात. ही टेस्ट त्याच्या रक्‍ताच्या गुणामुळे करणे शक्‍य होत असावे असे वाटते. मेंदूत असलेले विचार अमलात आणण्यासाठी शेवटी शरीराची म्हणजे पर्यायाने शरीरातील जीवनशक्‍तीची आवश्‍यकता असते व ती रक्‍ताच्या माध्यमातून पुरवली जाते. शरीरात उत्पन्न होणाऱ्या रक्‍तदोषाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. 

असे हे जीवनदायी रसायन रक्‍त ! या रक्‍ताचे नुसते दोषांपासून, रोगांपासून रक्षण करणे पुरेसे नाही तर त्याचे गुणमूल्यांकन करून त्याचे गुण वाढवण्याचा प्रयत्न करणे हेच मनुष्याच्या उत्क्रांतीला सहायक ठरेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: blood ayurveda family doctor